पालकत्व २२ : शेवटचा दिस


आजचा आपला शेवटचा दिवस, पालकत्वावर बोलायचा! माझं बोलणं संपलं तरी माझं आणि तुमचंही पालकत्व चालू राहणार, ते चालू राहायलाच लागणार, मुलं कमीतकमी अठरा वर्षांची होईपर्यंत तरी! भारतात तर ते फारच काळ सुरू राहातं. माणसाच्या सामाजिक उत्क्रांतीमध्ये आजी पालकत्वालाही खूप महत्व आहेच. माणसाचं मूल दीर्घकाळ परावलंबी असल्याने हे होणं स्वाभाविक आहे. आपण पहिल्या काही लेखांमध्येमूल गावाचं असतंया अर्थाच्या आफ्रिकन म्हणीबद्दलही बोललो होतो, आठवतं?

पण यात तिढा आहे. वाढत जाणाऱ्या शिक्षणासोबत, सुरक्षिततेसोबत, नवीन तंत्रज्ञानासोबत प्रत्येक पुढची पिढी ही मागच्या पिढीच्या खूप पुढे जाते आहे. दोन पिढ्यांमध्ये नेहेमीच अंतर असे. पण ते आता खूप जास्त वाढतंय. त्यातून येणारे कलहही खूप क्लेशदायी आहेत. ज्ञानाचा ओघ सर्व बाजूंनी वाहायला तयार असताना आपण तो नाकारत असू तर ही भांडणं स्वाभाविक आहेत. पूर्वी माहिती एकाच दिशेने पुढे जायची. मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे. आता मात्र तरूण पिढीकडून शिकावं असं बरंच काही असतं आणि ते शिकलं नाही तर जगता येतंच पण शिकलं तर जगणं सोपं होतं हे निश्चित.

अशावेळी तरूण पिढीकडून शिकायला तत्पर असलेली, चर्चा करायला खुली असलेली, समजून घ्यायला तयार असलेली मागची पिढी घरात असली तर ती हवी असते. नाहीतर त्यावर शक्ती घालवण्यापेक्षा आजी पालकत्वाच्या सेवा बाहेरून विकत घेऊन एकटेपणा मान्य करणारी मंडळी अधिक दिसतात. अशा वेळी मुलांची, पालकांची आणि आजी आजोबांची, सगळ्यांचीच मानसिक आणि शारीरिक ओढाताण होते आहे. आणि यातून कसा मार्ग काढायचा हे प्रत्येक कुटुंब आपापल्या स्वभावाप्रमाणे ठरवतं आहे. कोणाला ते जमलंय, कोणाला नाही. कोणी या धकाधकीच्या आयुष्यातही आनंद शोधण्यालाच महत्व देतंय तर कोणाला कशात आनंद शोधावा हे कळतच नाहीए.

अशा परिस्थितीत काय करायचं? कुठले गुण आपल्या कामी येणार आहेत? कुठल्या शर्यतीत धावायची गरज आहे आणि कुठल्या शर्यतींकडे कानाडोळा करायचाय?

आयुष्य हे तीन गोष्टींभोवती फिरताना दिसतं: नातेसंबंध, पैसा आणि आत्मसन्मान (संदर्भ: अनिल भागवत यांची जीवनसाथ पुस्तकं). यापैकी पैसा आणि आनंद यांच्या सहसंबंधांबद्दल आपण पूर्वी बोललोय. एका मर्यादेच्या पलिकडे कितीही पैसे मिळवले तरी त्याप्रमाणात आनंद वाढत नाही. त्यामुळे त्या मर्यादेपर्यंतचा पैसा मिळवण्यासाठी पूर्ण कष्ट करायला हवेत. पण तो प्रयत्न न संपणारा नको. कारण त्यात पूर्ण आयुष्य निघून जाईल आणि आनंद घ्यायला काही शिल्लकच राहणार नाही. त्यामुळे आपल्या मुलांनी जास्तीत जास्त पैसे मिळवावे वगैरे आशिर्वाद देण्याऐवजी त्यांना पुरेसे पैसे म्हणजे किती हे कळावे असे आशिर्वाद द्यायला हरकत नाही.

नातेसंबंध ही गोष्ट आख्खं आयुष्य व्यापून राहते. ज्याचे स्वतःबरोबरचे आणि इतरांबरोबरचे नातेसंबंध छान तो सुखी माणूस! आता प्रश्न हा आहे की 'छान' म्हणजे काय आणि 'सुखी' म्हणजे काय?

सगळ्यांनी आपल्याला छान म्हणावं असं अनेकांना वाटतं. पण तसं खरंच शक्य आहे का? व्यक्ती तितक्या प्रकृती! जे एका व्यक्तीला छान वाटेल तीच गोष्ट दुसऱ्या व्यक्तीला पटणार नाही. असं असताना, दुसऱ्यांनी छान म्हणावं यावर माझे वागण्याचे निकष ठरवण्यापेक्षा कसे वागल्यावर माझं मन मला खात नाही, अधिकाधिक वेळ प्रसन्न राहातं, कमीतकमी नकारात्मक भावना निर्माण होतात आणि जास्तीत जास्त सकारात्मक भावनांना जागा मिळते, दिवसाच्या शेवटी समाधानाने नीट झोप लागते, हे पडताळून पाहायला हवं. प्रत्येकासाठीचं हे गणित निराळं असेल. पण प्रत्येकाला ते आपलं आपलंच मांडावं लागेल. या सगळ्या विश्लेषणात छान म्हणजे काय आणि सुख म्हणजे काय हे दोन्हीही स्वतःलाच उमगती. आत्मसन्मान म्हणजे स्वतःबरोबरचं नातंच! त्यालाही हेच निकष लावता येतील! 
   
आपण व्यक्ती म्हणून कसं वागायचं, पालक म्हणून कसं वागायचं, हे स्वतःसाठी ठरवून झालं तरी शेवटी दिवसाकाठी आजूबाजूच्या अनेक लोकांशी संबंध येणारच. नुसता संबंध येणार असं नाही तर आपल्या सारखंच त्यांनीही त्यांच्या स्वतःसाठी मांडलेल्या गणिताबरोबर आपलं गणित जुळायला लागणार. नाहीतर सगळ्यांचंच जगणं कठीण होणार. तेव्हा इतरांची गणितं त्यांच्यासाठी योग्यच असतील असा एक विश्वास आणि आपल्या गणिताशी ते जुळत नसलं तरीही त्या व्यक्तीसाठी ते मान्य करणारी सहिष्णुता हे आपल्या प्रवासात कामी येणार आहेत. सहिष्णुतेचा पाया आहे मनाचा खुलेपणा. आणि तो अनेकच ठिकाणी उपयोगी पडणार आहे. घट्ट विणीचा, खुल्या मनाचा समाजच अधिक सशक्त असणार आहे.

कल्पकतेबद्दल बोलताना आपण बोललो होतो की भविष्यातल्या अनिश्चिततेत तगून राहायचं असेल तर कल्पकता हा एक गुण इतर सगळ्यांपेक्षा महत्वाचा ठरेल. कल्पकता आणि मनाचा खुलेपणा हे हातात हात घालून जातात. म्हणजे चाकोरीबाहेरचे सुचायलाही कल्पकता गरजेची आणि असं दुसऱ्या कोणाला सुचलेलं मान्य करायलाही मनाचा खुलेपणा गरजेचा. नाहीतर नवीन काही सुचलं तरी आपणच आपल्याला अडवत राहतो. दुसऱ्यांसाठी तर सोडाच कधी कधी स्वतःसाठी सुद्धा आणि स्वतःकडे सुद्धा आपण खुल्या मनाने पाहू शकत नाही.

जाता जाता एकच अजून सांगावं वाटतं, आपल्या आनंदासाठी आपण मूल जन्माला घातलं. आपल्या जैविक स्वार्थानेच ते आपल्याकरवी प्रत्यक्षात घडवून आणलं. आपल्या मुलांकडून आपल्याला मिळणारा आनंद आणि त्यांच्या वाढीसाठी पालक म्हणून आपल्याला घ्यावे लागणारे कष्ट यांचा जमाखर्च मांडला असता, तो फायद्याचा असल्याशिवाय आपण यात पडणारच नाही. आपणच स्वार्थी होतो म्हणून हा संसार मांडला. आतामूल हे म्हातारपणची काठीह्या स्वार्थालाही कितपत जोपासायचं हे आपलं आपणच ठरवायचं. आज आपण पालक म्हणून जे गणित आजी आजोबांसोबत मांडतो आहोत, त्यापेक्षा बरंच वेगळं गणित कदाचित आपल्याला मांडावं लागेल याची मानसिक तयारी ठेवायला हवी. ‘अठरा वर्षांपर्यंतचं मूल आपलंकारण या भूमीचा कायदाच आपल्याला तोवर जबाबदार धरतो. त्यानंतर पालक म्हणून कायद्याने तरी आपण जबाबदार नाही. त्यापुढे समाजातल्या दोन प्रौढ व्यक्तींमध्ये जसं चांगलं नातं असणं अपेक्षित आहे तसं ते आपल्या मुलांसोबतही असावं यासाठी पूर्ण प्रयत्न करायलाच हवा. पण त्यांचं स्वतंत्र व्यक्तिमत्व मान्य करण्यासाठी आपलं मन खुलं असावं.

हा प्रवास मुलांना घडवण्याचा नसून, स्वतःलाच विस्तारत जाण्याचा आहे. अवघड आहे पण शक्य आहे. ह्या प्रवासासाठी शुभेच्छा! भेटत राहा!  
        
प्रीती पुष्पा-प्रकाश

2 comments:

  1. छान लेख.

    ReplyDelete
  2. एक सुंदर लेखमालिका! सतत दोन वर्षे चाललेली. लेखीकेचं मनापासून अभिनंदन आणि दुसऱ्या विषयावरील लेखमालेच्या प्रतीक्षेत.

    ReplyDelete