पालकत्व-७: भावनांचे व्यवस्थापन : लहानग्यांचे आणि आपलेही

कोकीळ कर्कश केकाटत होता. एक वर्षाचा आमचा लहानगा त्या आवाजाने घाबरत होता. त्या काळात विविध मोठ्या आवाजांना तो घाबरत असे. रात्रीअपरात्री नेहेमीपेक्षा मोठ्ठा आवाज करत रस्त्यावरून जाणार्‍या मोटारगाड्याही त्याला घाबरवून सोडत. तो बोलायला लागल्यावर तर त्यांना चक्क ‘वेडी बाईकअसं म्हणायला लागला.

त्याच्या भीतीला कुटुंबातल्या प्रत्येकाने दिलेला प्रतिसाद वेगळा होता. मी अभ्यास करत होते त्यामुळे माझा आग्रह होता की सगळ्यांनी माझ्यासारखंच वागलं पाहिजे. पण मग तोही हट्ट मावळला. कुटुंब हे समाजाचं प्रतिरूप आहे ना! मग प्रतिसादातली विविधताच त्याला अनेक गोष्टी शिकवून जाणार आहेत, हे माझ्या लक्षात आले. कमीत कमी एखाद्या ठिकाणी तरी त्याच्या भावनांना मुक्त व्यासपीठ मिळतंय हे पुरेसं आहे, असं मी स्वतःला समजावलं. आणि स्वतःचा भावनावेग थांबवला.
source: google 

भीती ही सर्वात प्रथम आणि सर्वात जास्त डोकावणारी भावना असेल कदाचित. अगदी लहान मुलांना वेगवेगळ्या गोष्टींची भीती वाटते. आणि प्रत्येक लहान मुलाला वाटणारी भीती वेगळी असू शकते. मूल कुटुंबातल्या सगळ्यांना नीट ओळखू लागलं, आई आणि इतर असाही फरक करू लागलं की नवख्या माणसाची भीती वाटायला लागते. काही मुलांना नवख्या स्त्रियांपेक्षा नवख्या पुरुषांची जास्त भीती वाटते. काही उपकरणांची, काही प्रक्रियांची भीती वाटू लागते. आमचं पिल्लू पावणेदोन वर्षाचं असल्यापासून स्वतः कात्री हाताळतं. पण केस कापूया म्हटलं तर नको म्हणतं. थर्मामीटर काखेत लावायला घाबरतं. कुकरच्या शिट्टीची आत्तापर्यंत भीती वाटत होती. मिक्सर चालू असताना मात्र त्याला हात लावायचा असतो.

नेमकं याच काळात मुलांच्या ‘प्ले ग्रुपप्रवेशाची गडबड सुरू होते. जिथे मुलांचे इंटरव्ह्यू घेत नाहीत तिथे ठीक आहे, पण जिथे घेतले जातात, तिथे मात्र पालकांना खूप ताण सहन करावा लागतो. या वयोगटातली मुलं त्यांच्या ओळखीच्या परीसरात, ओळखीच्या लोकांबरोबर खूप बोलत असली तरी नवीन ठिकाणी, नवीन लोकांसमोर त्यानं/तिनं बोलावं अशी अपेक्षा आपण मोठ्यांनी करणं चूक वाटतं. लहान मुलांनी चालवलेली लहान मुलांसाठीची न्यायालयं असती तर अशा प्रकारच्या प्रवेश प्रक्रियांवर त्यांनी ‘पीआयएलच दाखल केली असती!

या सगळ्यावर संशोधन काय म्हणतं? “मला भीती वाटतेययाला पालक म्हणून आपला काय प्रतिसाद असावा?

पहिलं म्हणजे तर अशी भीती वाटूच शकते हे मान्य करणं महत्त्वाचं. पुढची पायरी “घाबरू नकोस, रडू नकोसअसे सहजी मनात येणारे उद्गार थांबवून, आपल्या लहानग्याच्या गरजेनुसार त्याला जवळ घेऊन, त्याच्या भावनांना शब्द देणं. अगदी सुरूवातीला हा शब्दकोश त्यांच्याकडे नसताना ह्याची अधिक गरज असते. नंतरही कधीमधी भावना इतक्या अनावर झालेल्या असतात की काय करावं सुचत नसतं त्यांना. अशा वेळी, त्यांच्या भावना शब्दात मांडण्याचा आपण प्रयत्न केला की त्याचा फायदा होतो. कधी तरी आपला अंदाज चुकला तर ते आपल्याला दुरुस्तही करतात, “मला राग नाही आलाए, मला वाईट वाटतंय,” इ.

आपली भावना आपल्या काळजीवाहकांना कळते आहे आणि मान्य आहे, हे लक्षात आल्यावर मूल त्याबद्दल विनासंकोच मन मोकळेपणं बोलू लागतं. बोलता बोलता भीती दूर व्हायला मदत होते. हे फक्त भीतीच्याच बाबतीत खरं आहे असं नाही. सर्वच टोकाच्या आणि खास करून नकारात्मक भावनांना लागू पडतं.

मुलांचे प्रश्न विचारण्याचे जसे टप्पे असतात, तसे त्याना प्रश्न कळून त्याची उत्तरे देण्याचे सुद्धा टप्पे असतात. रडणार्‍या लहान मुलाला तुम्ही ‘काविचारायला हरकत नाही. ते जसे भाषा शिकले तसे हा ‘कासुद्धा कधी तरी शिकणारच आहे. पण पालक म्हणून जर आपण हट्टाला पेटलो की त्यानं कारण तरी सांगावं, तर तसं घडेल याची शाश्वती नाही. कारण ‘काअजून कळू लागलेला नसतो. आणि कधी कधी कळला जरी तरी त्यामुळे निर्माण झालेल्या भावनांचं व्यवस्थापन अधिक महत्त्वाचं असतं, त्या बाहेरच्या कारणापेक्षा.

खरं तर कशी गंमत आहे ना! मोठं झाल्यावर स्वतःला हे शिकवावं लागतं की दिसत असलेलं बाह्य कारण काहीही असू दे, माझ्या दुःखाचं, रागाचं, नकारात्मक विचारांचं खरं कारण माझ्या आतच दडलेलं आहे. अशा स्पष्ट शब्दात लहान असताना कळत नसलं तरी प्रत्यक्ष कारणापेक्षा भावनांच्या व्यवस्थापनावर आपसूक भर असतो ही जमेची बाजू आहे.

टेरीबल टूजच्या नावाने अनेक पालकांना कापरं भरत असेल. मुलं जसजशी मोठी होतात, त्यांच्या भाषेचा विकास होतो, पण भावनांवर नियंत्रण मात्र आलेलं नसतं (जणू काही ते नंतर येतं!). म्हणजे मेंदूची भावनांवर नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा पूर्णपणे कार्यरत नसते. त्यातून लहान मुलांचे हट्ट, कधी कधी आकांडतांडव सुरू होतात. मोठं होण्याच्या प्रवासातली ही छोटीशी अवस्था आहे. ह्यातून ही मुलं लवकरच बाहेर येणार आहेत. आणि तसं त्यांना बाहेर येता यावं यासाठी आपल्या मदतीची गरज आहे, हे पालकांच्या लक्षात असलं की निम्मी लढाई जिंकली. आपोआपच आपण वापरत असलेली भाषा बदलते, आरोप-प्रत्यारोप थांबतात, कारणे दाखवा नोटीस काढली जात नाही, की चूक कोणाची यावर खटला भरला जात नाही. रडणारं मूल हे त्रासदायक आणि ताणकारक वाटत असलं तरी, ते मूल असं मुद्दाम करत नाहीए, या माहितीमुळे निम्मा ताण हलका होतो, मुलाचा आणि पालकांचाही. 

हे सगळं भावनांचं प्रकरण मला गेल्या तीन वर्षांत कळालं. अजूनही पूर्ण कळतंच आहे. जॉन मेडिना (John Medina) यांनी लिहिलेलं ‘brain rules for baby’ या पुस्तकाने माझी या क्षेत्रातली कवाडे उघडली. ‘How to talk so kids will listen and listen so kids will talk’ या पुस्तकाने प्रत्यक्ष पद्धती शिकवल्या. ‘जावे भावनांच्या गावीहे मराठीतलं पुस्तक साधारणपणे अशाच प्रकारचं आहे.  

अभ्यासाचा फायदा होतो हे जाणवलं की अभ्यास करायला अजून जोम येतो. केलेला अभ्यास लगेच अमलात आणून ताडून बघता येतो. प्रत्येक पालक वेगळा आणि प्रत्येक मूल वेगळं आणि या दोन वेगळ्यांचं मिळून तयार होणारी पालक-मूल जोडी अजूनच वेगळी. अभ्यास एक सांगत असेल, पण ते या जोडीला कसं लागू पडतंय हे आपलं आपल्यालाच जोखून बघायचं असतं.  

बर्‍याचदा आपण फक्त आपल्याच बाळांचे पालक असतो असं नाही. आपल्या आजूबाजूला आपल्याहून लहानांचे कधी ना कधी तरी,  थोड्या वेळासाठी का होईना आपल्याला पालक व्हावं लागतं. पण पालकत्वाचा मनापासून अभ्यास सुरू होतो (झाला तर!) पूर्णवेळ पालकत्व अंगावर घेतल्यावर! तेव्हा आपण करत असलेल्या किंवा यापूर्वी केलेल्या चुका आठवल्या की वाईट वाटतं. पण उशिरा का होईना सुरूवात झाली याचं समाधान वाटतं.

प्रीती ओ.

1 comment: