पालकत्व-शी-शूचे गणित


मागच्या पिढीतल्या एक अगदी जवळच्या बाई मला सुचवत होत्या, ‘डायपर वापरायला हरकत नाही. रात्रीसाठी तरी! बाळाची आणि तुझीही झोप पुरी होते त्यामुळे!’ डायपर न वापरण्याबद्दल मी बर्‍यापैकी कट्टर आहे हे त्यांना माहीत होतं. ‘न निस्तरता येणार्‍या कचर्‍याची निर्मितीहा जसा माझ्यासाठी काळजीचा विषय होता तसाच आणि खरं तर त्याहून अधिक महत्त्वाचा विषय होता, बाळाचं आरोग्य, बाळाचं शी-शूचं ट्रेनिंग.


बाळ होऊ द्यायचं हेच मुळी एकदा ठरवल्यानंतर आयुष्यात येणारे बदल मान्य करणं ओघानंच आलं. आणि स्त्रीच्या (आईच्या) आयुष्यात सर्वाधिक बदल होणार असल्यामुळे त्याचे पडसाद घरातल्या इतरांवरही उमटणार. तेव्हा बाळाच्या आगमनामुळे कुटुंबातल्या सगळ्यांचंच आयुष्य खरंतर बदलतंप्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे.

डायपर न वापरण्याबद्दल मी जरी कट्टर असले तरी जो-तो आपापल्या परिस्थितीचा पूर्ण विचार करूनच निर्णय घेत असणार. त्यामुळे ते वापरणार्‍यांच्या विरोधात मलाअजिबात बोलायचं नाहीये. पण हा निर्णय घेण्यापूर्वी जर कोणी माझ्याकडे चौकशीला आणि चर्चेला आलं तर मात्र मी त्यांना डायपरच्या विरोधात फितवायचा पूर्ण प्रयत्न करते.त्यात एक मध्यम मार्गही सध्या उपलब्ध आहे, ‘कॉटन डायपर. ह्या डायपरच्या उपयोगाने पर्यावरणाचे प्रश्न निश्चित सुटतात, कारण हे डायपर परत परत वापरता येतात. त्यात एक प्लास्टिकचा भाग आहे जो धुवून परत वापरायचा असतो. ‘यूज अ‍ॅन्ड थ्रोडायपरसारखी ‘भूल जाओसोय त्यात नसली तरी थोड्या वेळाची सोय त्यात नक्की होते. आणि ही सोय थोड्या वेळासाठीच असल्याने पालक म्हणून आपला सजगपणाही कायम राहतो, असं वाटतं. ‘मूल होऊ देणंम्हणजे पालकांनी स्वतःला परत एकदा गतिमान शिक्षणाची संधी दिलेली असते. असा पहिला गतिमान शिक्षणाचा टप्पा हा ० ते ८ वर्षं या वयोगटात असतो असं म्हणतात. माणसाचं शिकणं कायम चालूच राहतं, त्याच्याही नकळत. पण पालक व्हायचं ठरवणं म्हणजे परत एकदा ही संधी घेणं आहे.

प्रसूतीनंतरचे पहिले तीन महिने हे जवळजवळ गर्भारपणाच्या चौथ्या तिमाहीसारखेच असतात. बाळ पोटाऐवजी बाहेर असतं आणि चारच गोष्टी करत असतं; शी, शू, मंमं आणि गाई गाई! मंमंबद्दल आपलं मागच्या वेळेसच बोलून झालं. गाई गाई बद्दल आपण पुढे बोलणार आहोत. आजचा विषय शी-शू चा.

पहिले तीन चार महिने हा भरपूर शी आणि शू होण्याचा काळ. आणि त्या काळातील शी-शू हे बाळाच्या आरोग्याचे दिशादर्शकही असतात. खरंतर शी-शू हे नेहेमीच आरोग्याबद्दल सांगत असतात, पण बाळाच्या बाबतीत अधिकच. त्यामुळे दिवसाला किती शी, किती शू आणि शीचा रंग कसा ह्या सगळ्याकडे घाणीच्या पलीकडे जाऊन संशोधकाच्या नजरेतून लक्ष ठेवायला हरकत नाही.

पुढे जाऊन शी नेमकी कधी होते, शू नेमकी कधी होते, किती वेळाने होते,पाजणे आणि शू यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे ह्याकडेही लक्ष असलं की शी-शू ट्रेनिंग करायला खूप सोपं जातं. आपल्याकडे पहिला सव्वा महिना सोडला की बाळाला दर थोड्या वेळाने शू करायला नेण्याचं काम आज्ज्या नियमितपणे करत असत. अजूनही अनेक घरांमध्ये हे चालतं. पण डायपरच्या ‘एंट्रीमुळे आणि आज्ज्यांच्या ‘एक्झिटमुळे पालकांच्या थोड्या काळाच्या सोयीपायी पुढचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

तीन-चार महिन्यापर्यंतच्या बाळाचे पाय फाकलेले असतात. जसं जसं ते रांगायला आणि अजून थोड्या काळाने उभं राहायला लागतं तसे त्याचे फाकलेले पाय जवळजवळ येऊ लागतात. उभ्या राहणार्‍या बाळाला जाड डायपरचा नक्की अडसर वाटत असेल, पण सांगणार कोणाला! आनंदाने डायपर घालणारी बाळं कमीच. दीर्घ काळ डायपर घालण्याच्या सवयीमुळे नंतर विना तक्रार घालत असतीलही. पण डायपर हे कुठल्याही दृष्टीने बाळासाठी सोयीचं नाही, अगदी सलग झोपेच्या कारणासाठीही! कारण बाळांनी सलग झोपलं पाहिजे असं कोणी सांगितलंय? ती आपली मोठ्यांची धारणा आहे. बाळांची झोप आणि प्रौढांची झोप यात मुळात फरक आहेच आणि ती हळू हळू बदलत जाते. यावरचं विज्ञान बरंच पुढे गेलं आहे. आणि झोपेबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत.

आमच्या बाळाला पहिल्या तीन महिन्यात दिवसाला तीन चार वेळा शी व्हायची. प्रत्येक शीच्या वेळेस भरलेले कपडे लगोलग धुवून घेता यायचेच असं नाही. इतर काही काम नसलं तरी शी झाल्या झाल्या पोट रिकामं झालं म्हणून लगेच पाजायला मागणारं रडणारं बाळ सोडून शी धूत बसवायचं नाही माझ्याच्याने. मग असे सगळे कपडे मी एकत्र धुवायला घ्यायचे. ते काम आग्रहाने मीच करायचे. खरं तर मी कोणाला ही मदत मागितली असती तर नक्की मिळाली असती.
  
पण माझ्या मनात एक वेगळंच गणित होतं. बाळाची शी हा काही कोणाचा आनंदाचा विषय असू शकत नाही. लोकांना, अगदी आई बाबांना सुद्धा कधी कधी शी-शू शिवायचं बाळ मिळालं तर हवं असतं. बाळाच्या अस्तित्वाचा सर्वाधिक आनंद आईलाच असण्याची शक्यता अधिक. तेव्हा आपण ज्या गोष्टीचा सर्वाधिक आनंद घेतो त्या गोष्टीतलं कष्टाचं काम किंवा नावडणारं कामही आपणच केलं पाहिजे, असं मला वाटायचं.

मला असंही दिसतं की बर्‍याच घरांमध्ये ही गोष्ट स्त्रीकडे सक्तीने येते. कधी त्याभोवती चांगलं वलय निर्माण करून तर कधी वाईट. ह्यातली सक्ती मला अयोग्य वाटते. आई उपलब्ध नसेल तर तितक्याच सहजपणे बाबाला ते काम करता यायला हवं. कमीत कमी बाबानं, या गोष्टीला ‘नाहीम्हणून तरी चालणार नाही, असं वाटतं. 

आमच्याकडे तर ‘हातासरशी दोन बाळांचं करून घेऊ याअसाच प्लॅन होता. आम्हाला असलेली कुत्र्याची आवड आम्ही माझ्या गर्भारपणासाठी राखून ठेवली होती. शेवटच्या तीन महिन्यांत ‘कुहू, आमची कुत्री घरी आली आणि तीन महिन्यांनी बाळ. आमच्या बाळाची आई मी, तर बाळाचा बाबा हा कुहूची आई. तेव्हा दोघंही प्राथमिक पालकत्वाच्या जबाबदार्‍या आणि आनंद अनुभवत होतो. तशाच दुय्यम पालकत्वाच्या जबाबदार्‍या आणि आनंदही! एकदा लंगोट बदलताना मनात आलं, “याचसाठी केला अट्टहास? हेच करायचं होतं का आपल्याला आयुष्यात?”

लगोलग पुढचे विचार सुरू झाले, “प्रत्येक लंगोट बदलण्याची वेळ ही बाळाशी संवाद साधण्याची संधी आहे. अगदी लहान बाळांशीसुद्धा खूप बोलत राहिलं पाहिजे. त्या हळूवार बोलण्याचा बाळांच्या भाषिक, मानसिक आणि सामाजिक जडणघडणीमध्ये अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. तेव्हा आपण फक्त लंगोट बदलत नसून एका जीवाच्या विकासाचे भागीदार होत आहोत!” या विचाराने मनाला शांतता आली आणि उभारही!  


प्रीती ओ.


2 comments: