उत्सवप्रिय की माणूसप्रिय!
ती काही माणूसघाणी नाही. लोकांना भेटायला तिला आवडतं. पण पाचपन्नासच्या पुढे आकडा गेला की, भर गर्दीतही तिला एकटं वाटतं. आधी तिला वाटायचं, हे असं तिला एकटीलाच होतं. आणि यात काहीतरी गफलत आहे. पण सुसान केनच्या एका टेड टॉकनंतर जणू तिला तिचं ‘मीपण’ गवसलं.
ती काही माणूसघाणी नाही. लोकांना भेटायला तिला आवडतं. पण पाचपन्नासच्या पुढे आकडा गेला की, भर गर्दीतही तिला एकटं वाटतं. आधी तिला वाटायचं, हे असं तिला एकटीलाच होतं. आणि यात काहीतरी गफलत आहे. पण सुसान केनच्या एका टेड टॉकनंतर जणू तिला तिचं ‘मीपण’ गवसलं.
त्यातून ती नास्तिक. आस्तिकापासून नास्तिकापर्यंत केलेला डोळस प्रवास,सणा-समारंभांना तिने कधीच काट मारली होती. कारण त्यांच्या आजच्या स्वरूपात तिला काहीच तथ्य दिसत
नव्हतं. तिने जाहीर करून टाकलं, ‘कुठल्याही लग्न,बारशी,मुंजींना मी येणार नाही. घरात भेटणार असाल तर ठीक आहे. आपसूकच आकडा मर्यादित राहतो.’ तिला सगळ्यात जास्त आवडायचं ते म्हणजे दोघातिघांच्या गटात भेटणं किंवा अगदी एकास
एक. अशा वेळी
होणाऱ्या गप्पा खोल असत.त्यांना काहीतरी उंची असे.उगाच उथळपणाच्या गप्पा करायला कोण भेटायला येणार आहे कडमडत!
हा स्वतःचा प्रवास सुरू असतानाच
मातृत्वाचा प्रवास सुरू झाला. आता आपल्या मुलासाठी तरी ही सगळं करेल अशी कुटुंबीयांना अपेक्षा होती. आपल्या बाळापोटी तरी तिला हौस वाटेल! पण कसलं काय? असं काहीच घडत नव्हतं. अशा प्रत्येक मोठ्या समारंभाच्या भोवती एक शनीची कडी उमटायला
लागायची.
हौस मोठ्यांची असते, ती आपण लहानग्यांवर थोपवत असतो. काय करायचं आपल्या हौशीचं? आणि आपल्या पुढच्या पिढीच्या समाजात मिसळण्याच्या
प्रक्रियेचं?
‘माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे’, हे वाक्य लिहून, वाचून, बोलून चोथा झालेलं. हे एक जीवशास्त्रीय सत्य आहे की, माणूस हा गटाने राहणारा प्राणी आहे. कारण गटाने राहूनच तो स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवू शकला. प्रकृती आणि संस्कृती यांच्या मिलाफामध्ये या गटाचा आकार
कधी अव्वाच्या सव्वा वाढला,त्याचं त्यालाही कळलं नाही. एवढ्या मोठ्या गटाचा भाग असण्यासाठी आवश्यक असलेला मेंदू मात्र इतक्या लवकर उत्क्रांत
झाला नाही. माणसाची शारीरिक उत्क्रांती आणि सांस्कृतिक उत्क्रांती यांच्यामधल्या तफावतीमध्ये
त्याचीच फरफट होत राहिली.
आपल्या मुलांना आपण खूप बोलायला
शिकवतो. ती आपल्या बरोबर असताना बोलतातही. पण इतरांसमोर ती बोलली नाही की, आपण त्यांना ‘शामळू’चं लेबल लावून टाकतो. चुरूचुरू बोलणाऱ्यांचं कौतुक होतं.प्रत्येकालाच आपलं मूल ‘स्मार्ट’ हवं असतं, फक्त इतरांसमोर दिसायला! पण ते जसं आहे तसं मान्य करणारे पालक विरळाच. याचा अर्थ असा नाही की, मुलांनी नवनवीन गोष्टी शिकण्याची अपेक्षा पालकांनी धरू
नये. ती जरूर
असावी. पण आपण न सुचवताही ती सतत काहीतरी शिकत असतात. त्याकडे आपलं लक्ष आहे का, हे आपलं आपणच चाचपून पाहायला हवं. आणि त्यांनी स्वतःहून शिकायला सुरुवात केलेल्या कौशल्यांमध्ये,विषयांमध्ये आपण त्यांना अधिक मदत करू शकतो का, असंही स्वतःला विचारलं पाहिजे. पालकत्वाचा प्रवास हा आपल्या पाल्याला शिकवण्याचा प्रवास
नसून आपल्या पाल्याच्या निमित्ताने स्वतः शिकण्याचा प्रवास आहे. स्वतःतल्या राहून गेलेल्या त्रुटींवर काम करण्याची संधी
आहे.
मुळातच स्वभावाने शांत,एकटेपणा आवडणारी, त्या एकटेपणात अनेकविध गोष्टींचा आविष्कार घडवून आणणारी, पण चारचौघात सहज न मिसळता येणारी, गटात असताना सगळ्यांना स्वतःकडे आकृष्ट न करू शकणारी अशी
मुलं आणि मोठेही पाहिले आहेत का आपण? काय विचार करतो आपण अशा प्रकारच्या व्यक्तिमत्त्वांबद्दल? कसे वागतो आपण त्यांच्याशी? काय शिक्के मारतो आपण त्यांच्यावर? त्यांच्या मनात अखंड चालू असलेल्या कल्पनांच्या उत्सवाकडे
आपलं लक्ष वेधलं जातं का? त्यांना सुचत असलेल्या गोष्टी आपण ऐकून घेतो का? त्यांना माणसं आवडत नसतील असं आपण गृहीत धरतो का? कधी जाऊन एकट्याने संवाद साधायचा प्रयत्न करतो का? कदाचित तोही प्रयत्न फसेल. पण एका शब्दात उत्तरं देत संवाद खुंटित करणाऱ्यांनाही
माणसं हवी असतात.
त्याला फोनवरही बोलता येत
नसे. समोरच्याच्या
प्रश्नाला कशीबशी उत्तरं तो देई. समोरचा फोन ठेवल्यावर मनात म्हणे, जाऊ देत. त्याच्या बोलण्यातून मी त्याला भेटावं असं काही वाटत नाही त्याला. पण प्रत्यक्ष भेटीत मात्र तो अत्यंत वेगळा वागे. म्हणजे फोनवरच्या बोलण्यात नसलेलं अगत्य प्रत्यक्ष भेटीत
मात्र उतू जाताना जाणवायचं. प्रत्यक्षातही तो कमीच बोलायचा पण आपण आल्याचा आनंद त्याच्या नजरेत, हालचालीत, कृतीत जाणवायचा. आणि न बोलताही त्याचा गोतावळा मोठा होता. त्याच्या या अबोल व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात पडलेले अनेक
जण होते.
चौथीच्या वर्गातल्या अहानबद्दल शिक्षकखोलीत चर्चा चालू होती. तो कसा अजिबात
लक्ष देत नाही शिकवताना असा सूर होता. आवाज नसायचा त्याचा पण शेजारच्या संदेश
बरोबर अखंड गुलूगुलू चालायचे. मग त्यातून कधीतरी काहीतरी उमटायचे आणि दोघांनाही
शिक्षा व्हायची. अहानला ओरीगामी आवडायचे, इतके की काही स्त्रिया जशा अखंड लोकरकाम करत असतात, त्याच्याकडे न बघताही, तसं अहान अखंड कागदकाम करायचा, समोर कुठल्याही विषयाचा तास चालू असला तरी. आणि हे
सगळं लपून छपून करावं लागे कारण कुठली शिक्षिका त्याला असं करू देणार होती? मग बाकाखाली हात लपवून सराईतासारखे
अहानचे हात चालत असे. त्यांच्या वर्गशिक्षिकेला याचा पत्ता लागला. अहानची कागदकला
चालू राहिली तरी चालेल पण समोर शिकवत असताना त्याने शेजार्यांशी बोलू नये असं
तिनं सुचवलं. याने चांगला परिणाम साधला. अहान हे ‘multi tasking’ करू शकायचा. किंबहुना त्याला समोर चालू
असलेले पटकन कळायचे त्यामुळे फावल्या वेळात त्याच्या हातांना आणि मेंदूला उद्योग
हवा होता. तो त्याने मिळवला होता. आता तो वर्गात ‘मान्य’ ही झाला होता. त्यामुळे त्यात लपवण्यासारखं काही
राहिलं नव्हतं. अहान अबोल, एकटा- एकटा राहणारा पण अतिशय प्रेमळ. त्याला आहे तसा ‘मान्य’ करणारी त्याची वर्गशिक्षिका शाळा सोडून
जायची वेळ आली तेव्हा ढसाढसा रडला. मूकपणे. कुठेही कशाचेही प्रदर्शन नाही. त्याने
कागदाच्या अनेक वस्तू तिला करून दिल्या आठवण म्हणून.
अशी शांतच मुलं घडवावी असं सुचवत नाहीये मी. ती घडणारच आहेत आपापली. फक्त त्यांच्या अव्यक्त अस्तित्वावर शिक्के
मारत आपण त्यांना कोमेजून तर टाकत नाही ना,एवढंच भान राहावं आपल्याला पालक म्हणून आणि एक प्रौढ व्यक्ती
म्हणून!
(दिवाळीच्या निमित्ताने उत्सव, त्यांचं साजरीकरण, पालकत्व आणि व्यक्तिमत्व यावर लिहिलेला
हा खास लेख! आयुष्याचा आनंद घेण्याच्या प्रत्येकाच्या तर्हा निराळ्या असू शकतात, हे लक्षात ठेवू या,सण समारंभ साजरे करताना! दिवाळीच्या सर्व वाचकांना, खास करून पालकांना आणि त्यांच्या गोड मुलांना खूप
शुभेच्छा!)
अजून वाचनासाठी...
प्रीती ओ.
Sunder....ek vegala vichar mandala aahes tu....Khare tar mulakadunch apeksha thevatana apan aplyashi tya goshti tadun pahayla havyat..kitekda asa janavt ki hech mala karayla Sangital aste tar Mazi pratikriya tyaveles vegli asti..
ReplyDeleteखूपच छान व्यक्त झाली आहेस प्रीती.
ReplyDelete