पालकत्व-कसा आळवू (आवरू) राग!


रागावरचं काम हे राग येण्याआधी करायचं, नंतर करायला फारसं उरत नाही, असं आपण मागच्या लेखात म्हटलं खरं. पण एकीकडे हे आधी करायचं काम सुरू केलं तरी राग येणं थांबत नाही ना! मग त्याचं काय करायचं?  
बुद्धांना एकदा त्यांच्या एका अनुयायाने विचारलं, “तुमच्याकडे शिकायला येणार्‍या लोकांमध्ये मला दोन प्रकार दिसतात. एक तर असे की जे तुम्ही सांगितलेल्या वाटेने चालत राहतात आणि त्यांची प्रगती होत राहते. दुसरे असे की तुम्ही सांगितलेली वाट ते समजून घेतात पण त्या मार्गाने जात नाहीत आणि त्यांची प्रगतीही होत नाही. असं का?
त्यावर हसून बुद्ध म्हणाले, “तू या गावचा दिसत नाहीस.”
अनुयायी म्हणाला, “हो. मी त्या तिकडच्या गावचा आहे.”
बुद्ध, “मग या गावातले अनेक लोक तुझ्या गावाकडे जाण्याचा रस्ता तुला विचारत असतील, नाही का?
शिष्य, “हो तर! आणि मी त्यांना नीट समजावून सांगतोही. वाट जंगलाची आहे. कुठे कुठली वळणं आहेत. कुठले धोके आहेत. इ. इ.”
बुद्ध, “मग तू इतकं छान समजावून सांगितल्यावर सगळेच नीट पोहोचत असतील तुझ्या गावाला?
शिष्य, “नाहीSSSS. जे नीट समजून घेतात आणि खरंच एके दिवशी त्या वाटेने जातात, ते मजल दर मजल करत पोहोचतात. पण जे चालायला सुरूवातच करत नाहीत ते कसे पोहोचतील? मी सांगण्याचं काम केलं, पण त्यांना माझ्या गावी पोहोचायचं असेल तर चालावं तर लागेल ना!”
बुद्ध परत एकदा प्रसन्न हसले आणि म्हणाले, “तू मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर स्वतःच दिलंस की!”

आपल्याला राग येतो आणि आलेल्या रागामुळे आपण स्वतःचंच नुकसान करतो, मन अस्थिर करतो, त्या रागात खितपत पडून वेळ वाया घालवतो ही गोष्ट लक्षात येणं ही रागाच्या कामाची पहिली पायरी. आपल्या रागामुळे आपण आपल्या आजूबाजूचं वातावरण कलूषित करतो आणि अशा प्रदूषित वातावरणात स्वतःही राहतो आणि इतरांनाही राहायला लावतो. वर आपण करतो आहे ते बरोबरच आहे हे स्वतःला पटवून देत राहतो आणि इतरांनाही सांगत राहतो. या सगळ्याचा संबंध फक्त आपल्या मनाशी न राहता, ह्याचे विपरीत परिणाम आपल्या रक्तदाबावर, अर्थातच आख्ख्या शरीरावर दिसायला लागतात. एकदा का हा शरीर-मन संबंध लक्षात आला की स्वतःचं सर सलामत ठेवण्यासाठी तरी रागावून चालणार नाही इथवर आपला विचार पोहोचेल. रागच न येणं’ या मंजिलवर पोहोचायला खूपच काम करायला लागेल आणि खरंच मानवार्थ (पुरुषार्थाऐवजी!) गाजवायला लागेल. पण त्या मार्गावर चालायला लागलो की कापलेल्या अंतराच्या प्रमाणात त्याची फळं मिळायला तर निश्चितच लागतील. 

प्रत्येकासाठी हा मार्ग वेगळा असू शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या ध्यान पद्धती भारतात आहेत. कोणाला काय पटेल, तर कोणाला काय! प्रत्येकाच्या प्रवृत्तीनुसार, स्वभावानुसार योग्य तो मार्ग सापडवावा लागेल. काहींना कुठल्याही ध्यान पद्धतीशिवाय विचार, चिंतन, मनन या मार्गाने जायला आवडेल. तर काही जण, मी अमुक एक ध्यान पद्धती वापरतो असं न म्हणता, शांत बसून राहण्यातून मनाच्या शांतीकडे वाटचाल करतील. आपल्याला काय लागू होतंय हे आपलं आपल्यालाच शोधावं लागणार आणि त्यासाठी काही मार्ग चोखाळून बघावे लागणार. पण हे शोधायला लागण्याची पहिली पायरी ही आहे की मनातून असं वाटणं की,मला माझ्या रागातून मुक्त व्हायचंय, त्यामुळे होणार्‍या त्रासातून स्वतःला आणि इतरांनाही मुक्त करायचंय.

ज्या मुद्द्याने सुरूवात केली तिथे परत येऊ...

राग आल्यावर अनेकदा त्याच्या संवेदना शरीरावर दिसत असतात. कानशिलं गरम होणं, डोक्यावरची नस फडफडणं, डोळे लाल होणं, श्वासाची गती बदलणं. रागावर आधी केलेल्या कामामुळे आपलं मन तयार झालेलं असेल तर राग आल्यावर लवकरच या शरीरावरच्या संवेदनांकडे लक्ष जायला लागतं. जसा तो आलाय तसा तो जाणारही आहे हे लक्षात येतं. प्रयत्नपूर्वक लवकर गेला तर ज्यामुळे राग आला असं वाटतंय त्या प्रश्नाचं उत्तर शोधणंही अधिक सोपं होणार आहे. राग असताना सुचलेली उत्तरं अनेकदा परिणामकारक नसतात. त्यातून प्रश्न सुटण्यापेक्षा नवीन प्रश्नच तयार होण्याची अधिक शक्यता असते. आणि राग हे काही प्रश्नावरचं उत्तर नसून, ती फक्त एक प्रतिक्रिया आहे. तेव्हा लवकरात लवकर मला यातून बाहेर पडायचंय. अशा विचारांनी बाहेर पडायला मदत होते. शरीरावरच्या संवेदना आपल्याला ह्या विचारांची आठवण करून द्यायचं काम चोख बजावू शकतात. पूर्वी जर रागातून बाहेर पडायला २ तास लागत असतील आणि अशा प्रकारच्या विचारांनी आणि सजगतेने त्या २ तासांचे १ तास ५० मिनिटे जरी झाली तरी १० मिनिटे मिळाली ना अधिक! असं करत करत कधीतरी राग आला आणि पुढच्या क्षणी तो गेला इथवर आपण पोहोचू. आणि मग राग आलाच नाही, समोरच्या परिस्थितीकडे तटस्थपणे बघता आलं, कोणा एकाची चूक नसताना, आपल्या रागापोटी, त्याला धारेवर धरलं नाही अशा गोष्टी घडू लागतील.

मुलांना रागवायचं की नाही? शक्य असेल तोवर नाहीच. समजावून सांगायचं, गोष्टींची जाणीव करून द्यायची. पण स्वतःच्या मनावर ताबा राहिला नाही, त्यातून प्रतिक्रिया म्हणून निर्माण झालेला राग, असं रागवायचं की नाही? तर नाSSSSही. जेव्हा असं वाटतं की कठोर शब्दात सांगितल्याशिवाय कळणार नाही, तेव्हा स्वतःचं मन दहा वेळा तपासून बघावं. “मी प्रतिक्रिया म्हणून रागवतो/रागावते आहे का? सांगण्यापुरता आवेश आणून, सांगून झाल्यावर स्वतःचं मन शांत आहे का?” तसं असेल तर चांगला बदल घडून यावा म्हणून जाणीवपूर्वक केलेली गोष्ट आहे. यामुळे, हवा तो परिणाम तर साधेल पण त्याचे नको असलेले परिणाम मात्र आपल्या आयुष्यातून वगळून टाकता येतील.

समजा, खूप राग आला आहे आणि तो मुलांवर निघेल असं लक्षात येतंय तर शांतपणे थोडावेळ त्या परिस्थितीतून बाहेर पडा. दुसर्‍या खोलीत जा. शक्यतोवर घरातून बाहेर पडू नका पण तरीही स्वतःला शांत व्हायला वेळ द्या. नंतर परत सोडून दिलेल्या परिस्थितीला नव्याने सामोरे जा. स्वतःचं चुकलं असं वाटत असेल तर खुल्या मनाने कबूल करा. खूप हलकं वाटेल. स्वतःचं सगळं बरोबरच असतं आणि बाकीचेच चुकतात या अभिनिवेशाला जेवढी मानसिक शक्ती खर्ची पडते त्यापेक्षा खूप कमी शक्ती माझं चुकलं हे मान्य करायला लागते. त्यानंतर येणारी शांतता, हलकेपणा अधिक शक्ती देऊन जाणारा असतो.
माझी चूक मला एकट्याला सांगितली गेली आणि तीच चार चौघांसमोर सांगितली गेली, तर मला अधिक काय मान्य होतं? पहिला पर्याय निवडलात ना! मग आपली मुलं आपल्यापेक्षा खूप वेगळी नाहीत या बाबतीत. त्यांची चूक जरी झाली असली तरी ती नातेवाईकांसमोर, त्यांच्या मित्रमंडळींसमोर सांगू नका. एकांतात सांगतानाही ज्या एका चुकेबद्दल बोलता आहात तर त्याबद्दलच बोलूयात. इतिहास उकरून काढलात की लढाई हरण्याची सुरूवात होते. खूप अघळपघळ बोलत राहिलो तर लहान मुलं तेच बोलायला शिकतील आणि मोठी मुलं कान बंद करून टाकतील. आपल्या मागे आपली नक्कल करून हसतीलही. नक्कल करण्यात वाईट काही नाही पण आपल्या अस्सल भावनांची खिल्ली उडवली गेली याचं दुःख आपल्यालाच वाटेल म्हणून आधीच खबरदारी घेतलेली बरी.

रागाचा राग आळवत बसण्यापेक्षा, राग आवरता घेण्यात शहाणपणा आहे हे शिकण्याची अजून एक संधी पालकांना उपलब्ध असते. त्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन आपलं पालकत्वच नव्हे तर इतर सर्वच नाती समृद्ध करण्याकडे वाटचाल करण्यासाठी शुभेच्छा! 

प्रीतीपुष्पा-प्रकाश
opreetee@gmail.com

2 comments:

  1. You have well written and well explained about Anger. Parenting is not an easy job, especially with grown-up children.

    ReplyDelete
  2. true. Agreed. requires too much patience.

    ReplyDelete