पत्रातून व्यक्‍त होणारे जी.ए.

 



'विश्रब्ध शारदेचा' एक आविष्कार म्हणजे जी.ए.कुलकर्णी यांची पत्रे. ही पत्रे 'मौज प्रकाशनाने' प्रकाशित केली आहेत. या पत्रातून जी.ए. आणि त्यांचे सुहृद यांचा जसा एक बंधानुबंध स्पष्ट होतो त्याचप्रमाणे स्वतः जीए आणि त्यांच्या मित्रपरिवाराची जीवनाकडे व साहित्याकडे पाहण्याची दृष्टी ही स्पष्ट होते. यातून सर्जनशील मनाची वीण लक्षात येते. या पत्रांमधून त्या त्या व्यक्तींच्या मनाचे धागे दोरे आणि जीवन चिंतन जाणवते. आपापले मनोगत कुठल्याही प्रकारचा आडपडदा न ठेवता ही मंडळी पत्र माध्यमातून व्यक्‍त करतात.

 

सुनीताबाई देशपांडे, माधव आचवल, जयवंत दळवी, श्री. पु. भागवत, म. द. हातकणंगलेकर आणि आणखी एक दोन व्यक्तींशी जीए कुलकर्णी यांचा पत्रव्यवहार होता.

 

गुरुनाथ आबाजी कुलकर्णी (जी. ए. कुलकर्णी)



सुनीताबाईंना लिहिलेल्या एका पत्रात जीए म्हणतात, 'E.V. Lucas ने कुठेतरी  'A letter is written conversation ' असे म्हटले आहे. --- हे मी प्रथम वाचले तेव्हा, मला पटले नव्हते ---अत्तराचा वास ते उघडे ठेवल्याने जात असेल तर, संभाषणाचा ते बंदिस्त ठेवल्याने जातो. लिहिण्याचा एक फायदा असतो; तो म्हणजे विविधरंगी vapours प्रमाणे अनेक घटना, व्यक्ती, कल्पना आपल्यात धडपडत असतात. पण, त्या कागदावर उतरवताना त्यांना local habitations and a name मिळते. आपल्या रामस्पर्शाने शिळेला अहिल्या करण्याची देणगी अर्थात हजार-दोन हजार वर्षात एखाद्याला मिळते. पण, इतरांना जर आडव्या पडलेल्या आकृती नितळ उभ्या करता आल्या तरी, त्यांनी ते भाग्य समजावे'. या उताऱ्यात जीए आपली पत्रलेखनाची उर्मी आणि आपल्या लेखनामागची प्रेरणा व प्रयोजन स्वरूप स्पष्ट करतात.

 

तर सुनीताबाईंनाच लिहिलेल्या दुसऱ्या एका पत्रात जीए म्हणतात, -

'माझी खरी इच्छा म्हणजे कवीच होण्याची होती, म्हणजे सामाजिक जाणीव, क्रांतीचा संदेश वगैरे भानगडी नाहीत. कसाच्या दगडावर सोन्याची रेष काढावी, केवड्याच्या कणसातून एखादा काटेरी सुगंधी अनुभव घ्यावा, शब्दावर पाण्यावरील लाल प्रकाशाप्रमाणं भाव तरंगावे तसं काही लिहावं असं फार वाटतं. तसं येणार नाही हे ही माहित आहे पणअनेकदा तसं वाटतं----'. सर्व साहित्यप्रकारात काव्य हा वाड्मयप्रकार अधिक शुद्ध, निखळ, Pure आहे हे जीए निश्‍चितपणे जाणत असल्याने ते आपले काव्यविषयक मत तर मांडतातच पण, त्याचबरोबर सर्व ललितकलांत संगीतात आणि ज्ञानशाखांमध्ये गणितात श्रेष्ठ ज्ञानाचा प्रत्यय येतो असे त्यांचे मत होते.

 

'जीवन प्रवासात इतकी विविध वळणे मिळालेली असतात की, आपण या ठिकाणी कसे आलो याचे फार नवल वाटते --- फ्रिकेचा नकाशा पहा. नाईल नदी जिथे उगम पावते तेथून तिने दोनशे मैल पूर्वेकडे वळण घेतले असते तर, ती हिंदी महासागरात आली असती. डावीकडे घेतले असते तर, ती अटलांटिक महासागरात संपली असती. पण नाही शेकडो मैल वाळवंट तुडवत ती भूमध्य समुद्रातच विसर्जित झाली. आपण अलेक्सान्द्रीयाला आलेलो पाहून खुद्द नाईललाच आश्‍चर्य वाटले असेल. निव्वळ सागरात विसर्जित होणे एवढेच आपल्यापुढे वाढून ठेवले आहे असे नाही पण, कसल्या तरी गूढ प्रेरणेने आपण एका विशिष्ट खोबणीतून तिकडे सरकवले जातो हे देखील महत्त्वाचे आहे. मला वाटते हा मार्ग शोधून पाहणे हा आत्मचरित्रामागचा अत्यंत महत्त्वाचा हुंकार आहे. निदान असावा!'

 

जीए यांच्या कथांमधून दिसणारा नियतीवादच यातून प्रगट झाला आहे. तसेच मानवी बुद्धीची मर्यादाही जीए सांगतात. जीए यांना माधव आचवल यांचे लेखन अतिशय आवडे. श्री.पु. भागवतांना लिहिलेल्या पत्रात जीए आचवलांच्या लेखनाची मुक्त कंठाने स्तुती करतात. 'आचवलांचे लेखन स्वयंप्रकाशी आहे. स्वतःचा निळसरलाल प्रकाश घेऊन ते ताजे असते'. एका श्रेष्ठ कलाकाराने तेवढ्याच ताकदीच्या दुसऱ्या कलाकाराचे केलेले मनमोकळे कौतुक जीए यांच्या मनाचे मोठेपण दर्शविते. आचवल आणि जीए यांच्यात एक निरागस आणि समपातळीचा मैत्रभाव असल्याने आचवलांच्या परदेश प्रवासाबद्दल,You can go to hell via खटाववाडी' असा आचवल व सत्यकथेला ते चिमटा काढतात. माधव आचवल यांना लिहिलेल्या पत्रातून आपल्यासाठी जी पुस्तके जीए विकत आणण्यास वा ग्रंथालयातून पाठविण्यास सांगत, ती यादी पाहिल्यावर जीए यांच्या मनाला अज्ञाताबद्दलची असलेली ओढ जाणवते.

 

जीए यांनी आचवल, हातकणंगलेकर यांना इंग्रजी भाषेतून पत्रे लिहिली आहेत. मराठी इतकेच त्यांचे इंग्रजी भाषेवर असलेले प्रभुत्व या पत्रांमधून जाणवते. सोफोक्लीस, एस्कीलस या ग्रीक लेखकांच्या शोकान्तिका, डोस्टोव्हस्की, चेकॉव्ह, टॉलस्टॉय, इब्सेन, फ्रान्झ काफ्का, शेक्सपिअर, शेली, कीट्स, इलियट, जेराल्ड हॉपकिन्स, हेमिंग्वे, युजिन ओनील आदींचे साहित्य हे जीएंच्या मनाचा एक भाग बनले होते आणि त्याची जाणीव आपल्याला जीएंच्या पत्रातून होते.

 

जीए यांचे इंग्रजीबरोबरच मराठी साहित्याचेही वाचन दांडगे होते. समकालीन मराठी वाङ्मयाची बारकाईने घेतलेली दखल त्यांच्या पत्रातून जाणवते. जीएंची वाङ्मयविषयक भूमिका शुद्ध कलावादाची असली तरी, ही कला संगीत कलेप्रमाणे शुद्ध कला नाही असेही त्यांचे मत होते. वाङ्मयात जीवनातीत अनुभवांचा आविष्कार असल्याने, लेखकाचे मानवी जीवनाशी असलेले नाते तुटून चालणार नाही असे ते म्हणत.

 

आपल्या अन्य काही मित्रांना लिहिलेल्या पत्रातून लहानपणीच्या सुखद आठवणींभोवती रुंजी घालणारे जीए यांचे मन दिसते. गावाकडच्या सारवलेल्या जमिनीची घरे, अंगणातल्या सुरेख रांगोळ्यांच्या स्मृतीने त्यांचे मन मोहरून गेलेले दिसते. जुन्या काळातल्या प्रौढ स्त्रियांबद्दल जीए पत्रातून लिहितात, तेव्हा घरासाठी राब राब राबणाऱ्या, कसलेच प्रसाधन न करणाऱ्या या स्त्रियांच्या मनातील मायेच्या ओलाव्याच्या सुखद आठवणींनी ते अतिशय हळवे होतात.

 

थोडक्यात जीए यांच्या प्रतिभेचा आणि कथा वाड्मयाचा गोफ उलगडण्यास जीए यांचा पत्रव्यवहार हे एक महत्त्वाचे साधन असल्याचे जाणवते.

 

प्रा. गिरीश जोशी



1 comment:

  1. जीएंची पत्रे हा एक त्यांच्या प्रतिभेचा सुंदर आविष्कार आहे... त्यांची यथार्थ ओळख या लेखातून होते आहे!

    ReplyDelete