नर्मदा परिक्रमा पहिल्यांदाच करणाऱ्यांना, 'परिक्रमावासी रात्री कुठे राहतात?', असा एक प्रश्न पडलेला असतो. तसा तो आम्हालाही होता. परिक्रमा करताना आम्ही काही जागांचे फोटो काढले, त्यातले निवडक फोटो इथे खाली दिलेत. बघा तुम्हाला सुद्धा कदाचित तेवढेच उपयोगी पडतील!
हा ओंकारेश्वरचा
गजानन महाराज आश्रम. ६० फूट बाय ८० फूट असे प्रशस्त दोन हॉल्स. त्यात खाली हिरवे प्लॅस्टिक
टाकलेले, बाजूला (फोटोत नाही) अंघोळ, संडासाची उत्तम व्यवस्था. जेवणाचा हॉल वेगळा!
परिक्रमावासीयांना अर्थातच कुठलाच खर्च नाही. परिक्रमेतल्या उत्तम आश्रमांपैकी एक,
आणि दुर्मिळ!
थोरले बाजीराव
पेशवे यांच्या समाधीच्या गावात - रावेरखेडी - असलेला आश्रम. आश्रम कसला! दोन खोल्या,
एक पडवी, आणि मोठ्ठ अंगण. त्या अंगणातच प्लास्टिकने आडोसा तयार केलेलं बाथरूम आणि त्याच्या
बाजूला थोडा थोडा पक्का असलेला एक संडास. आम्ही लवकर आलो होतो म्हणून आम्हाला पडवीत
जागा मिळाली. उशिरा आले, त्याच्यासाठी हिरव्या छताखाली जागा. त्याहीपेक्षा उशीरा आले,
ते उघड्या आभाळाखाली! अशी व्यवस्था.
परिक्रमेत
असताना मंदिरात रहावं लागतं, असं ऐकलं होतं. त्याचा हा पहिला प्रसंग. भोईंदा गावात
असलेलं हनुमान मंदिर. मुख्य मंदिर आणि तिथे खालती लीनोलियम टाकलेलं. मंदिराच्या एका
कोपऱ्यात जेवण करण्यासाठी असलेली चूल, बाकी परिक्रमावासीयांनी जिथे जागा मिळेल तिथे
आसन लावावं अशी व्यवस्था.
परिक्रमेचा
पाचवा दिवस असावा. मंडवाडा गावात संध्याकाळी साडे चारच्या सुमारास आम्ही आलो, आणि लक्षात
आलं की मुक्कामाचे ठिकाण त्या दिवशी संध्याकाळी गाठणं खूप कठीण आहे. गावात कुठं जायचं
याचा विचार करत असताना बाबुलाल काग यांनी आम्हाला त्यांच्या घरात राहणार का असं विचारलं.
त्यांचं घर घर खूप मोठे आहे. या फोटोत दिसत नाही. आमची व्यवस्था मात्र घराबाहेरच्या
पडवीत होती. वरती छप्पर होतं, पण पुढून हायवे! तीन बाजूने संपूर्णपणे उघड्या अश्या
घरात राहायचा हा आमचा पहिला अनुभव. रात्री पोटभर जेवण झाल्याने झोप मात्र छान लागली!
हा बाबा
लखनगिरी महाराजांचा आश्रम. शूलपाणी जंगलातला एक अत्यंत प्रसिद्ध आश्रम. तसा छोटाच आहे.
दोन खोल्यात तिथले महंत आणि सेवा देणारे साधू राहतात. परिक्रमावासीयांसाठी, बाबा लखनगिरी
महाराजांच्या पुतळ्यापाशी, एक मोठा मंडप टाकलेला होता. वरती मात्र येथे पत्रे होते.
पण बाकी संपूर्ण उघडा. खालती एक प्लास्टिक. त्याच्यावर परिक्रमावासीयांची व्यवस्था.
थंडीचे दिवस जरी होते तरी थंडीला सुरुवात झाली नसल्यामुळे ती रात्र आमची छानच गेली.
हे शूलपाणी
जंगलातल्या भादल गावातलं नक्करसिंग नावाच्या एका पंचविशीतल्या तरुणाचं घर. परिक्रमावासीयांना
सेवा देणं हे त्याचं अत्यंत आवडतं काम. परिस्थितीने खूप साधारण. पण तो आणि त्याचं कुटुंब
परिक्रमावासीयांना सेवा देण्यात स्वतःला खूप धन्य मानतात. आम्हाला त्यांनी सोय करून
दिली होती ती त्यांच्या गाई-म्हशींच्या गोठ्यात. आम्ही शांतपणे गोठ्यात झोपलो, पण गाई-म्हशींनी
मात्र ती रात्र उघड्यावरती काढली.
खप्परमाळ.
शूलपाणी जंगलातलं खूप उंचावरचं गाव. इथून पुढे शूलपाणी डोंगराची उतरण चालू होते. आम्ही
राहिलो होतो तिथे दिवसा अंगणवाडी चालते. त्या फोटोतली बाई आहे तीच त्या अंगणवाडीची
शिक्षिका आहे. म्हणजे दिवसा अंगणवाडी आणि रात्री परिक्रमावासी! ते घर कायमच भरलेलं
असतं,आणि त्या बाईच्या चेहेर्यावरचं समाधान पाहिलं तर असं लक्षात येतं की ती वास्तूच
समाधानी असणार.
ही अशीच
एक आश्रम शाळा. आजूबाजूच्या खेड्यातली आदिवासी मुलं इथे येऊन राहतात आणि शिकतात. परिक्रमावासीयांसाठी
या सगळ्या शाळेमध्ये त्यांनी दोन वर्ग खास वेगळे काढून ठेवलेले असतात आणि जे परिक्रमावासी
संध्याकाळच्या वेळेला तिथून जात असतात त्यांची राहण्याची व्यवस्था या खोल्यांमध्ये
होते.
हे हनुमान
टेकरी या गावातलं हनुमान मंदिर. मोठा मंडप दिसतोय तो काही नेहमी नसतो. आम्ही जेव्हा
पोहोचलो तेव्हा तिथे काहीतरी एक यज्ञ झाला होता आणि त्याच्यामुळे हा मंडप घातला होता.
पाचशे ते सहाशे परिक्रमावासी मंडपामध्ये आठ दिवस रहात होते असं कळलं. आम्ही इथे रात्री
थांबलो नाही, पण जर संध्याकाळी पोचलो असतो तर नक्कीच थांबू शकलो असतो.
हा एक मोठा
आश्रम, भरूच गावातला. श्री जगद्गुरू शंकराचार्य यांचा मठ. म्हटलं तर छोट्याशा दोन खोल्या
आहेत आणि त्याच्या पुढे एक मोठे वडाचे झाड. वडाच्या झाडाभोवती आजूबाजूला पत्रा घातलेला.
खालती शहाबादी फरशी. परिक्रमावासीयांनी इथे कुठेही आपलं आसन लावून झोपावं अपेक्षा
- साधी आणि अगदी सोपी व्यवस्था. जेवणाची वेळ आली की झोपलेले लोक उठून बसतात आणि आणि
तिथेच पंगत तयार होते.
मैया किनारी
असलेला देवरोली गावातला हा बकुळ आश्रम. अत्यंत सुबक, सुरेख, स्वच्छ. दोन मजली छोटाशी
इमारत! परिक्रमेत जे काही अत्यंत सुरेख आश्रम सापडले त्यापैकी हा एक. अर्थात आम्ही
दुपारी पोहोचलो होतो त्यामुळे रात्री इथे राहू शकलो नाही, पण जर राहू शकलो असतो तर
सुरेख व्यवस्था झाली असती यात शंका नाही.
वाळेश्वर
गावातल्या नदीकिनारी असलेला हा एक आश्रम, खुद्द आश्रम खूप मोठा आहे पण परिक्रमावासीयांसाठी
मात्र ही एक छोटीशी खोली किंवा हॉल. तिन्ही बाजूंनी पत्रे आणि समोरून उघडा. भरपूर थंडीचा
त्रास झालेला हा पहिला आश्रम.
लुनहेरा बुजरुक या गावात असलेलं हनुमान मंदिर. मुख्य प्रशस्त हॉल. खालची
स्वच्छ जमीन आणि वरती पत्र्याची शेड म्हणून आश्रम या व्याख्येत अगदी चपखल बसणारी जागा.
लक्कडकोट
जंगल हा परिक्रमेतला आणखीन एक महत्वाचा आणि अगदी उत्सुकतेने वाट पाहायला लावणारा टप्पा. पंधरा ते सतरा किलोमीटरचा, जंगलातून जाणार्या या
रस्त्यावर खाण्यापिण्याची सोय नाही आणि कसलीच
वस्ती पण नाही. त्यामुळे परिक्रमावासी हा टप्पा बहुदा सकाळी सुरू करून दुपारपर्यंत
पार करतात. हा टप्पा सुरू होण्याआधी जयंती माता नावाचे एक मंदिर आहे आणि तिथे एक मोठा
सुरेख हॉल आहे. हा त्याचा फोटो. जयंती मातेच्या बाबतीतची आख्यायिका अशी की ही सीता
मैयाची दासी होती. तीने लव-कुश यांना जन्म
देण्यामध्ये दाईचं काम केलं होतं. या देवीची मूर्ती जिभेच्या आकाराची आहे. जयंती माता
ही जिव्हादेवीचे प्रतीक आहे अशी या मंदिराबद्दल दुसरी आख्यायिका आहे.
हे असंच
एक अन्नक्षेत्र. एक खोली आहे, ज्याच्यात सहा ते सात लोक राहू शकतात. उरलेल्यांनी बाहेरच्या
पडवीत झोपायचं. त्याच्यापेक्षाही जास्त लोक आले तर सिमेंटची फरशी आहेच!
रमपुरा
गावातलं हे अन्नक्षेत्र. त्याचं नाव सेवाश्रम आहे, पण आहे खरंच झोपडीच. तिथे सेवा देणाऱ्या
सेवेकऱ्यांच्या मनाच्या श्रीमंतीचा विचार केला तर त्याला 'महाल' असे म्हणायला हरकत
नाही.
झांसी घाट
इथला हा गोमुख आश्रम. आहे एक गोशाळा, आणि त्या गोशाळेच्या शेजारी चारा ठेवायला एक मोठी
खोली आहे त्या खोलीत आम्ही रात्री झोपलो. रात्रीच्या सुरेख जेवणामुळे झोप छान लागली
आणि सकाळी गाईंच्या हंबरण्याने व्यवस्थित जाग आली.
हर्रई टोला - अमरकंटक जवळ असलेले एक छोटेसे खेडेगाव. शाळेमध्ये आणि त्या शाळेसमोरच्या पंचायत ऑफिसमध्ये परिक्रमावासियांची राहण्याची व्यवस्था रात्री करतात. आम्ही पोहोचलो त्याच्या दुसर्या दिवशी 26 जानेवारी असल्यामुळे, शाळा आणखीनच छान स्वच्छ करून ठेवलेली होती.
हर्रई टोला - अमरकंटक जवळ असलेले एक छोटेसे खेडेगाव. शाळेमध्ये आणि त्या शाळेसमोरच्या पंचायत ऑफिसमध्ये परिक्रमावासियांची राहण्याची व्यवस्था रात्री करतात. आम्ही पोहोचलो त्याच्या दुसर्या दिवशी 26 जानेवारी असल्यामुळे, शाळा आणखीनच छान स्वच्छ करून ठेवलेली होती.
लालपुर-माल
गावात संध्याकाळी, 'कुठे राहण्याची व्यवस्था आहे का? मंदिर आहे का?' असं आम्ही विचारत
होतो, तेव्हा अशोक तिवारी नावाचे एक सद्गृहस्थ आमच्या समोर येऊन थांबले आणि आम्हाला
म्हणाले, 'चलो हमारे घर. आज रात वहीं रुक जाना'. त्यांनी आमची सोय त्यांच्या घराच्या
पडवीत केली. ही परिक्रमेची प्रथाच आहे. घरात जागा असते पण परिक्रमावासियांची सोय नेहमीच
पडवीतच करतात. पण सुरेख आतिथ्य आणि त्यांच्या वृद्ध आईशी गप्पा मारताना आमची संध्याकाळ
मात्र खूप छान गेली.
परिक्रमा
सुरू झाल्यानंतर दोन तीन आठवड्यात, राहण्याच्या
जागेकडून आमची अपेक्षा म्हणजे डोक्यावरती छप्पर आणि जवळपास कुठेतरी एखादी पाण्याची
सोय - विहीर, बोअरवेल, किंवा एखादा सार्वजनिक नळ, किंवा मैया - इतकी सोयीस्कररित्या
कमी झालेली होती. मग इतर गोष्टींसाठी संडास असेल तर वाहवा - नाहीतर - 'होल व्हावर इज
अवर्स' अशी सोयिस्कर समजूत! सर्व काही मैयाभरोसे आणि मैयार्पण! नर्मदेऽ हर!!
या आणि परिक्रमेच्या इतर अनुभवांविषयी अजून वाचायचं असेल तर esahity.in वर प्रसिद्ध झालेलं "दोन बुद्धीवाद्यांची नर्मदा परिक्रमा"
हे पुस्तक जरूर वाचा.
बापरे कोणकोणत्या ठिकाणी कधी गोठा काय कधी आभाळाखाली तर कधी पडवीत रात्र काढणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. Hats off to you. Whole vahaver is ours हे शेवटी खरं.
ReplyDeleteफोटो छानच, अभिजीत तुझ्या आणि मीनल च्या परिक्रमेचे वर्णन फारच सुरेख आहे. "दोन बुद्धीवाद्यांची परिक्रमा" या पुस्तकात मी सगळं सविस्तर वाचले आहे. सर्वांनी जरूर वाचावे
ReplyDeleteNarmade har...kal devbhumi narmada hya aaplya group var tumcha sunder mahiti anubhav kathan karnara audio aaikla...aaj ashram vasvastha photo ani mahiti ...khup upyukta aahe...parikrama kartana maiyya sobat karte hech reality...
ReplyDelete