पॉट आईस्क्रीम


 

उकाड्याच्या या दिवसांमध्ये दिवसभर थंडगार पाणी पिऊनही तहान शमत नव्हती. भूकही मंदावली होती. रात्रीची जेवणे झाल्यावर.... चला आईस्क्रीम खायला जाऊ.... असे हे आता वारंवार होऊ लागलेले.....पण दुकानात हीऽऽ गर्दी! काचे खाली आईस्क्रीम चे पेस्टल कलर.... हलके पिवळे.... पांढरे.... गुलाबी.... चॉकलेटी....पिस्ता... किरमिजी..... डोळ्यांना सुखद वाटणारे.... थंडगार.... विविध चवींचे रंग! नक्की कुठला घ्यावा?.... मनात गोंधळ निर्माण करणारे! विविध प्रकारच्या कैंडी.... रंगीबेरंगी.... रसाळ.... जीभेवर ठेवताच पाणी पाणी होणाऱ्या...... गार गार गारवा घशातून पोटात उतरवणार्‍या! भिंतीवर आईस्क्रीमच्या गोळ्यांची विविध आकर्षक चित्रे.... मनातला गोंधळ अजूनच वाढवणारी!

 

आईस्क्रीम निवडीच्या या सोहळ्यात ....एवढ्या गर्दीतही मी मात्र हळूच तिथून कधी निसटले आणि बालपणीच्या आईस्क्रीम मधे कधी विरघळले....माझे मलाच कळले नाही. मोठी शहरे सोडली तर तेव्हा आईस्क्रीम सगळ्या गावांमध्ये मिळत नव्हते. उन्हाळा जवळ आला की पत्र्याच्या लाकडी दांडा असलेल्या झाकणाच्या डब्यातून शाळेच्या मधल्या सुट्टीत बाहेर आइस फ्रूट ....ज्याला आम्ही 'आइस स्प्रोट' म्हणायचो....(कोणाला इंग्रजी माहीत होतं?) ते विकायला एक माणूस उभा असायचा. गडद गुलाबी..पिवळ्या..केशरी रंगाच्या त्या नुसत्या बर्फाच्या गोडसर चवीच्या कैंड्या आम्हाला खुणवायच्या. घरातून असलं काही खायला मनाई होती. ते पाणी चांगलं नसतं....परीक्षा जवळ आलीय....आजारी पडायचं नाही...वगैरे...वगैरे!

 

मग हळुहळु  याच्या जोडीला रंगीबेरंगी बाटल्यांनी सुशोभित केलेल्या बर्फाच्या गोळ्यांची पण गाडी यायला लागायची. खसाखसा किसून खाली पडणारा बर्फाचा पांढरा शुभ्र कीस मनातली तगमग जरा गार करायचा. पुढची प्रक्रिया खूपच देखणी.... डोळ्यांचं पारणं फेडणारी....हा सगळा बर्फ एका झटक्यात मुठीत आवळून त्यामध्ये एक काडी खुपसून मग ऑरेंज.... काला खट्टा... लेमन....मँगो... असा तो रंग त्यावर ओतायचा.कुठला फ्लेवर पाहिजे हे आधीच मनात पक्के करून पटकन् सांगावं लागायचं....नाहीतर हाताला येईल त्या बाटलीतला रंग त्या बर्फाच्या गोळ्यावर ओतून बर्फवाला मोकळा व्हायचा. तो बर्फाचा गोळा घन स्वरूपात ओठांनी चोखून त्याचा थंडगार स्वाद जीभेवर खेळवत खेळवत घशात उतरवताना कोण धावपळ व्हायची. इतक्या लहान वयात समाधी अवस्था बघायची असेल तर बर्फाचा गोळा खाणाऱ्या मुलांकडे बघावं!

 

एक तिसरा प्रकार म्हणजे एका चौकोनी पेटीत लाल फडक्यात गुरगुटून बसलेली कुल्फी! तो फडक्याचा बुरखा दूर केला की शिस्तीत उभ्या असलेल्या काड्यांच्या लाईनी तेवढ्या दिसतात. पत्र्याच्या साच्यात बंदिस्त तो दुधाळ... गार गार पदार्थ ....तो साचा पाण्यात बुडविल्यावर काडीसकट बाहेर यायचा. म्यानातून तलवार काढावी तशी तो गाडीवाला सपकन् बाहेर काढून खूप मोठ्ठं बक्षीस द्यावं या आविर्भावात ती काडी आडवी धरून आमच्या हातात द्यायचा. इथे खाली धरायला बशी बिशी काही नाही. ओठांचा चंबू करून ते शोषून घेण्याचा तुमचा स्पीड महत्वाचा. तसंच तिरक्या नजरेने आपल्याला ती काडी दिसणे पण आवश्यक! कुठे बारीक....कुठे जाड कळलं पाहिजे.नाहीतर नुसतीच काडी तोंडात आणि कुल्फी जमिनीवर धराशाही! आणि ती तशी बघणं या सारखं मोठं दुःख बालपणात नाही!

 

तर हे सगळे प्रकार झाले शाळेच्या बाहेरचे. आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्याला जायचो. सगळी भावंडे आणि मोठी माणसे मिळून कमीत कमी पंचवीस जण. मग गारेगार आईसक्रीमचा बेत आखला जायचा. तो पर्यंत आंबाही बाजारात आलेला असायचा. त्या वेळी आईसक्रीम चा पॉट भाड्याने मिळायचा,.. तासावर! काका तो पॉट घेऊन यायचा. जरा वयाने मोठी मुलं बर्फ आणि खडे मीठ आणायला पिटाळली जायची. घरातल्या बायका आदल्या दिवशीच भरपूर दूध आणून ते आटवून ठेवायच्या. दुपारी आंब्याचा रस काढून तयार असायचा. आमच्यासाठी तो दिवस सोनियाची पावले घेऊन यायचा. त्यादिवशी सगळे शहाणे व्हायचे. पटापट आंघोळी उरकायचे. मोठी लोकं सांगतील ती कामे मन लावून भराभर पार पाडायचे. जेवताना ताटात येईल ते मुकाट्याने खायचे. होऊ घातलेल्या त्या आईस्क्रीमची किमयाच तशी होती. आयुष्यात चांगल्या आणि आवडत्या गोष्टींसाठी प्रदीर्घ वाट बघावी लागते आणि त्यासाठी संयम आणि कष्ट आवश्यक आहेत याचे धडेच अशा गोष्टीतून आम्ही शिकलो असे आता वाटते.

 

पॉट तासावर असल्याने एकही मिनिट वाया जाऊ नये याची चोख व्यवस्था ठेवली जायची. आंब्याचा रस दुधात एक जीव होऊन गडद केशरी रंगाचा झालेला दुधाळ केशरी रंग फार गोड दिसायचा. बर्फ आणि खडे मिठाच्या मोठमोठ्या पिशव्या जिथे पॉटची स्थापना करायची त्याच्याजवळ ठेवलेल्या असायच्या. शक्यतो घरातील मोरी जवळची जागा निवडण्यात यायची. म्हणजे पॉट मधील पाण्याचा निचरा करणे सोपे जायचे. मोठी माणसे पण त्यादिवशी माझ्याच वयाची असल्यासारखी बालसुलभ कुतूहल चेहऱ्यावर असलेली मला भासायची. वाड्याच्या दारातून काकाला पॉट हातात घेऊन येताना पाहिलं की कोण लगबग सुरू व्हायची. त्यात वयाने मोठे असलेले भाऊ हातात मोठा स्क्रू ड्रायव्हर घेऊन बर्फ फोडायला धावायचे. आम्हीही त्यांच्या मागोमाग बर्फाचे उडालेले तुकडे गोळा करायला आणि ते गालात ठेवून गार गार पाणी तोंडात धरायला पळायचो. पहिले काही तुकडे चघळले की जिभा गार गार... जड व्हायच्या. मग मुद्दामच "र" असलेले शब्द शोधून ते एकमेकांना बोलायला लावायचे आणि एकमेकांचे या वयातील बोबडे बोल खिदळायला लावायचे.

 

तोपर्यंत आईस्क्रीम पॉटच्या मधल्या भांड्यात आंब्याचे दूध ओतलेले असायचे. झाकण लावून एका आड एक बर्फ व खडे मिठाचे थर टाकले जायचे. मग वयाप्रमाणे आम्ही रांगेत उभे राहायचो..... ही सवय पण तेव्हापासूनच अंगात मुरली! घरातील लिंबू टिंबूंनाही आईस्क्रीम करायचा आनंद मिळायचा. दूध पातळ असेपर्यंत पॉटचा दांडा भराभर फिरायचा. आमचा नंबर लागे पर्यंत तो जरा जड झालेला असायचा. कोणी फुसका असेल, लवकर दमला तर मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत सगळे त्याला चिडवायचे....... इज्जत का सवाल! मग दात ओठ खाऊन सगळी ताकद पणाला लावायची.दंड... हात भरून यायचे. घामाच्या धारा लागायच्या. पण मोठ्यांनी 'बास' म्हणेपर्यंत थांबायचे नाही...... म्हणजे तुम्ही जिंकलात!

 

प्रत्येकाचा वेळ मोजला जायचा.....स्पर्धाच जणू.... कोणी किती वेळ फिरवला..... त्याला आईस्क्रीम जास्त! शेवटी तो दांडा जागचा हलायचा नाही. आतील आईस्क्रीम घट्ट होऊ लागल्याची ती खूण! इंतजार की घडी लवकरच खतम होणार याची मनात गुदगुदी वगैरे निर्माण व्हायची. मग आमचा पहेलवान काका एकटाच पॉट फिरवायचा..... इकडे वाट्या चमच्यांचे आवाज मनात घंटी बजाके एन्ट्री करायचे. उत्कंठा शिगेला पोहोचायची..... काकाचा स्पीड थोडा जरी कमी झाला तरी आमची पावलं पॉटकडे वळायची. काका नजरेनेच नाही म्हणाला की आम्ही परत बॅकफूटवर! शेवटी काकाचा हात थांबायचा!

त्याचाही चेहरा आनंदाने फुललेला असायचा. घाम पुसून मग तो जमिनीवर फतकल मारायचा.

 


आम्ही सगळे वाट्या चमचे हातात घेऊन गोल करून बसायचो. आमटीचा गोल डाव पॉट मध्ये खुपसून बाहेर आलेल्या त्या दुधाळ केशरी रंगाच्या गोळ्याच्या प्रथम दर्शनाने, इतक्या वेळच्या प्रतीक्षेचा अंत व्हायचा. यातही नंबर..... आधी लिंबुटिंबु.... मग आमचा नंबर! नंतर पिन ड्रॉप सायलेन्स! फक्त वाट्या चमच्यांचे आवाज! एखाद्याच्या तोंडून आवाज आलाच खाताना तर डोक्यावर टपली मिळायची. म्हणून मग सावकाश... नीट खायचं.... पोट भरून आईस्क्रीम खायचं..... काकाचं... घ्या...रे... अजून... संपायचंच नाही. शेवटी पोटातच जागा नसल्याने नाईलाजाने नको तोंडातून यायचं.

 

तर असा हा आईस्क्रीम सोहळा कधीही न विसरता येण्यासारखा! प्रत्येक सुट्टीतला. कितीही महागडी आईस्क्रीम्स खाल्ली तरी त्याची गोडी आणि तृप्ती या आईस्क्रीम सारखी नाही!


माधुरी राव



3 comments:

  1. खूपच गोड अनुभव,तुमच्या लिखाणातून हे सर्व अनुभवायला मिळाले. धन्यवाद.

    ReplyDelete
  2. खरंच लहानपणीच्या सुखद आठवणी जाग्या झाल्या. मस्तं लेख!!

    ReplyDelete
  3. आम्ही पण पुण्यात सुट्टीत वरील सर्व प्रकार केले आहेत, खूप छान आठवणी जाग्या झाल्या , सुंदर लिहिले आहे

    ReplyDelete