युद्धभूमीत
आणी क्रिडांगणावर आपणांस वारंवार संघशक्तिच्या पराक्रमाची प्रचिती येते.
चिकित्सालयात पण जेंव्हा एखाद्दा रूग्णाचा जीव अनेक जणांच्या सामुहिक प्रयत्नांने वाचतो तेंव्हा ती
घटना अविस्मरणीय होउन जाते. अश्याच एका प्रसंगाची ही हकिकत आहे.
कोठल्याही
दवाखान्यात दुपारी दोन-अडीचची वेळ जराशी सुस्तावलेली असते. सकाळचे राउंडस् घेउन
झालेले असतात, ऑपरेशन
लिस्ट पण संपत आलेली असते आणि बऱ्याच कर्मचाऱ्यांचे जेवणाचे डबे उघडू लागतात. अश्याच
एका दुपारी, मळक्या कपड्यातील एक बिगारी कामगार आपल्या सहा-सात वर्षांच्या मुलीला
हातांवर घेऊन
धावत आंत आला. त्या मुलीच्या श्वासनलिकेत
तिने गिळलेले नाणे अडकले होते. त्याचा परिणाम होऊन तिचा श्वास बंद होण्यापर्यंत आला
होता आणि ती निळी (cyanose)
पडू लागली होती.
प्रसंगावधान राखून रिसेप्शनिस्टने ट्रॅालीची वाट न पाहता, आपल्या हातांवर घेऊन त्या मुलीला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले. तेथे एनएस्थेसीओलॉजिस्ट आपले काम आवरत होत्या व दोन
कान-नाक-घसा सर्जनस् कपडे बदलत होते. रूग्णालयात उपस्थित असलेले दोन कार्डिओलॉजिस्ट आणि एक इंटेंसिव्हिस्ट धावत तेथे आले.
तोंवर,
मुलीला ऑक्सिजन
सुरू केले गेले होते व घशातले नाणे काढण्याचे प्रयत्न सुरू
झाले होते. ते नाणे श्वासनलिकेत घट्ट अडकून बसल्यामुळे घश्यातून ओढणे जमत नव्हते.
त्यांत तशा प्रयत्नांत, त्या मुलीची ह्रदयक्रिया दोनदां थांबली पण
दोन्ही वेळेस ती सुरू करण्यात यश आले. अश्या आणिबाणीच्या अवस्थेत, इतर काही पर्याय
दिसत नसल्यामुळे, ई.एन्.टी सर्जनने आपल्या हाताच्या एका फटक्याने ( with one clean sweep of the knife) श्वासनलिकेला छेद दिला व आपली करंगळी आत घालुन ते नाणे ओढून काढले. सर्व डॉक्टरांनी आपला रोखलेला श्वास सोडला व
आलेला घाम टिपला. ऍनेस्थेसिस्टने घशातील स्त्राव सक्शन मशीनने कोरडा केला,
ईंटेसिव्हिस्टने शिरेतून योग्य ती औषधे दिली व त्या मुलीला
आय.सी.यू. मध्ये हालविण्यात आले.
दुसऱ्या दिवशी सर्वांनी जेंव्हा त्या अजाण मुलीला आपल्या पलंगावर
पत्यांचा डाव मांडून बसलेले बघितले, तेंव्हा बरेच डोळे पाणावले व अनेक हात आकाशाकडे पहात जोडले गेले. त्या समूहातील प्रत्येक चिकित्सकाने आपल्या प्रयत्नांची
पराकाष्ठा केली होती व प्रथम श्रेणीच्या कुशलतेची ग्वाही दिली होती. म्हणूनच त्या मुलीला वाचविणे शक्य झाले
होते.
त्या
बिगारी कामगाराने रूग्णालयाच्या कार्यकारी विश्वस्तांच्या, जे स्वत: एक प्रसिद्ध व
निष्णात सर्जन आहेत, टेबलावर आपले खिसे उपडे केले तेंव्हां त्यांतून काही
चुरगळलेल्या नोटा बाहेर पडल्या. डॉक्टरांनी सगळे बिल माफ केल्याचे एैकल्यावर त्या
पित्याला काय म्हणावे हे कळेना.
हॉस्पिटलातील सारे जण मात्र एक निष्पाप जीव सगळ्यांच्या
प्रसंगावधानामुळे वाचला ह्याच आनंदात मग्न होते.
डॉ.दिलीप कानडे
रुग्णालयातली emergency room म्हणजे हरघडीला वेगळं नाट्य! आणि रुग्णांच्या तब्येतीबरोबर डॉक्टरांच्या आशानिराशेचा खेळ. वैद्यकीय आणि शिक्षण पेशातल्या व्यक्तींना इतरांचे मनापासून धन्यवाद मिळण्याचं भाग्य असतं .. तो आनंद आपल्याला सुद्धा मिळाला! अभिनंदन...
ReplyDeleteत्या मुलीला डॉक्टरांनी पुनर्जन्मच दिला.👃
ReplyDelete