प्रयत्ने वाळूचे...

 



आमच्याकडे गृहपाठाची आठवण रात्री झोपण्याआधी होणे आणि मग त्याचं टेन्शन घरात सगळयांना देणे हा वर्षानुवर्षं चालत असलेला उपक्रम आहे. 'वडिलो'पार्जितच म्हणाना. पण कधी कधी ह्यातून वाचण्यासाठी कु. दिपू काही युक्त्या लढवते. गेल्या आठवड्यात तिने झोपण्याआधी घरातल्या प्रत्येकाला सहज असा म्हणून एक प्रश्न विचारला आणि तीन चार वाक्यात उत्तर द्यायला लावलं. आणि त्या उत्तरांना एकत्र करुन चक्क निबंध म्हणून शाळेत जमा केला. प्रश्न असा होता, "जगातील तेल संपलं तर काय होईल?" आता त्यातून निबंध काहीसा असा तयार झाला - 



'जगातलं तेल संपणं अशक्य आहे. आमच्या कुलदैवताच्या देवळातला नंदादीप गेली सत्तर वर्षं न विझता राहिलेला माझ्या आजीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. साईबाबांनी तर तेलाशिवायच दिवाळीचे दिवे उज्वलीत केले होते. तेल संपले तरी भक्ती आणि निष्ठा संपू नये. आपल्या संतांनी तर म्हटलंच आहे "प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेल ही गळे". तेल संपले तर पावसाळ्यात खमंग भजी मिळणे कठीण. पण आपण तुपात तळून पाहू शकतो कशी लागतात ती.

"तेल संपलंय. जरा आणतोस का पटकन?" असं जेव्हा आई ओरडून बाबाला सांगेल तेव्हा चुरशीने चालू असलेली क्रिकेटची मॅच किंवा उत्कंठा शिगेला पोचवणारा सिनेमाचा शेवट टाकून बाबा खाली न धावता "जाऊ दे. सगळ्या जगातलंच तेल संपलंय म्हणे." असं म्हणून टीव्ही समोर पाय वर करून तसाच बसून राहिल. तेल संपलं तर रोज सकाळी माझ्या वेण्या घालणं म्हणजे मोठं कठीण काम होऊन बसेल. आपण एअर फ्रायर आणू म्हणून आई कधीपासून बाबाच्या मागे लागली आहे. त्याने तेलाची खूप बचत होते. आणि कॉलेस्ट्रॉल नियंत्रणासही त्याचा फायदा होतो. जगातलं तेल संपलं तर आपण बेकींग करुन बरेच पदार्थ बनवू शकतो. आमच्याकडे गेल्या दिवाळीत ओव्हन आणलाय. त्यात आम्ही शंकरपाळ्या आणि करंज्या बेक केल्या होत्या. पण बाबा आणि आजीने ते पाहून नाकं मुरडली.'

 

वरील निबंध वाचून दिपूच्या वर्गशिक्षिकेने आम्हाला चिठ्ठी पाठवून शाळेत येण्याचे आमंत्रण दिले. घरी परतताना मी दिपूला समजावलं, "पुढल्या वेळेस असे प्रश्न विचारशील तेव्हा का विचारतेयस हे ही सांगत जा. हा निबंध इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या तेलाबद्दल होता."

"बाबा, मला कळलं ते शाळेत आल्यावर. म्हणून मी पण शेवटी दोन ओळी टाकल्या."

"ग्रेट. काय लिहीलंस?"

"तेलाचे साठे हे सौदी अरेबियासारख्या वाळवंटी प्रदेशात सापडणे ह्यात नवल ते काय? संतांनी म्हटले आहेच, 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे'. तिथले लोक नक्कीच खूप मेहनती असावेत. जोपर्यंत ते प्रयत्न आणि मेहनत करतील तोपर्यंत जगातलं तेल संपणे शक्य नाही."

 

आम्ही पुढे काही न बोलता घरी आलो आणि निबंध पुन्हा लिहावयास घेतला.

 

मानस


2 comments: