"सुरमयी सायंकाळ" विथ आर्या आंबेकर


"सुरमयी सायंकाळ" विथ आर्या आंबेकर




  
आपल्या सर्वांना परिचित असलेली आर्या आंबेकर बंगलोरला कार्यक्रमासाठी येतेय म्हटल्यावर आमच्या सर्वांच्याच मनात जवळपास दहा वर्षांपूर्वी झालेल्या झी टीव्हीच्या ‘सारेगमप’ मधला सुंदर चेहरा Pretty Little Girl समोर आला. अतिशय गुणी, हसरी, नम्र, अतिशय गोड आणि जादुई आवाजाची देणगी लाभलेली आणि सर्व प्रकारची गाणी ताकदीने सादर करणारी चौदा वर्षांची आर्या डोळ्यासमोर आली. प्रत्येक एपिसोडमध्ये उत्तम मार्क आणि वाहवा मिळवणारी, खरोखर विजेतेपदासाठी दावेदार असणारी आर्या, परीक्षकांची आणि प्रेक्षकांची आवडती गायिका आर्या आंबेकर. आर्याने या कार्यक्रमांमध्ये अनेक उत्तमोत्तम गाणी सादर केली. तिच्या पान खाये सैंया हमारो या गाण्याला परीक्षकांकडून वरचा नी पर्यंत (२०० %) गुण मिळाले. हा विक्रम सा रे ग म प च्या त्या आधीच्या ८ पर्वात अबाधित होता. Blessings in disguise म्हणतात तसे काहीसे झाले. काही कारणवश जरी विजेतेपद मिळाले नाही तरी तिने उत्तम रियाज चालू ठेवला. उत्तम मार्काने शिक्षण पूर्ण केले. अनेक अल्बम, सिरियल्सची टायटल song, चित्रपट गीते असा प्रवास करत आज वयाच्या २४ व्या वर्षी गायिका ते नायिका असा प्रवास चालू आहे. सोज्वळ आणि लोभस असा चेहरा असलेली अभिनेत्री मराठी पडद्याला बऱ्याच दिवसांनी मिळाली आहे. अनेक पुरस्कारांची विजेती आर्या इतके यश मिळवूनही अजूनही नम्र आहे. माणिक वर्मा स्कॉलरशिप मिळालेली सगळ्यात लहान गायिका आहे.
मित्रमंडळ बंगळूरूने २७ ऑक्टोबर २०१८ रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्याने ‘आर्या आंबेकर- सुरमयी संध्याकाळ ‘ हा कार्यक्रम आणून आम्हा सर्वाना मेजवानी दिली. आर्याची गाणी आणि तिच्याबरोबर झालेल्या गप्पा ऐकून एका गुणी गायिकेचा गानप्रवास अनुभवायला मिळाला. आर्याची सर्वांगीण प्रगती बघून आम्हा सर्वांनाच आपल्या घरातील कोणीतरी जेव्हा यश मिळवते तेव्हा वाटणारे कौतुक आणि अभिमान वाटला. कीबोर्ड, तबला आणि ऑक्टोpad यांच्या आणि सौरभ दफ्तरदार  याच्या दमदार साथीने उत्तम कार्यक्रम ऐकायला मिळाला. जवळजवळ अडीच-तीन तास चाललेल्या कार्यक्रमाची कमान चढतीच होती.


कार्यक्रमाची सुरुवात दयावंत, बुद्धिवंत गणनायकाच्या स्वरपूजनाने झाली. ज्याच्या स्मरणानेच सर्व कार्यांची सिद्धी होते अशा गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतला. गोस्वामी तुलसीदास लिखित ‘जे हि सुमिरन सिद्धी होई’ हा अवधी भाषेतील सोरठा अत्यंत मधुर आवाजात गायला. आर्याने घेतलेला पहिला आलाप ऐकल्यावरच एकूण कार्यक्रमाचा अंदाज आला. लगेचच १५ शतकातील संत पुरंदरदास रचित हरिप्रिया लक्ष्मीचे वर्णन करणारे, ‘सौभ्याग्यदा लक्ष्मी बरम्मा’ हे पद खास बंगळूरूकराकरिता म्हटले. सर्वपरिचित ह्या पदाने बहार आली. त्यानंतर आर्याचा साथीदार सौरभ दफ्तरदार याने त्याच्या दमदार आवाजातील अभंगाने समा बांधला. त्याने हरिपाठातील ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी’ गायला. आम्हा सर्वांचे भाग्य ह्या कार्यक्रमाला हिंदुस्तान आणि कर्नाटक संगीत गाणाऱ्या उभयगान विदुषी श्यामला भावे उपस्थित होत्या. त्यांचाही सत्कार करण्यात आला. एकताल ह्या तालात बांधलेली गाणी गायला अवघड असतात पण अतिशय लीलया पेलत आर्याने तीन गाण्याचे मेडले सादर केले. श्रीधरजी फडके यांनी संगीतबद्ध केलेली आणि शांताबाई शेळके यांच्या अतिशय सुंदर रचना – ‘ऋतु हिरवा ऋतु बरवा, पाचूचा वनि रुजवा युग विरही हृदयांवर सरसरतो मधु शिरवा ‘ आणि घन रानी साजणा! मी कशी तुझ्यासवे चुकले वाट रे, सांग ना घन रानी साजणा! सादर केल्या. मेडले मधले तिसरे गीत नितीन आखवे लिखित मी राधिकामी प्रेमिका तन श्याम, मन श्याम, प्राणसखा घन:श्याम  हे मधुकंस रागातील गीत आर्याने अप्रतिम म्हटले.




त्यानंतर मूड बदलत आर्या आणि सौरभने ‘नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी’  हे युगुलगीत सादर केले. श्रेष्ठ संगीतकार नुसता अर्थ शोधत नाही, तर त्या कवितेला आपला स्वत:चा अर्थ देऊन तिच्या भव्यतेत आणि सूक्ष्मतेतही भर घालतो. अशा श्रेष्ठ संगीतकारांमधील सर्वश्रेष्ठ नाव म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर! बाळासाहेबांची गाणी म्हणायलाही अवघड असतात. असेच सुंदर आणि भक्तीगीत वाटावे असे गीत त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का त्या प्रकाशी तारकांच्या ओतिसी तू तेज का त्या नभांच्या नीलरंगी होऊनिया गीत का ? हे गीत सौरभने म्हटले. सौरभही सारेगमप चा contestant होता. त्यांनी अनेक जिंगल्स म्हटलेली आहेत तसेच उषा मंगेशकर यांच्या ग्रुपमध्ये तो गातो. त्यानंतर आर्याने ‘साजण आला’ आणि ‘येऊ कशी प्रिया’ ही उडत्या चालींची गाणी म्हटली. सर्वांचे फोरएवर आवडते गाणी ‘पाहिले न मी तुला’ हे युगलगीत आणि ‘ केव्हातरी पहाटे’ ह्या सोलो गाण्यांनी वाहवा मिळवली. मराठी गाण्यांचा कार्यक्रम आणि लावणी नाही असे कसे होईल? मध्यंतराच्या आधी आर्यांनी ‘उगवली शुक्राची चांदणी’ हे तर सौरभने ‘ग साजणी...कुण्या गावाची’ ह्या लावण्या म्हणून धमाल उडवून दिली. इथे एक मुद्दाम सांगावे लागेल, तबलावादक विशाल यांनी तबल्यावर अप्रतिम ढोलकी वाजवली. कुठेही ढोलकीची कमतरता भासली नाही. हा पीस जरूर ऐका. त्यांनी कार्यक्रमात एकदम जान आणली.



लहान वयात सेलिब्रिटी होण्याऱ्या कलाकारांबद्दल आपल्याला नेहमीच उत्सुकता असते. आम्हा सर्वांनाच ती होतीच, त्याप्रमाणे आम्हा सर्वांच्या मनातील सगळे प्रश्न शर्मिलाताईनी आर्याला विचारले. तिच्या गाण्याची सुरुवात कशी झाली? सारेगमपनी तिला काय दिले? शाळेनी कशी साथ दिली? बक्षिसे कुठली मिळाली? तिने शिक्षण काय घेतले आहे? तिचा सुरेश वाडकरयांच्या बरोबरचा अविस्मरणीय अनुभव काय होता? अल्बम आणि चित्रपटाची सुरुवात कशी झाली? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ऐका तिच्याचकडून...

कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आर्यांनी सगळ्या दिग्गज गायिकांची गाणी म्हणली तर उत्तरारार्धात स्वतःची म्हणजे अल्बम, सिरीयल आणि चित्रपटातील गाणी म्हणून मजा आणली. तिचा स्वतःचा चित्रपट ‘ ती सध्या काय करते? ह्यातील सगळ्या तरुणाईला आवडणारे ‘हृदयात वाजे समथिंग’ गाऊन सर्व प्रेक्षकांनाही म्हणायला लावले. त्यानंतर तुला पाहते रे आणि दिल दोस्ती दुनियादारी ह्या सिरियल्स ची title song म्हणून त्याला once more मिळाला. २०१४ प्रदर्शित दिवा लागू दे रे देवा ह्या अल्बममधील ‘सजण दारी उभा’ ही सुरेश भटांची अप्रतिम रचना गायली. तिच्या आई सौ. श्रुती आंबेकर ह्या तिच्या गुरु. त्यांनी बांधलेली ‘प्रिया बिन बरसत रहू दिन रैन’ ह्या बंदिशींनी तर चार चांद लावले. त्यानंतर लतादीदींची गाणी गायची फर्माईश येणे साहजिकच होते त्याप्रमाणे ‘लग जा गले’ आणि ‘बाहो मी चले आओ’ म्हणून सगळ्यांना मागच्या ३ दशकात घेऊन गेली.


आर्या आणि सौरभ बरोबर वादक सहकारीही गुणी होते. सर्वांनी अप्रतिम वादन केले. सर्वचजण professional कलाकार आहेत हे पदोपदी जाणवत होते. विशाल, रोहन, अमृता आणि अनय यांनी खूपच छान साथ दिली. ह्या सगळ्या हिऱ्यांना बांधून ठेवणारा सोन्याचा धागा म्हणजे नम्म बंगळूरू च्या शर्मिलाताई फाटक यांनी अतिशय छान सूत्रसंचालन केले. छान अभ्यास, गाण्याची जाण, मधाळ आवाज आणि हजरजबाबीपणा यामुळे त्यांनी कार्यक्रमात अजून रंगत आणली.

कार्यक्रमाची अखेर एकदम हायनोट वर आर्यांनी आश्विनी ये ना या सदाबहार गाण्यांनी तर सौरभनी लल्लाटी भंडार ह्या गाण्यांनी केली. शेवट मात्र वंदे मातरम ह्या राष्ट्रगीताने करून आर्या आंबेकर हिने आमच्या सगळ्यांची मने जिंकली.


सौ. मंजिरी विवेक सबनीस







1 comment: