प्रिय हा मिलिंद

 

 

"गेस व्हॉटमाझ्या शेजारच्या सीटवर मिलिंद सोमण बसलाय!! आय ॲ सो एक्सायटेड.फ्लाईट टेक ऑफ होण्याआधी तिने आमच्या कॉलेजच्या व्हॉट्स ॲप ग्रुपवर हा मेसेज टाकला. त्यावर सगळ्यांच्याखास करून मुलींच्या, "हाऊ लक्की", "प्लीज़ सेल्फी घेइथपासून, "त्याला डेटवर यायला पटव", "मानसतेरा पत्ता कट!इथपर्यंत मेसेजेस आले.

 ही चार दिवस माहेरी गेली होती आणि आज परतीच्या फ्लाईटचं हे दृश्य होतं. इन फॅक्ट मीच तिचं तिकीट आज वरच्या श्रेणीत अपग्रेड केलं होतं. घोडचूक!आता दीड तास तिचा फोन फ्लाईट मोडमधे असल्यामुळे ऑफ होता. मी एअरपोर्टला तिला पिकअप करायला जाणार होतो. तसा तयारच होतो. पण आज बऱ्याच दिवसांनी म्हटलं जरा स्वतःवर नजर टाकावी.. आरसा तसाही माझा फार चांगला मित्र नाहीये. आणि आज तो मला अधिकच हिणवत होता. ठरलं.. मी आत अडगळीच्या खोलीत गेलो. तिथे धूळ खात पडलेले डंबेल्स काढले, वीस वीसचे तीन सेट्स मारले (हो.. शिंकत शिंकत). गेल्यावर्षी भाऊबीजेला आलेल्या नवीन शर्टांपैकी सगळ्यात कलरफुल्ल लालनीळा टी शर्टघातला. एक परफ्युम शोधला. तो कीटकनाशकासारखा स्वतःवर फवारला. "आता कस्सं?" असं स्वतःशीच म्हणून निघालो. पुन्हा त्या गद्दार आरशात न पाहताच. निघता निघता आईच्या खोलीत तिला सांगायला गेलो तर तिथे आईचा रेडिओ चालू होता. त्यातून वसंतराव "घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलिंद, प्रिय हा मिलिंद, प्रिय हा मिलिंद" असं तीनदा मला निक्षून सांगितल्यासारखं म्हणाले. मी बाहेरूच "येतो गं आई, हिला पिकअप करून" असं म्हणून सटकलो. पण पूर्ण वाटेत डोक्यात "प्रिय हा मिलिंद" चिकटलं होतं. 

एअरपोर्टला पोचलो. तिची फ्लाईट आली होती. हळूहळू माणसं बाहेर येत होती. आज मी तिच्यासाठी एक गुलाबही घेतला होता एअरपोर्टवरच. तेवढ्यात समोरून साक्षात मदनाचा अवतार मिलिंद सोमण बाहेर येताना दिसला. मी ऑलरेडी हे दोघं गप्पा मारत बाहेर येणार असं इमॅजिन केलं होतं. पण ती दिसत नव्हती. हां ती काय? त्याच्या काही पावलं मागेचहोती. पण त्यांनी एकमेकांना बाय वगैरे काही केलं नाही. मला पाहून तिचा चेहरा एकदम खुलला. मी बॅग घेतली आणि तिने हातातला गुलाब घेतला. "हे काय?" ती थोडीशी लाजली. 

"काही नाही. इथेच एक बिचारी गरीब मुलगी सारखी विचारतहोती, 'भैया ले लो ना गुलाब', म्हणून आपली केली मदत तिला.

"हो का?" तिने चिडवणाऱ्या सुरात विचारलं. "आणि हे काय? आज नवीन टी शर्ट ?"

"ते अगं, सगळे घालायचे शर्ट इस्त्रीला गेलेत.

"हो का?" पुन्हा तोच सूर. 

"ते सगळं सोड. मला सांग, काय गप्पा झाल्या मिलिंद सोमण सोबत?" 

"छे. कुठे काय. त्याच्यासोबत कोणीतरी होती. तो तिच्याशीच गप्पा मारत होता. मी आपलं हे पुस्तक वाचत होते.

"म्हणजे.. तू साधी ओळखही नाही केलीस?" 

"काय तरी काय. उगाच काय भाव द्यायचा?"

"करेक्ट.", मी म्हटलं, "मला माहीत होतं तू काही उगाच स्वतःहून बोलायला जाणार नाहीस."

"हो क्का??"आता ती खळखळून हसत म्हणाली.

मी तिच्याकडे न पाहता ड्राईव्ह करत राहिलो. "प्रिय हा मिलिंद" आता डोक्यातून सुटलं होतं.

 

मानस

(काहीसं काल्पनिक)

 


1 comment: