अल्पसंख्य - पुस्तक परिक्षण


राजहंस प्रकाशनचे मार्च २००८ मध्ये प्रकाशित झालेले विजय पाडळकर लिखित पुस्तक 'अल्पसंख्य' याची अर्पणपत्रिकादेखिल आपली उत्सुकता चाळवते. ‘भारत माझा देश आहेअसे मनापासून मानणाऱ्या प्रत्येकास मुखपृष्ठ बघून पुस्तकाच्या पार्श्र्वभूमीचा साधारण अंदाज येतोच. अगदी पहिल्या पानापासून पुस्तक पकड घेते.



एका राष्ट्रीय बँकेतील इलाही मेहमूद सुभेदार नावाच्या अधिकाऱ्याची ही कथा आहे. नांदेड येथील बँकेत त्यांची accountant म्हणून बदली होते आणि तिथल्या क्वार्टरमध्ये ते एकटेच राहायला येतात. बँकेतील राजकारण, तेथे असलेल्या दोन संघटना. एक ए. आय. बी. ई. ए. आणि दुसरी एन. ओ. बी.ओ. म्हणजेच नोबो. या संस्थांच्या एकमेकांच्या वैर भावनेतून सुभेदाराच्या आयुष्यावर होणारा परिणाम, याचे उत्तम चित्रण पाडळकर यांनी केले आहे. अतिशय तत्वनिष्ठ असे हे बँकेचे अधिकारी. तत्वांसाठी आपले वरिष्ठ अधिकारी, IAS officer यांच्याशीही वाद घालायला कचरत नाहीत. सरकारी योजना आणि त्यांचा होत असलेला गैरवापर, स्थानिक पुढाऱ्यांची अरेरावी, त्याचा सुभेदार यांनी केलेला खंबीर सामना हे सगळे बारकावे खूप छान घेतले आहेत.

अश्या या तत्वनिष्ठ व्यवहारी माणसाला आवड मात्र तलत मेहमूद, लता मंगेशकर, पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या संगीताची! सुभेदार ह्या व्यक्तिमत्वाचा तोल पाडळकर यांनी उत्तम साधला आहे. सर्व जगाला हादरवून सोडणारी ९/११ ची घटना, त्याचे सर्व जगावर होणारे direct/ indirect परिणाम, हजारो मैल अंतरावरचे twin towers उदध्वस्त झाले होते आणि इकडे शेकडो वर्षांपासून उभ्या  असलेल्या संस्कृतीच्या दोन टॉवर्सना धक्के बसायला लागले होते.

हिंदू-मुस्लिम दंगली सुरू झाल्या आणि त्यांच्या आप्तस्वकियांना याचा जोरदार फटका बसला. त्या दंगलींच्या वेळेची जमावाची विचारसरणी, मानसिकता यांचा उत्कृष्ट आढावा घेतला गेला आहे. सुभेदार यांचा आपल्या संस्थेवरचा उडालेला विश्वास, त्यापायी झालेली त्यांची घालमेल आणि संस्थेच्या उच्चाधिकाऱ्यानी केलेले प्रयत्न आणि त्याचा परिणाम म्हणून सुभेदारांनी परत जॉईन केलेली संस्था!

अल्पसंख्यहे पुस्तक वाचल्यावर आपल्याला समजते की सुभेदार हे फक्त मुसलमान म्हणून अल्पसंख्य नाहीत, तर ते एक उच्चशिक्षित मुसलमान आहेत, जे एका कट्टर हिंदू संस्थेचे सभासद आहेत, म्हणूनही ते अल्पसंख्य आहेत. बँकेचे कर्तव्यदक्ष अधिकारी, न्यायासाठी झगडणारी प्रामाणिक व्यक्ती म्हणूनही अल्पसंख्य! जतिधर्मापेक्षा मानवतेवर विश्वास ठेवणारे हे सुभेदार आपल्याही मनात जाऊन बसतात हे मात्र वादातीत!!


मीनल टोणगांवकर


2 comments: