राधिका

 




युगायुगांची राधिका मी

प्रेमासाठी झूरते गं

रंगी अवघ्या रंगून अंती

प्रतिबिंबित मी उरते गं

 

वैदेही परी अबला ना मी

ना अहिल्येसम शापित गं

जरी वड पूजते परंपरेचा

न मागते जन्मांतरीचे संचित गं

 

नको भरवसा सप्तजन्मांचा

नको स्पर्श मज देवपणाचा

अज्ञानाच्या मूढ शिळेतून

मीच मला सावरते गं

 

मीच मैत्रेयी अन मीच गार्गी ही

रंभा उर्वशी ही मीच स्वर्गीची

मीच ममता मीच माया

नग्न असूनही पवित्र अशी ती

 

मीच सती अन मीच अनसूया

विश्वारंभा मीच कारण

नवनिर्मितीस ठेवते देह तारण

दाही दिशांतूनी माझाच वावर

व्यापूनी राहिले मीच चराचर

 

 पण त्या शामनिळ्याच्या मोरपिसारी

शतजन्मांचे मीपण हरते गं

युगायुगांची राधिका मी

प्रेमासाठी झूरते गं


प्रेरणा चौक








1 comment: