"हेमदुग्धकदलिका
शिकरण"
म्हणजे?
अहो, हेमदुग्ध
म्हणजे उंबर आणि कदलिका म्हणजे केळं. उंबर आणि केळ्यांचं शिकरण. संस्कृत नावं आहेत.
संस्कृत नाव दिलं म्हणजे कसं रेसिपीचं वजन वाढतं ना, म्हणून! भारदस्त वाटते रेसिपी
मग. बाकी काही नाही.😀
आपण वड आणि
औदुंबरादी अध्यात्मिक वृक्षांची अगदी मनोभावे पूजा करतो. दत्ताला गेलो की औदुंबराची
पण पूजा करून न चुकता प्रदक्षिणा घालतोच. वटपौर्णिमाही अगदी हौसेने साजरी करतो. वड,
औदुंबराच्या औषधी गुणधर्मांचीही भरपूर चर्चा करतो. वैद्य लोक औषधांसाठी ह्या फळांचा वापर करतात. पण आपल्या नेहमीच्या आहारात ही फळं
आलेली मी कधीच पाहिली नाहीत. त्याच जातीची अंजीरं गोड लागतात म्हणून नेहमीच्या आपल्या
आहारात त्यांचा समावेश असतो. पण दत्ताच्या देवळात औदुंबराच्या झाडाची उंबरं मात्र बिचारी
बेचव, तुरट म्हणून पायदळी येऊन धारातीर्थी पडतात. त्यांच्याकडे पाहून त्यांनाही आपल्या
रोजच्या आहारातल्या पदार्थांमध्ये मानाचं स्थान देऊन योग्य न्याय मिळावा अशी अपेक्षा
आणि त्यासाठी हा माझा खटाटोप.
आमच्या सोसायटी
मध्ये औदुंबराचे/ उंबराचे एक झाड आहे. ह्या झाडाला साधारण मार्च-एप्रिल दरम्यान उंबरं
लागतात. ह्या वेळेस झाडाला लगडलेली ती उंबरं बघून नुकतीच पिकलेली वाडगाभर चांगली उंबरं
बघून मी घेऊन आले. पातेलंभर पाण्यात थोडं मीठ टाकून त्यात काही वेळ ती मी बुडवून ठेवली.
बऱ्याचदा त्यावर मुंग्या असतात आणि आतही कीड असू शकते. त्यामुळे ती नीट पाहून स्वच्छ
करून घेतली. देठ काढून टाकून चिरून एका पातेल्यात उंबरं आणि उंबरांच्या दुप्पट साखर
घालून ते मिश्रण एकतारी पाक होईपर्यंत मंद गॅस करून ढवळत राहिले. अशा पद्धतीने मुरंबा
करून थंड करून काचेच्या बरणीत भरून ठेवला.
आता हे मला
माझ्या मुलाला आणि अहोंना खायला घालायचं होतं.😀 ते दोघंही आधीच मी उंबरं गोळा करून आणताना
भीतीपूर्ण साशंकतेने माझ्याकडे पाहत होते. आपला आता गिनीपिग होणार म्हणून नन्नाचा पाढा
आणि अनेक प्रश्न चालूच होते. पण मी वरील मुरंबा खाऊनही व्यवस्थित आहे हे पाहून मुलगा
थोडासा तयार झाला. मग माझाही हुरूप अजून वाढला. त्याला मिल्कशेक्स आवडतात म्हणून
clusterfig banana milkshake म्हणजेच "हेमदुग्धकदलिका शिकरण" चा जन्म झाला.
आधी त्याने
घाबरत चमचाभरच चव घेतली. पण नंतर त्याला इतकं आवडलं की त्याने अजून दोन फुल ग्लास clusterfig banana milkshake
with उंबर मुरंबा topping ची इन्स्टंट ऑर्डर दिली.😇 आई पास झाली.😄
पिकलेली केळी,
उंबर मुरंबा, थंड दूध ब्लेंडेरने मिक्स करून घेतलं. सर्व्ह करताना त्यात थोडा मुरंबा
आणि केळ्याचे काप घातले. तयार यम्मी "हेमदुग्ध कदलिका शिकरण"
(clusterfig banana milkshake)
आयुर्वेदानुसार
दूध आणि फळं विरुद्ध अन्न खरं तर, पण आपण बाकीचेही milkshakes आवडीने पितो. त्यातून
माझ्या मुलाला दहीताक अजिबातच आवडत नाही त्यामुळे milkshake / शिकरण बनवले. Dr. मैत्रिणीच्या
सल्ल्याने "चालेल कधीतरी" असा शिक्काही मिळाला.
पण मंडळी
तुम्ही आवडत असेल तर clustfig banana लस्सी
ही बनवून पहा. वरील कृतीप्रमाणेच दुधाऐवजी दही-मलईचा वापर करुन.
माझी Dr.
मैत्रीण स्वप्नालीने उंबराचे गुणधर्मही मला
सांगितले तेही खाली देते.
"उंबर"कषाय
रसात्मक (तुरट) पचनाला जड़, गुरुगुणात्मक, after digestion ultimately convert
into कटु विपाक, शरीरातील वात वाढवणारं आणि पित्त व कफ कमी करणारं, व्रण रोपक
wound healing property भग्न संधनक (heals fractured bones) दाह शामक (आग जळजळ कमी
करणारे) रक्तस्राव कमी करणारे म्हणून घोलणा फुटणे, मासिक पाळीत अति रक्तस्राव यात उपयुक्त,
अति मूत्रस्राव, लघवीला होणारी जळजळ, वरंवार होणारे मूत्रशयाचे इन्फेक्शन यात उपयुक्त,
diabetes साठी फायदेशीर.
वरील माहिती
लक्षात घेऊन गरज वाटल्यास आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने स्वतःची प्रकृती (वात/पित्त/कफ)
पाहून ही "हेमदुग्धकदलिका शिकरण" नक्की बनवून खाऊन पहा आणि अशा औषधी बहुगुणी
फळाचा लाभ घ्या. 😊
भेटू पुन्हा
पुढच्या महिन्यात नवीन पाककृती सह.
सौ.श्वेता
अनुप साठये
Very interesting
ReplyDelete