रस्किन बाँड
रस्किन बाँडचा जन्म भारतातलाच! जामनगर इथला! तेव्हा आपल्यावर ब्रिटीशांचे
राज्य होते. रस्किनचे आजी-आजोबा, वडील, काका, सगळेच भारतात रहात होते. वडील रॉयल एअर
फोर्समध्ये होते. रस्किन लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला.
रस्किनचे बालपण त्याच्या आजी-आजोबांजवळ देहरादून मध्ये गेले. रस्किनच्या कथांतील
हिमालय वा तिथली गावे ही अशी चाळीस/पन्नासच्या दशकांतील आहेत. त्यामुळे या कथा
वाचताना, आपल्याला एखादा जुना ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा
पाहिल्यासारखा वाटतो. जुना भारत डोळ्यांसमोर येतो.
सगळ्या गोष्टी हिमालयातल्या! तिथला निसर्ग जिवंतपणे डोळ्यांसमोर उभ्या
करणाऱ्या! रस्किन बाँडच्या कथेतील निसर्ग हा त्यांच्या कथेत एक व्यक्तिरेखा
म्हणूनही समोर येतो. रविवारी क्रिकेटची मॅच खेळताना रमलेली मुले, त्यांचे वडील, गावातील इतर माणसे,
समोर वाहणारी नदी, डोलणारी शेते, त्यातच मॅच पाहायला नदीतून काठावर आलेली मगर आणि नंतर उडालेला गोंधळ!
सगळेच लोभस आणि मजेदार वाटते. “दी चेरी ट्री” मध्ये रमत-गमत चालणारा राकेश, त्याचे आजोबा, त्यांची बाग हे सगळे वाचताना आपण त्यांच्यापैकीच एक होऊन जातो. जी.एं.ची
शब्दकळा जशी प्रभावी आहे, तशीच रस्किन बाँडचीही आहे, पण लोभसवाण्या अर्थाने! रस्किन बाँडच्या कथेत रमायला आपल्याला आवडते.
“Our Trees still grow in Dehra” – या कथेतून तर रस्किन बाँडचे सगळे
आयुष्यच आपल्यासमोर अलगद उलगडते. कथेच्या शेवटी १५/२० वर्षांपूर्वी रस्किन बाँडने
आणि त्याच्या वडिलांनी लावलेली झाडे आता बहराला आली आहेत, मोठी
झाली आहेत. रस्किन त्यांना पाहतो आणि त्याला वाटते, की त्या
झाडांनी आपल्याला ओळखले आहे. जणू ती त्याला प्रेमाने जवळ घेत आहेत. मुख्य म्हणजे
हे नुसतेच लिहिणे नाही, ही भावना वाचताना ती आपल्याला आत
खोलवर जाणवते!
रस्किन बाँडच्या कथांतून जाणवणारा वेगळा भाग म्हणजे भारताला स्वातंत्र्य
मिळाले तो काळ. तो काळ भारतीयांना आनंदाचा होता. पण ब्रिटिशांच्या जीवनातील प्रचंड
उलथापालथीचा काळ होता तो! रस्किन बाँडच्या कथांत या काळाचे चित्रण आले आहे. त्यांच्या ‘’Escape from Java” या कथेतील वर्णन वाचून या काळाची
कल्पना येते. दुसऱ्या महायुद्धात बेचिराख झालेला, आणि
सिंगापूर, जपान, जावा येथून हरलेला
इंग्लंड! या सर्व ठिकाणांहून परतणारे ब्रिटीश! “भारताला
स्वातंत्र्य मिळाले की आपल्याला भारत सोडावा लागेल. कारण माझी नोकरी जाईल.”
असे वडिलांनी सांगितल्यावर रस्किन विचारात पडतो. कारण तोपर्यंत
भारतातच वाढलेल्या रस्किनला इंग्लंडच परका देश होता.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर रस्किनच्या वडिलांचे मलेरियामुळे निधन
होते. आजी-आजोबांबरोबर रस्किन बाँडला इंग्लंडला जावे लागते. तिथे रस्किन बाँड काही
वर्षे राहिले पण रमले मात्र नाहीत. त्या वेळच्या आठवणी लिहिताना रस्किन म्हणतो, “मी अबोल होतो, हे मला इंग्लंडला
येईपर्यंत कळलेच नव्हते. कारण भारतात असताना ही गोष्ट मला कधी जाणवलीच नाही.”
त्यांच्या कथांत अनेक वेळा गाडीचा प्रवास, बसचा
प्रवास याची वर्णने आली आहेत. बोलले नाही तरीही संभाषणात दुसऱ्याला नकळत ओढून
घेणारी अनेक भारतीय माणसे त्यांच्या मनात घर करून होती, हे
जाणवते.
पद्मभूषण स्वीकारताना
तुम्ही वाचल्या आहेत का रस्किन बाँडच्या कथा? नसतील
वाचल्या तर जरूर वाचा आणि परत आपल्या बालपणीचा निरागसपणा अनुभवा!
स्नेहा केतकर
छान लेख स्नेहा
ReplyDeleteGood info about Ruskin Bond.
ReplyDeleteThanks