साहिर लुधियानवी

 

पहिला भारतीय बोलपटआलमआरा१९३१ साली निर्माण झाला. त्याआधी दहा वर्षे अगोदरच नियतीने एका जादुगाराची निर्मिती हिंदी चित्रपटसृष्टीसाठी केली होती. होय, आपल्या थोड्या-थोडक्या नव्हे तर तब्बल ७३३ गीतांनी रसिकांना वेड लावणारा तो जादुगार होता साहिर लुधियानवी! मुळात 'साहिर' या शब्दांच्या वेगवेगळ्या अर्थांपैकी एक आहेजादुगारआणि दूसरा अर्थ आहेमोहक’. हे दोन्ही त्यांना लागू होतात. १९५० ते १९८० या काळातले सिनेरसिक खरेच भाग्यवान म्हणायला हवेत. ते केवळसिनेमा चांगला आहे’, एवढ्यावरच गप्पा थांबवत नव्हते. त्यातल्या कलाकारांखेरीज दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, गायक अशा विविध अंगांनी गप्पा रंगायच्या. नुसत्या सुश्राव्य गाण्यांवर कित्येक चित्रपट तरून गेले आहेत. गीतकार, संगीतकार आणि गायक-गायिकांवर जीव ओवाळून टाकण्याचा तो जमाना होता.

८ मार्च १९२१ या दिवशी जन्मलेला अब्दुल हयी लुधियानामध्ये वाढू लागला. वडिलांनी आईला सोडून दिल्यावर हलाखीच्या परिस्थितीत कॉलेजमध्ये शिकताना तो कविता करू लागला. दैववशात, आईबरोबर जगण्यासाठी लाहोरला गेल्यावर त्याची प्रतिभा बहरू लागली. तो काव्य संमेलने गाजवू लागला.दरम्यान फाळणी झाली. अब्दुलचे विचार, त्याच्या कविता पाकिस्तानी राजवटीला त्रासदायक ठरू लागल्या कारण ते काही धर्मनिरपेक्ष राष्ट्र नव्हते. तडजोड करत जगणे या मनस्वी मुलाला मानवले नाही आणि त्याने लाहोरला अलविदा करून दिल्ली गाठली आणि पुढे मुंबई !

सुरूवातीच्या काळात काव्य संग्रह, संमेलने यातच मग अब्दुल हयीचं दुसर्‍यांदा बारसं झालं आणि तुम्हा-आम्हाला मिळाले शायर साहिर लुधियानवी! अशातच १९५० सालीबाजीचित्रपटातल्यातदबीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले, अपने पे भरोसा है, तो ये दांव लगा लेया गाण्याने साहिरचे ही तकदीर खुलले, ते १९७७ सालीकभी कभी मेरे दिल में खयाल आता हैचे फिल्मफेअर ट्रॉफी घेईपर्यंत. 

त्यापूर्वी ‘साधना’ चित्रपटातल्या ‘औरतने जनम दिया मर्दों कोमर्दोंने उसे बाज़ार दिया’ आणि ‘ताजमहल’ मधल्या ‘जो वादा किया वो निभाना पड़ेगा’ साठी ही फिल्मफेअर मिळाले होतेच.

१९५८ सालीफिर सुबह होगीहा 'क्राईम एण्ड पनिशमेंट' धर्तीचा चित्रपट आला. त्या काळात राज कपूर यांच्या शब्दाला खूप किंमत होती. दिग्दर्शक रमेश सैगलने राज कपूरना करारबद्ध केले, गीते साहिर यांची तयार होतीच, त्यांना या वेळी त्यांच्या गीतांना चाली देण्यासाठी संगीतकार खय्याम हवे होते. राज कपूर शंकर-जयकिशन साठी अडून बसले होते. शेवटी साहिर राज कपूरना पटवून देण्यात यशस्वी झाले आणि आपल्यालावो सुबह कभी तो आएगीहे सुंदर गीत मिळाले. 

हम दोनों – देव आनंदचा डबलरोल!१९६१ च्या या चित्रपटातील सगळी गाणी संगीतकार जयदेव यांनी अजरामर केली आहेत.अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नामऐकताना रसिक तल्लीन न झाले तरच नवल ! त्यातलंचअभी ना जाओ छोड़कर, के दिल अभी भरा नहींऐकताना रफ़ी-आशाच्या खट्याळ सुरांबरोबर साहिरची रोमँटिक शब्दरचना विसरता येत नाही. मग यातलाच मास्टरपीसमैं ज़िंदगी का साथ निभाता चला गया!इथं तर साहिर यांनी साक्षात भगवद्गीतेतीलस्थितप्रज्ञाची जी लक्षणे सांगितली आहेत तीच अंतर्‍यामध्ये सहजपणेगम और खुशी में फ़र्क न महसूस हो जहाँ, मैं दिल को उस मकाम पे लाता चला गयाअसं लिहून आपल्यालासुख दु:खे समे कृत्वाम्हणत नमस्कारच करायला लावला आहे. 

शब्दांची जादू म्हणजे तरी काय असतं हो शेवटी? ‘काजलमधलं भजन आठवा, ‘तोरा मन दर्पण कहलाए, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए’! शब्दात किती पारदर्शकपणा असावा? तोही साध्या सोप्या भाषेत. तसंचनीलकमलमधली रफ़ीची आर्त सुरातली हाकssजा तुझको पुकारे मेरा प्यारआणि लेकीची पाठवणी करतानाबाबुलकी दुआएँ लेती जा, जा तुझको सुखी संसार मिलेऐकताना डोळ्यात नकळत पाणी येते, तेव्हा तो बाप कसा विरघळतो ते शब्दा-शब्दात साहिरच व्यक्त करू जाणे. असं म्हणतात की भारतातल्या हिंदी भाषिक पट्ट्यात आज ही या गीताशिवाय मुलीची बिदाई होत नाही.गुमराहमध्ये असंच एक गीत आहे जे ऐकताना आपणही थोडेतरी नॉस्टेल्जिक होतो.चलो एक बार फिरसे, अजनबी बन जाए हम दोनोंकेवळ अप्रतिम!मुनिमजीमधलं किशोरकुमारच्या आवाजातलंजीवन के सफ़र में राही, मिलते है बिछड़ जाने कोदेखील आपल्याला अंतर्मुख करतं. मगवक्तमधलीऐ मेरी जोहराजबीं, तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हँसी और मैं जवाँही रोमँटीक कव्वाली लिहिणारे साहिर ते हेच का असा प्रश्न ही पडतो.

साहिर लुधियानवी यांना एकच धर्म माहिती होता आणि तो म्हणजे मानवता-माणुसकी.धूल का फूलमधलंतू हिन्दू बनेगा न मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद है इन्सान बनेगाहे रस्त्यावर सापडलेल्या छोट्या मुलाला उद्देशून म्हटलेले गीत याचीच साक्ष देते.इन्सानियत ही मज़हब हैहे त्यांचं तत्व इथे अधोरेखित होते, म्हणून तर हा हीरा पाकिस्तानात न राहता आम्हा भारतीय रसिकांना लाभला. त्यांच्या मनस्वी स्वभावाचा दणकाऑल इंडिया रेडिओअर्थातआकाशवाणीला ही मिळाला. पूर्वी रेडिओवर गाणे लावण्यापूर्वी संगीतकार आणि गायक/गायिके चे नाव सांगितले जायचे. साहिर यांनी त्याबाबत आवाज उठवला आणि त्यानंतर गीतकाराचे नाव ही सांगणे सुरु झाले. असाच प्रकार मानधनाच्या बाबतीतही. एखाद्या गीतासाठी लता मंगेशकर यांच्यापेक्षा एक रूपया जादा मानधन घेणारा हा एकमेव कलाकार!

साहिर वैयक्तिक आयुष्यात मात्र एकटे होते. अगदी सुरुवातीच्या काळात अमृता प्रीतम या प्रख्यात लेखिकेशी आणि नंतर सुधा मल्होत्रा या गायिकेबरोबर त्यांचे संबंध होते पण ते शेवटी अविवाहितच राहिले. भारत सरकारने १९७१ साली त्यांनापद्मश्रीहा नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले. १२२ चित्रपट आणि ७३३ सिनेगीते लिहीणारा, रसिकांच्या हृदयावर राज्य करणारा हा शब्दांचा बादशहा २५ ऑक्टोबर १९८० या दिवशी वयाची साठी ही न ओलांडता भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीला समृद्ध करून अनंताच्या प्रवासाला निघून गेला. 

त्यांच्याच शब्दाततुम ना जाने किस जहा में खो गएअसं म्हणत त्यांची जन्मशताब्दी साजरी करणं आणिमैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी हैहे सत्य स्विकारणं एवढंच आपणा रसिकांच्या हाती आहे.

 

उदय ठेकेदार




4 comments:

  1. Apratim lekh...congratulations Uday Thekedar

    ReplyDelete
  2. खूप छान शब्दात साहिर लुधियानवींबद्दल लिहिलं आहेत.
    अतिशय सुरेख लेख आहे.
    तुमचं मन:पुर्वक अभिनंदन!

    ReplyDelete
  3. अप ओझोन जंगल



    सुंदर लेख आहे. तुम्हाला बरीच आवड अन् माहिती आहे.
    मन:पूर्वक अभिनंदन.

    ReplyDelete