नाव माझे साहित्य


नमस्कार !!
मी साहित्य, हो तुम्ही जे लिहिता ते साहित्य. ओळख सांगू का? नाही नको, आज मला तुम्हाला वेगळं काही सांगायचंय.

सगळ्यात आधी धन्यवाद की तुम्ही माझा आदर राखलात आणि लेखणी हातात घेऊन मला गिरवलं. कधी कथेच्या माध्यमातून, कधी कवितेच्या माध्यमातून, कधी मुक्तछंद आणि बरंच काही. मात्र काही गोष्टींची मला आज खंत वाटते.

मला भीती वाटतेय की कुठेतरी माझं महत्त्व कमी होईल का? कारण... तुम्ही तुमचे भाव, भावना आणि असं बरंच काही माझ्या माध्यमातून मांडता. बोलायचंच झालं तर कविता घ्या. रुसवे, फुगवे, प्रेमकथा, प्रेयसी असं अनादी आणि अनंत. यमकही जुळवता. जुळलं नाही तर काहीतरी खटाटोप करून एक शब्द तिथे लिहिता... यमक जुळण्यासाठी.

पण काही कवी महाशय असं समजतात की यमक जुळलं, जाड-जूड वजनदार शब्द वापरले, अलंकारिक केलं की झाली कविता. माफ करा, पण ते माझं स्वरूप नाही. जर तसं तुम्ही कुठे पाहिलं, तर कृपा करून त्याला माझ्या नावाने संबोधू नका.

अरे... माझा काही दर्जा आहे राव. सुरेश भट, पु.., अशा अनेक दिग्गजांनी माझा  दर्जा उच्चस्तरावर नेऊन ठेवला  आहे. मागणे  इतकेच की माझा स्तर अजून उंचावर नेता आला  नाही तर निदान माझा पाय तरी खाली ओढू नका. तुम्ही म्हणाल, प्रयत्न केल्याशिवाय कसं जमणार? बरोबर ना... आनंदच आहे मला की तुम्ही माझं स्वरूप वाढवताय. मात्र ह्या सगळ्यामध्ये तुम्ही एक विसरून जाता, काय सांगा पाहू?

आठवतं? तुमची चूक नाही हो. कारण माझे  रूप ह्या गोष्टींमुळे बदलते. मी माझ्या हृदयाबद्दल बोलतोय. ज्याच्याशिवाय माझ्यामध्ये जीव येत नाही. तो म्हणजे "अर्थशुद्धता".

अर्थहीन साहित्य निर्मिती म्हणजे मला तरी असे  वाटते  की मी कोमामध्ये आहे आणि खाटेवर पडलोय. सुरेश भटांसारख्या माणसाने माझ्यावर खूप उपकार केले. मात्र आज माझे  रूप ह्याच गोष्टींमुळे बदलते. माझा तुमच्यावर राग अजिबात नाही. का असावा? कारण तुम्ही मला जपता, हाताळता.

मात्र एकच सांगणं आहे, मला अर्थपूर्ण बनवा... नियमानुसार लिहा असे  सुद्धा मी म्हणत नाही. कारण ते नियम, माझे  सौन्दर्य वाढण्यासाठी तुम्हीच तयार केलेत. मला त्याची गरज नाही. मला गरज आहे अर्थशुद्धतेची. यमक जुळत नाहीये? शब्द बसत नाहीयेत? हरकत नाही. सगळं जमेल. पण अर्थ महत्त्वाचा. कविता जमलीच नाही तर मुक्तछंद, लेख, सहज सुचलेल्या ओळी असं तुम्ही संबोधू शकता. पण कृपा करून तुमच्या लेखनाला अर्थहीन करून, माझी मान मुरगळू नका. तुम्ही सगळे जाणकार आहात म्हणून आज तुमच्यासोबत बोलावेसे  वाटले. अहो जितके तुमच्या हृदयाचे ठोके तुम्हाला महत्त्वाचे तितकाच मला अर्थ महत्त्वाचा.

जितके  तुम्हाला पाणी महत्त्वाचे, तितकेच मला तुमच्यासारखे साहित्यिक महत्त्वाचे. म्हणून सांगतो, माझ्या बोलण्याचा राग मानून साथ सोडू नका. अहो तुमच्याशिवाय मी अपूर्ण आहे. फक्त माझा मान कायम राखा, इतकेच काय ते मागणे.

चला तर मग, नव्याने सुरुवात करूयात. घ्या लेखणी हातामध्ये आणि उतरवा तुमच्या मनातले  भाव.

तुमचाच साहित्य



अनिकेत पुजारी


7 comments:

  1. अनिकेत - कल्पना छान. शालजोडीतले काही आहेर तर अजुन effective!

    ReplyDelete
  2. मस्त जमलेला लेख

    ReplyDelete
  3. खूप छान लिहिलय अनिकेत

    ReplyDelete
  4. खूप मस्त अनिकेत.

    ReplyDelete
  5. अतिशय सुरेख लिहिलंय अनिकेत. जे लिहिलंय ते एकदम खर आहे.

    ReplyDelete
  6. Superb Aniket
    Excellent write up

    ReplyDelete