"आज दिवाळी! तरी तुमची घाई कामावर जायची. दिवाळीला कोण जातं कामावर? तुम्ही ना पोलीस, आणि ना सैनिक." पानसरे वहिनींनी किचनमधून नाराजी व्यक्त केली.
"म्हणून काही आमच्या कामाचं महत्व कमी होत नाही. दिवाळीच्या रात्री जो झगमगाट दिसतो सगळीकडे, तो शक्य आहे का आमच्याशिवाय?"
पानसरे बूट घालता घालता म्हणाले.
"जाऊ दे. कोण तुमच्या नादी लागणार? उद्या सकाळी अभ्यंगस्नानासाठी लवकर या. पाडवा आहे हे लक्षात असू द्या. ओवाळणी तर आणली नसेलच..."
"माझी बस आली गं. निघतो."
पानसऱ्यांनी मनोमन बसच्या कधी न चुकणाऱ्या टायमिंगचे आभार मानले.
पानसरे एका न्युक्लियर पॉवर प्लान्ट (अणु ऊर्जा वीज प्रकल्प) वर चीफ ऑपरेटर होते. त्या पॉवर प्लान्टने निर्माण होणारी वीज सुमारे सहा जिल्ह्यांत पोचत होती. आज त्यांची रात्रीची शिफ्ट होती. कंट्रोलरूमची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर होती. प्लान्टला पोचताच डबा आणि बॅग आपल्या टेबलावर ठेवून ते लगेच कंट्रोल रूमला आले. तिथल्या आधीच्या शिफ्टच्या इन्चार्जकडून टेकओव्हर करून ते ऑपरेटर सीटवर जाऊन सगळे पॅरामीटर्स चेक करू लागले. सगळं नॉर्मल होतं. आजकालच्या ऑटोमॅटिक सिस्टीममुळे सगळं सोपं झालं होतं. रात्री विजेची डिमांड वाढणार हे त्यांना माहीत होतं. दिवाळी होती. पानसऱ्यांच्या मते आज विजेचा वेगवेगळ्या रंगांत सजून मिरवायचा दिवस होता. त्यांनी सगळी तयारी करून ठेवली होती.
संध्याकाळी साडेसात वाजता ठरल्याप्रमाणे रिऍक्टरमधून बोरॉन रॉड हळूहळू बाहेर काढण्यात आले. बोरॉन रॉड हे अणुऊर्जा शोषून घेतात. त्यामुळे,
ते बाहेर काढले की आपोआप ऊर्जा निर्मीती वाढते. आता रिऍक्टरचं प्रेशरसुद्धा वाढलं होतं आणि ऊर्जेतून तयार होणारी वाफही.
प्लान्टचं आऊटपुट वाढलं आणि आता रात्री पुरेल एवढ्या वेगाने वीज तयार होऊ लागली. पानसरे निर्धास्त झाले आणि शेजारीच बसलेल्या इतर सहकाऱ्यांना म्हणाले, "आता आपणही दिवाळी साजरी करायला हरकत नाही. बाहेर खिडकीत लावलेल्या माळा ऑन करा, आणि चला, थोडा फराळही करून घेऊ." ट्रेनिंगवर असलेल्या श्यामला तिकडेच बसवून आणि सिस्टीम ऑटो कंट्रोलवर टाकून सगळे बाहेर डायनिंगरूममधे आले, आपापला फराळाचा डबा घेऊन.
सगळा फराळ वाटून होतो तोच आतून जोरात एखादा स्फोट झाल्यासारखा आवाज आला. दोन-तीन सेकंद तो आवाज घुमला. सगळे कंट्रोलरूममधे धावले. आत श्याम कावराबावरा आणि घामाघूम झाला होता. त्याने समोरच्या स्क्रीनवरच्या रिऍक्टर टेंपरेचर (तापमान)
आणि प्रेशरच्या रिडींगकडे बोट दाखवलं. दोन्ही अतिशय वेगाने वाढत होते. पानसरेंनी सगळे पॅरामीटर्स बघून लगेच, "मेनस्टीम व्हाल्व लीक झालीये आणि बहुतेक मघाशी आलेला आवाज त्याच्या कव्हरच्या स्फोटामुळे झालाय." असा अंदाज व्यक्त केला. "संखे कुठेयत? बोलवा त्यांना. त्यांना ह्या व्हाल्वबद्दल सगळं माहीत आहे."
"सर,
संखे सुट्टीवर आहे आज. त्यांनी गेल्या आठवड्यातच सुट्टीचा अर्ज टाकलेला." मागून कोणीतरी म्हणालं.
पानसरे आता जरा अस्वस्थ झाले. त्यांनी लगेच बॅकअप वॉटर सप्लाय ऑन केला होता. टेंपरेचर आणि प्रेशर खाली उतरत होते. पण तो पाण्याचा पुरवठा फक्त अर्धा तास पुरणारा होता. आता दोनच मार्ग होते. एक, अर्ध्या तासात रिऍक्टर बंद करणं, आणि दुसरा, आत प्लान्टवर जाऊन तेवढ्या वेळात व्हाल्व दुरुस्त करणं.
रिऍक्टर बंद म्हणजे वीजपुरवठा बंद. तेही दिवाळीच्या रात्री. आणि फक्त दिवाळी म्हणून नाही, तर ह्या जिल्ह्यांत असलेल्या असंख्य हॉस्पिटल्सचा पॉवरसप्लायसुद्धा धोक्यात होता. त्याची काळजी पानसरेंना जास्त होती. त्यांनी आपला निर्णय पक्का केला.
"व्हाल्वचं मॅन्युअल आणा. मी जाऊन बघतो. माझ्या करिअरच्या सुरुवातीला मी हेही काम केलंय. चित्रे, तू इथला कंट्रोल घे."
डोळ्यांना सेफ्टी ग्लास, ग्लव्ह्ज आणि फॅक्टरी सूट घालून पानसरे अजून एका वर्करला बरोबर घेऊन निघाले. सोबत ऑक्सिजन सप्लायसुद्धा घेतला. आत मेन रिऍक्टर कम्पार्टमेंटमधे ही व्हाल्व होती. जेमतेम दोन माणसं तिथे उभं राहून काम करू शकत होती. वर्कर टॉर्च, टूल्स आणि ऑक्सीजन किट घेऊन मागे उभा होता. पानसरेंनी व्हाल्व रिपेअर करायला सुरुवात केली. त्यातून वाफ खूप वेगाने लीक होत होती. बऱ्याच प्रयत्नांनंतर त्यांनी ती टाईट केली आणि आता त्याचं नवीन आणलेलं कव्हर लावायचं होतं. त्यांनी वर्करला कंपार्टमेंटबाहेर पाठवलं, कारण त्यांना तिथला ऑक्सीजन कमी झाल्यासारखा वाटला. ऑक्सीजन किट खांद्यावर घेऊन आणि नाकाला मास्क लावून ते काम करत होते. अचानक किटमधला ऑक्सीजनसुद्धा कमी झाला. पानसऱ्यांना डोकं जड झाल्यासारखं जाणवलं, तरी ते कव्हर टाईट करत राहिले. शेवटचा बोल्ट बसवल्यावर त्यांनी मोठा श्वास घेतला आणि... ते तिथेच कोलॅप्स झाले. बाहेर उभ्या असलेल्या वर्करने त्यांचा पडण्याचा आवाज ऐकून त्यांना खेचून बाहेर आणलं आणि जवळच्या फोनवरून कंट्रोल रूमला फोन केला. ऍम्ब्युलंस आली. पानसरे अजूनही हालचाल करत नव्हते. त्यांना लगेच फ्रेश ऑक्सीजन सुरु केला गेला आणि हॉस्पिटलला नेण्यात आलं. इकडे प्लान्ट पूर्ववत ऑपरेट होऊ लागला.
ऑक्सीजन कमी झाल्याने पानसरे कोमात जायची शक्यता निर्माण झाली होती. पण वेळीच सप्लाय मिळाल्याने तो धोका टळला होता. दुसऱ्या दिवशी त्यांना शुद्ध आली तेव्हा वहिनी डोळे पुसत तिथेच उभ्या होत्या. शेजारी पानसरेंचे जवळचे मित्र आणि सहकारी, चित्रे उभे होते. पानसरेंनी चित्रेंना खुणावून जवळ बोलावलं आणि त्यांच्या कानात काहीतरी पुटपुटले. चित्रे तिथून "येतो"
म्हणून निघाले. काही वेळाने डॉक्टर येऊन त्यांना चेक करुन "थम्सअप"
चा इशारा करून निघून गेले. पानसरे जवळ बसलेल्या बायकोशी बोलू लागले.
"पाहिलंस ना, कधीकधी आम्हालाही लोकांसाठी पोलीस किंवा सैनिकांसारखा धोका पत्करावा लागतो. आता विचारणार नाहीस ना? का एवढं गरजेचं आहे तुमचं काम?" वहिनी अजूनही रडतच होत्या. पण त्यांच्या डोळ्यांत आपल्या नवऱ्याबद्दलचा अभिमानही दिसत होता. तेवढ्यात चित्रे परत आले. सोबत एक बॉक्स होता. तो पानसरेंना देऊन ते निघून गेले. वहिनींना काही कळेना. पानसरेंनी बॉक्स वहिनींच्या हातात दिला. त्या उघडून पाहतात तर काय? आत छान गडद जांभळ्या रंगाची पैठणी होती. "तुझी ओवाळणी. तीन दिवसांपूर्वी आणून ऑफीसमधे ठेवलेली. मला वाटतं, कदाचित ही तुला द्यायच्या तीव्र इच्छेमुळे मी जिवंत राहिलो. काय?" पानसरे हसत म्हणाले. वहिनींना खरंच सगळं स्वप्नवत वाटत होतं. आपल्या भाग्याची त्यांना आज नव्याने ओळख पटली होती.
(काल्पनिक)
मानस
(आपल्या आजूबाजूला गणवेश नसलेले असे अनेक सैनिक असतात जे लोकरक्षणासाठी आपलेप्राण पणाला लावतात. 'मानस'चा त्या सर्वांना सलाम!)
मानस, तुमचे लेख नेहेमीच छोटे पण विचारनीय असतात. त्याच प्रथेतला हा आणखीन एक सुंदर लेख ..
ReplyDeleteThank you Abhijit.
Delete-Manas.
छान लेख.थोडा वेळ वीज गेली तर आपण किती कुरकुर करतो पण जेव्हा major fault असतो तेव्हा wiremen अवघड आणि धोकादायक परिस्तिथीशी झगडून power supply पूर्ववत करण्या साठी झटत असतात. असे सैनिक आणि त्यांच काम आपल्या गावी ही नसतं.Thanks for picking this topic.
ReplyDeleteThank you!
Delete-Manas.
सुंदर कथा मानस.
ReplyDeleteThank you Smita.
Delete-Manas