सकाळ

 


रवी क्षितिजा निघता

दूर तिमिर लोटला

उगवत्या भास्कराने

काळा काळोख घोटला

 

छटा तांबूस सोनेरी

धरा  निघाली न्हाऊन

तृण पात्यावरी नाचे

मोर होऊनी ते ऊन

 

तेजाळला दिनकर

उजळले जग सारे

दिशा दिशात पेरले

चैतन्याचे गंध वारे

 

करी खग किलबिल

तरू वृक्षा पानोपानी

सडा सारवण दारी

पूजा करी सुवासिनी

 

गोठा हंबरते गाय

ओढ लागे वासराची

धूर कोपटात निघे

सुरू घाई न्याहरीची

 

दिन रोजचा नवीन

देई आशेचे किरण

ध्येय गाठण्या यशाचे

बांधा कष्टाचे तोरण



युवराज जगताप




 

1 comment:

  1. वाचून सुप्रभात झाली. धन्यवाद!

    ReplyDelete