सखा

 

सहज सख्य हा भाव कुणासाठी अंतरातून जागा व्हावा  खरंच असं कुणीतरी कधीतरी भेटायला हवंय.....! हा भाव जपणारा, देहवासनांच्याही पलिकडे असलेल्या जाणीवेतल्या जगाला स्पर्शुन जाणारा, लौकिकाचे कोणतेही विधीनिषेध न जुमानता, मनगाभारी वस्तीस यायला हवाय. तिच्यातल्या चांगल्याने न सुखावणारा, अन वाईटपणाने न दुखावणारा.. कुणीतरी भेटायला हवाय...असं सख्य जाणणारा सखा..भेटायला हवाय!

सगळ्या जाणिवांना स्पर्शुन पण कशालाही धक्का न लावता, तिच्या जगण्यातला त्याचा वावर कसा अगदी अलवार असावा. भेटायला हवाय असं सख्य जाणणारा सखा!

एखाद्या स्त्रीच्या आतून आलेला हा शब्द म्हणजे त्या सख्याच्या आपलेपणाच्या विश्वासाची यथार्थ पावतीच खरं तर!

कारण ''या आद्याक्षराने सुरवात झालेल्या हर एक शब्दाला सकारात्मक भावनेचा स्पर्श आहे. आणि सख्य या शब्दात तर स+अख्य म्हणजेच, तिचं अख्खं (संपूर्ण) अस्तित्व सकारात्मक होऊन पेलणारा तो सखा...तिच्या इंद्रिय गाथेवरची अक्षरे वाचून जाणणारा..तो सखा भेटायला हवाय..

कृष्ण नाही का भेटला सखा होऊन स्त्रीत्वाला...तसा..अगदी तसा सखा भेटायला हवाय..!

उगीच का पाडुंरंग जनीचा सखा झाला? स्वतःच्या हीन पणाची तिला त्याच्या भक्तीत कधीच लाज वाटली नाही. तिचं कुळ, धर्म काहीच पांडुरंगाच्या सख्यात आडवं येणार नाही हे जेव्हा तिला समजलं तेव्हा ती अपरंपार भावाने पांडुरंगाशी एकरुप झाली. शब्दा वाचून संवादे घडले असतील कितीसे..

तोच भाव द्रौपदी माधवाच्या बाबतीत. तेजस्वी द्रौपदीत दडलेला विखार माधवाच्या मुलायम फुंकरीनं कमी केला. कुब्जेमधलं वाकुडपण केवळ आपलेपणाच्या स्पर्शानं नेटकं केलं. तसं तर रामाच्या पदस्पर्शाने अहिल्याही पावन झाली म्हणतात. पण..तो पदस्पर्श होता. त्यात भावापेक्षा जास्त कर्तव्याचा गाभा होता. म्हणुन राम अहिल्येसाठी पुजनीय नक्कीच झाला..पण सखा होण्याचे भाग्य कृष्णाकडेच आले. कारण स्त्रीचा सन्मान, तिचा शब्द, आणि तिचं शील...नेहमीच त्याच्याकडं सुरक्षित राहीलं..

सौ विदुला जोगळेकर





3 comments:

  1. 'सख्य'भावाच्या सगळ्या छटा सांगणारा छान लेख.

    ReplyDelete
  2. एक निरोगी, निर्मळ, निर्व्याज्य नातं म्हणजे सख्ख्.
    मैत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

    ReplyDelete