जगातील सर्वात बुद्धिमान
माणूस कोण असा प्रश्न विचारला तर आपल्यापैकी बरेचजण पटकन उत्तर देतील अल्बर्ट आईन्स्टाईन
किंवा आयझॅक न्यूटन.
तसं उत्तर फारसं चुकीचंही नाही, आपल्या असामान्य
बुद्धिमत्तेसाठी हे दोघेही प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी लावलेल्या निरनिराळ्या शोधांमुळे
संपूर्ण मानवजातीचं भविष्यही बदलून गेलं आहे.
पण केवळ बुद्ध्यांक या
अंगानं विचार केला तर या दोघांनाही
मागे टाकणारे एक मुल अमेरिकेत न्यूयॉर्क मॅनहॅटनमध्ये १८९८ साली जन्माला आलं. आइनस्टाइनचा बुद्ध्यांक होता १६०
आणि न्यूटनचा १८० ते १९०. विल्यम जेम्स सीडिस हा असामान्य मुलगा जवळजवळ २६० हा बुद्ध्यांक घेऊन जन्माला
आला होता.
युक्रेनमधून अमेरिकेत पळून
आलेल्या अत्यंत बुद्धिमान आणि सुशिक्षित ज्यु दाम्पत्याच्या पोटी विल्यमचा जन्म झाला. त्याचे वडील बोरिस अत्यंत प्रसिद्ध
मानसशास्त्रज्ञ होते आणि आई डॉक्टर होती.
बोरिस स्वतः बहुश्रुत, व्यासंगी असल्याने आपल्यापोटी अद्वितीय असा
हिरा जन्माला आला आहे हे समजायला त्यांना वेळ लागला नाही. त्यामुळे
विल्यम खूप लहान असतानाच आपली कमाई पुस्तकं, नकाशे यावर खर्च करून त्यांनी त्याला विशेष शिक्षण द्यायला
सुरुवात केली.
अवघ्या दोन वर्षांचा असताना
विल्यम न्यूयॉर्क टाइम्स सहज वाचत असे.
अवघा सहा वर्षांचा असताना
त्याला इंग्लिश,
फ्रेंच, जर्मन, रशियन,
हिब्रू, टर्किश आणि आरमेनियन अशा आठ भाषा उत्तम
येत होत्या. येथल्या फ्रेंच भाषेत तो कविताही करत असे. हे कमी होते की काय म्हणून आठ वर्षांचा
असताना त्याने स्वत ची व्हेंडर गुड नावाची नवीन भाषा तयार केली.
भाषेबरोबर गणित व विज्ञानातही विल्यमला उत्तम गती होती. वयाच्या नवव्या वर्षी त्याने 'फोर्थ डायमेन्शन' या विषयावर हार्वर्डमध्ये व्याख्यान दिले आणि अवघ्या अकराव्या वर्षी त्याला हार्वर्डमध्ये प्रवेश मिळाला. आणि वयाच्या सोळाव्या वर्षी त्याने हार्वर्डमधून गणितातली पदवी मिळवली.
पण दुर्दैवाने हीच बुद्धिमत्ता त्याला सर्वसामान्य जीवनापासून वंचित ठेवत होती. लहानपणी त्याला खेळायला कधीही मित्र मिळू शकले नाहीत. कॉलेजमध्ये अगदी मॅथेमॅटिक्स क्लबमध्ये सुद्धा त्याचे बरेच बोलणे लोकांच्या डोक्यावरून जात असे त्यामुळे मित्रमैत्रिणी मिऴणे तर दुरच, सहाध्यायी त्याची खिल्ली उडवत. सोळाव्या वर्षी ग्रॅज्युएट झाल्यावर राइस युनिव्हर्सिटीने त्याला गणिताच्या प्राध्यापकाची नोकरी दिली. पण तिथले बरेचसे विद्यार्थीच त्याच्यापेक्षा वयानं मोठे होते. त्यांनी त्याची यथेच्छ टर उडवून त्याला अवघ्या दहा महिन्यांत राइस मधून पळवून लावले.
आता विल्यम हार्वर्डला
कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी परत आला आणि समाजवादी विचारांचा बनला. धर्माने
ज्यू आणि विचाराने समाजवादी असणं त्याच्या चांगलेच अंगाशी आलं आणि मोर्चात भाग घेणे
वगैरे अशा किरकोळ कारणांसाठी त्याला तुरुंगवास भोगावा लागला. वकिलीचे शिक्षणही त्याने अर्ध्यातच सोडून दिले.
विल्यमला साधं सरळ जीवन
जगायचं होतं.
त्याला प्रसिद्धी नको होती. त्याने जवळजवळ बाराशे
पानांचं इतिहासावर संशोधनात्मक पुस्तक लिहिलं, कृष्णविवराचा सिद्धांत
जगासमोर येण्याच्या पंधरा वर्ष आधीच मांडला. पण ही पुस्तकं त्याने वेगवेगळ्या
भलत्याच टोपण नावांनी प्रसिद्ध केली.
आपलं साधं सरळ आयुष्य जगण्यासाठी त्यांने अगदी कारकुनाची नोकरी
करायचं ठरवलं. पण बऱ्याच
वेळा लोक त्याला ओळखत आणि मग तो ती नोकरी सोडून देई.
१९२५ मध्ये विल्यमने ‘The Animate and
inanimate’ नावाचे पुस्तक लिहिले त्यात जीवनाची उत्पत्ती, ब्रह्मांड शास्त्र, तत्त्वज्ञान अशा अनेक विषयांचा ऊहापोह केलेला होता. पण आता तो प्रसिद्धीला आणि अपेक्षांना
इतका कंटाळला होता की त्यानी हे पुस्तक प्रसिद्ध करण्याचा प्रयत्नही केला नाही.
विल्यमच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी १९७९ साली हे पुस्तक प्रसिद्ध झालं
आणि प्रचंड गाजलं. तोवर कृष्णविवराचा सिद्धांत येऊन जुनाही झाला
होता त्यामुळे त्याचं श्रेय विल्यमला कधीच मिळालं नाही.
कॉस्मॉलॉजी पासून इतिहासापर्यंत
अनेक विषयात गती असलेल्या या अतिबुद्धिमान माणसाला साधं सरळ आयुष्य हवं होतं. तो जवळजवळ एकलकोंडा,
फारशी महत्त्वाकांक्षा नसलेला माणूस होता. पण त्याच्या
कुटुंबाला विशेषतः आई वडिलांना त्याच्या बुद्धिमत्तेचा प्रचंड अभिमान होता आणि त्यांना
यशाची वेगवेगळी शिखरं गाठत रहावं अशी त्यांची अपेक्षा होती. या
सगळ्यांपासून दूर राहण्यासाठी विल्यम अक्षरशः कारकून, अकाऊंटंट,
मशीन चालवणारा अशी छोटी मोठी कामं करत आयुष्य काढत राहिला. १९३७
साली द न्यूयॉर्कर या मासिकानं त्याच्या शोधात एक पत्रकार पाठवला. अज्ञातात गेलेल्या जिनीअसला या पत्रकारानं
शोधून काढलं आणि त्याच्यावर एक लेखही लिहिला. या लेखावर प्रचंड भडकून विल्यमने
द न्यूयॉर्करवर चक्क दावाच ठोकला हा खटला बरीच वर्षे चालला आणि अखेरीस १९४४ साली त्याला कोर्टाकडून नुकसानभरपाई
मिळाली पण हा आनंद फार काळ टिकला नाही. १९४४ सालीच ब्रेन हॅम्ब्रेज
होऊन वयाच्या सेहेचाळीसाव्या वर्षी
विल्यमचा अकाली मृत्यू झाला.
त्याच्या मृत्यूनंतर एमी वॉलिस या लेखिकेनं त्याचं चरित्र लिहिलं. या पुस्तकात तिनं केलेल्या काही विधानांवर विल्यमच्या बहिणीनं आक्षेप घेतले आणि या पुस्तकानंही बराच धुरळा उठवला.
असामान्य परमेश्वरी देणगी घेऊन जन्माला येऊनही विल्यम या जगात फार अनोखं असं काही
करून दाखवू शकला नाही हे दुर्दैव त्याचं की मानवजातीचं?
गंधाली सेवक
अद्वितीय विल्यम.. छान माहिती. धन्यवाद गंधाली जी!
ReplyDelete