समुपदेशन ११- Work-life Balance

Work-life Balance (Wlb) हा शब्द ऐकल्यावर ही  संकल्पना फक्त नोकरी करण्याऱ्यांसाठी आहे की काय असा प्रश्न मनात येत असेल तर उत्तर अगदी सोपे आहे. तसे अजिबात नाही. काम आणि आयुष्य यांच्यात समन्वय साधायला हवाच का? हो. कामात असणे/काम करणे हा आयुष्याचा एक अपरिहार्य  भाग आहे. तरीही दोन्हींचा एकमेकांवर परिणाम होतो. सततचे काम आणि फुरसतीचा वेळ नाही. हळूहळू याचा परिणाम कामाच्या दर्जावर होतो. कामाचा वेग मंदावतो. शरीर थकून जाते. झोप, जेवणखाण या संदर्भात अनेक नवनवीन समस्या भेडसावू लागतात. एक दुष्टचक्र मागे लागते. त्यामुळे Wlb  आवश्यक.

वय आणि Wlb यांचा एकमेकांशी संबंध आहे का? निश्चित आहे. कारण एकच- प्रत्येक वयाची आव्हानं निराळी, प्रत्येकाची ती पेलण्याची क्षमता वेगळी. Wlb ही निरोगी आणि आनंदी जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. Wlb तारेवरची कसरत जरी असली तरी जीवन आनंदी जायला जर का मदत होत असेल तर काय हरकत आहे? Wlb साधताना समोर येणाऱ्या अडचणींबद्दलही मनमोकळेपणाने लिहून काढा. आपल्या विश्वासातील व्यक्तीपाशी मन मोकळे करा त्याने मन हलके होते.

आजचा लेख हा थोडा वेगळा आहे. आता मी काही शब्द देते - यात तुम्हाला कामामधून  किंवा व्यक्तिगत आयुष्याकडून (work or life or both) काय अपेक्षित आहे, हे शब्द वाचून ठरवायचे. 
धाडस-पराक्रम वा खूप कष्ट करून किंवा तुमचे कौशल्य वापरून तुम्ही यशवीपणे पार पडलेली एखादी कामगिरी, प्रेम, पैसे, जबाबदारी, जिंकणे, दुसऱ्याला केलेली मदत, शिक्षण, आनंद, आयुष्य जगण्याचा अर्थ, आराम, सत्ता,आत्मप्रतिष्ठा, सामाजिक स्थान, स्वत;ची ओळख, सत्ता, आत्मप्रतिष्ठा, सामाजिक स्थान, स्वत;ची ओळख, आव्हानं......जसं की सारखी फिरती, दुसऱ्यावरती अवलंबून असलेले काम, सारखा कामात येणारा व्यत्यय, शनिवार किंवा रविवारी करावे लागणारे जास्तीचे काम, नाही म्हणणे जड जाते - भिडस्त स्वभाव, स्वतःकडून केलेल्या अपेक्षा, मी काम कसे करायचे ते दुसरे ठरवतात, केलेल्या कामाचे कौतुक नाही, जाणीव नाही, वेळेचं बंधन, नेमके अपेक्षित काय आहे? त्या मधून होणारे गोंधळ, समज, गैरसमज…... अशा काही बाबी आहेत ज्या Wlb मध्ये अडसर बनू शकतात. अशी परिस्थिती /समस्या किती वेळा, किती दिवस आणि किती काळ राहते याचे गणित मांडणे सोपे जाईल.

त्याच बरोबर आपण दिवसातला किती वेळ आपल्यासाठी काढतो? नातेवाईक किंवा मित्र परिवारासोबत आपण बाहेर फिरायला जातो का? शरीर आणि मन याची काळजी कशी घेतो? दिवसाचे काम किंवा त्याची यादी केलेली असते का? तुमची “आराम“ याची व्याख्या काय आहे? hobbies/interest जपताय का? आणि कसे?

एक गोलाचे पुढे दिल्याप्रमाणे भाग करा- 

1.कामाचे स्वरूप आणि जागा
2.करिअर
3.स्वतःची मानसिक, भावनिक, अध्यात्मिक वाटचाल
4.मित्र आणि सहकारी
5.आरोग्य - प्रकृती, खेळ
6. आवडी निवडी
7.पैसे.
8. मी -नातेसंबंध.

ह्यांपैकी ज्या गोष्टीत स्वतःला जितके समाधान मिळते तसा तो भाग लहान/मोठा रंगवा. आता भागांना नंबर द्या. यामुळे कशावर आपण किती भर देत आहोत कळेल. आता लक्षात येईल की Wlb साधायला आपल्याला कशावर अधिक वेळ दिला पाहिजे.

उदाहरणार्थ कोणत्या क्षेत्रात आपण जास्त समाधानी आहोत आणि कोणत्या गोष्टींकडे आपण जास्त लक्ष देणे जरूर आहे ते या गोलावरून समजते. आपल्या जवळ असलेली ऊर्जा सर्व क्षेत्रात साधारण सारखी विभागली गेली पाहिजे.

Wlb साठी एखाद्या गोष्टीचे नियोजन, त्यावरचे नियंत्रण आपण कसे सांभाळतो यावर अवलंबून असते. यासाठी मी स्वत: काळाबरोबर आहे का? हाताशी असलेल्या वेळेचा मी कसा उपयोग करते/करतो? माझी कुवत/क्षमता काय आहे? मी जे काम करते आहे त्यात मी खुश आहे का? आजूबाजूचे लोक माझ्याबद्दल काय विचार करतात? आपण आपली प्रतिमा/किंमत, आपला आत्मविश्वास दुसरे माझ्याविषयी काय विचार करतात यावर तर ठरवत नाही ना? आपल्यात असलेली सर्जनशीलता (creativity) जागृत आहे का? कोणत्या कामाला प्राधान्य देणे जरुरीचे आहे?

मी, माझ्या संपर्कात असलेली माणसे, माझे  काम हा त्रिकोण  समभुज असला तर Wlb व्हायला कठीण जाऊ नये. त्यासाठी खाली दिलेल्या गोष्टींचा जरूर विचार व्हावयास हवा. 
•         स्वतः ची काळजी - शारीरिक, मानसिक, भावनिक, आरोग्य, बौद्धिक, अध्यात्मिक स्तरांवर
•         नातेसंबंध - नवरा/बायको, मुलं, मित्र मैत्रिणी, सहकारी
•         काम - घरकाम, नोकरी, इ.

मला ताण- तणाव आहेत का? कोणत्या प्रकारचे आहेत? असतील तर ते मी कसे टाळू शकते?
माझी जीवन शैली आरोग्याला पोषक (निरोगी) आहे ना?
माझी जी  समर्थन प्रणाली (support system)आहे त्याचा मी उपयोग करते ना?
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करते ना? ते शिकण्याची माझी तयारी कशी/ कितपत आहे?
रोजच्या रोजचे माझं वेळापत्रक आखलेले आहे ना?

मी जीवनात खुश आहे का? हा प्रश्न स्वतःला एकदातरी विचाराच.


डॉ.पूर्वा रानडे




1 comment:

  1. नीना वैशंपायनAugust 1, 2020 at 11:25 PM

    सध्याच्या तणावाच्या जीवनामध्ये wlb कशाप्रकारे साधायचे ते अगदी उत्तम रित्या सांगितले.

    ReplyDelete