सण संक्रांतीचा - संवाद मनाचा

 


प्रत्यक्ष अनुभवलेला हा प्रसंग. १९८० चा तो काळ होता. माझे मि. सैन्यात होते. दर तीन वर्षाने आमचे पोस्टिंग होत असे. आसाम राज्यातील बिनागुडी येथे असताना आलेला हा एक अनुभव.

 

मिलिटरीच्या क्वार्टरमध्ये आम्ही रहात होतो. तिथे आम्ही सहा मराठी फॅमिली होतो. संक्रांतीला आम्ही सर्व मैत्रिणींना हळदी कुंकवाला बोलावून वाण देणे, फराळाचे देणे करत असू. त्या वर्षी माझ्या डोक्यात एक विचार आला. तो मी मैत्रिणींना सांगितला. मी म्हटलं आपण जरा वेगळी संक्रांत साजरी करु या. आपल्या जवळ एक आदिवासी पाडा आहे ना. तेथील बायकांसोबत आपण संक्रांत साजरी करू या.

 

कल्पना सर्वाना आवडली. पण क्वार्टरच्या बाहेर जायचे म्हणजे परवानगी काढायला हवी. तिथे एक फॅमिली हॉल होता. तिथे दर आठवड्याला महिलांसाठी कार्यक्रम होत असे. एका कार्यक्रमात आम्ही आमचा विचार ऑफिसरला सांगितला. त्यांना तो विचार आवडला. त्यांनी परवानगी तर दिलीच पण एका गाडीतून घेन जाण्याची जबाबदारीही घेतली. मग काय आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. ठरल्याप्रमाणे आम्ही सहाजणी मराठी आणि बाकी इतर बंगाली, पंजाबी, सरदारांच्या बायका अशा १५ मैत्रीणी निघालो.

 

तिथे पोचल्यावर पाड्यातील बायका आलेल्या दिसल्या. मग आम्ही त्यांना हळदीकुंकू लावून साखर, तांदूळ, तुरीची डाळ, हरबरा डाळ व गोडेतेल अशा सर्व वस्तू प्रत्येकीला दिल्या. हे सर्व घेतांना त्या बायकांच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दात वर्णन करता येणार नाही असा होता. त्याला कारण ही तसेच होते. हा बिनागुडी, सिलीगुडी भाग सर्व जंगलाचा भाग आहे. खूप पाऊस पडतो. लोकांची गरीबी, अज्ञान, शिक्षणाची सोय नाही, आरोग्याची सोय नाही. उत्पन्नाची साधने नाहीत आणि शेती करण्यासाठी योग्य जमीन नाही. थोडीफार साळीचे पीक काढायचे आणि घरात समोर साचलेल्या पाण्यात मासे पकडण्याचे काम करत असत. माश्यांचे कालवण आणि भात हेच त्यांचे जेवण होते. अशा परिस्थितीत एवढे सामान बघून त्या बायका खुष झाल्या.

 

दुसऱ्या वर्षी पण आम्ही तिथेच हळदीकुंकू केले. या वेळीचे स्वरूप जरा वेगळे होते. वरील प्रमाणे तर केलेच. शिवाय त्या पाडयात जेवढ्या गरोदर स्त्रिया होत्या त्यांना साडी चोळी, बांगडया दे, नारळ आणि फळाने ओटी भरून त्यांचे डोहाळजेवण साजरे केले. हे सर्व बघून त्या बायका अक्षरशः रडायला लागल्या. त्यांना भाषेतून भावना व्यक्त करता आल्या नाहीत पण अश्रू द्वारे आपल्या भावना त्यांनी आमच्या पर्यंत पोचवल्या. कारण त्यांना हिंदी भाषा येत नव्हती. अशा प्रकारे दोन वर्षे आम्ही संक्रांत साजरी केली.

सण-समारंभ यातून हेच तर साध्य करायचे असते. थोडा वेळ दुसऱ्यांच्या सुख-दु:खात सहभागी व्हायचे असते. ही साजरी केलेली संक्रांत माझ्या कायम लक्षात राहिली आहे.


रत्ना रामराव भोरे







26 comments:

  1. Very nice 👌👌 Awesome job which reflects humanity towards mankind

    ReplyDelete
  2. काकू खूपच छान लिहिले आहे सण साजरा करण्यासाठी इतरांना आनंद मिळेल हीच त्यामागची भावना असेल तर तो सण किती आनंद होईल तुम्ही आणि तुमच्या मैत्रिणींनी त्या आदिवासी पाड्यातल्या बायकांसोबत वेळ घालवला त्यांचा विचार केला तुमची आठवण खूपच छान आहे

    ReplyDelete
  3. खूपच छान हे प्रत्येकाने केले पाहिजे

    ReplyDelete
  4. दुसऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला पाहिजे.खूप छान संदेश या कार्यक्रमातून व कथेतून सर्वांना दिला आहे.पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद माधुरी ताई.

      Delete
  5. Khupch sundar kalpana ani tumhi fakt kalpana mandli nahi tar ti amlat anun itarana tyatun Anand milala hech khup mahatvache. Manapasun abhinandan

    ReplyDelete
  6. मनातील आठवण खूप छान मांडली आहे. दुसऱ्यांना मदत केल्यावर जो आनंद मिळतो तो अवर्णनीय असतो.

    ReplyDelete
  7. ताई, हो आज तुला ताई म्हणावेसे वाटते. तू खरंच खूप छान अनुभव शेअर केला आहेस नी अगदी गोड शब्दात.

    ReplyDelete
  8. खूप छान वर्णन केले आहेस तुम्ही साजरा केलेल्या आगळ्या वेगळ्या संक्रांतीच्या हळदीकुंकू समारंभाचे.संक्रांतीचे वाण दिल्यावर त्या आदिवासी महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बरोब्बर शब्दातून साकार झाला आहे.

    ReplyDelete
  9. अगळंवेगळं हळदीकुंकू कार्यक्रम निसर्गाच्या सानिध्यात आणि इतरांना आनंद दिला तोच आनंद सहस्रपटीने आपल्या कडे येतो, हे कृतीतून बघायला मिळाले. खूप छान

    ReplyDelete
  10. खूपच छान अनुभव रत्ना, आगळावेगळा हळदिकुंकवाचा कार्यक्रम. इतरांना दिल्याने मिळणारे समाधान काही औरच. निसर्गाच्या सानिध्यात निसर्गनियानुसार दुसर्याला हवं ते देण्याचा हळदीकुंकवाच्या माध्यमातून केलेला स्तुत्य उपक्रम.

    ReplyDelete
  11. खुपंच छान उपक्रम 👏👍

    ReplyDelete
  12. आपण अनुभवलेला प्रसंग पण वाचताना अस वाटलं कीं मीच तिथे आहे 🤗 , जसं त्या पाड्यातील स्त्रियांना हळदीकुंकू अन वाण देऊन त्यांना आनंद दिलात तसाच आनंद अकाली विधवा झालेल्या स्त्रियांना मिळावा हीच आशा आहे 🙏
    तुझा अनुभव खूप भावनिक होता रत्ना ताई 🙏🤗

    ReplyDelete
  13. धन्यवाद सुचित्रा

    ReplyDelete
  14. वाह! स्तुत्य उपक्रम!
    सुंदर अनुभव!
    सुंदर कल्पना!!

    ReplyDelete
  15. धन्यवाद

    ReplyDelete