मला संस्कृतची लहानपणापासून खूप आवड होती आणि ह्याला कारण म्हणजे माझी आई. तिचं संस्कृत अजूनही खूप छान आहे. अनेक संस्कृत सुभाषितं,वचनं आजही तिला मुखोद्गत आहेत. आम्ही भावंडं लहान असताना ती अनेक अशी सुभाषितं,वचनं मराठी अर्थासह आम्हाला ऐकवीत असे. तिचे उच्चार खूप सुस्पष्ट आणि शुद्ध आहेत. त्यामुळे ८ वी पासून पुढे संस्कृत विषय घ्यायचा हे माझं नक्की ठरलं होतं. मी तेव्हापासूनच संस्कृतच्या खूप मागे होते,पण तेव्हा आणि त्यानंतरही अनेकदा संस्कृतनी मला हुलकावण्या दिल्या. मी ८ वीत गेले आणि आमच्या शाळेतले संस्कृतचे सर रिटायर झाले. त्यामुळे मी ८ वी,९ वी,१० वी संपूर्ण राष्ट्रभाषा हिंदीची आवड जोपासली.
त्यानंतर मधे बराच काळ गेला. २००६ साली आमची जळगावला
ट्रान्सफर झाली. तिथे आमच्याच बिल्डिंगमध्ये राहण्याऱ्या मुजुमदार मॅडम संस्कृतचे क्लास
घेत असत. त्यांचे क्लासेस खूप जोरात चालत असत. इथे परत एकदा माझ्या संस्कृत प्रेमाला भरती आली आणि हे संस्कृतप्रेम मला
स्वस्थ बसू देईना. मी मॅडमकडे जाऊन त्यांना माझा क्लास घेण्यासाठी विनंती केली. त्या तयारही झाल्या. त्यांनी माझे एक-दोन क्लास
घेतले,पण त्यांच्या बिझी शेड्युलमध्ये त्यांना हे शक्य होत नसल्याचं त्यांना आणि मलाही जाणवलं आणि माझी गाडी 'रामः रामौ रामा:' या टेबलपाशीच थांबली. आणि अशा रितीने संस्कृतनी मला परत एकदा हुलकावणी दिली.
माझा मुलगा,आनंद,८ वी त गेला. त्याने ८ वी,९ वी,१० वी साठी संपूर्ण संस्कृत घेतलं आणि
त्याने तो विषय चांगला डेव्हलपही केला. त्या नंतर तो आणि माझी आई जेंव्हा एकत्र
येत असत तेव्हा त्या दोघांमधला संस्कृत हा एक कॉमन डिस्कशनचा विषय असायचा आणि
तो ते खूप एन्जॉयही करत असत. मी मात्र आपल्याला संस्कृत येत नाही अशी हळहळ वाटून
मनातून खट्टू होत असे.
त्यानंतर साधारण ३ वर्षांपूर्वी मी ठाण्याला असताना
माझ्याकडे एक सीबीएसईचा मुलगा ट्युशनसाठी येत असे. त्याने ५ वीत
गेल्यावर संस्कृत विषय घेतला आणि त्याला संस्कृत ट्युशनसाठी टीचर मिळत नव्हती,तेव्हा त्याच्या आईने, त्याचं बेसिक संस्कृत आहे,
त्याला थोडी मदत कराल का असं विचारलं. माझं संस्कृत प्रेम पुन्हा
एकदा उफाळून आलं. ५ वीचा मुलगा जे करू शकतो ते आपण नक्कीच करू शकलो पाहिजे या
उदात्त विचाराने मी परत एकदा त्याच्या बरोबर संस्कृत शिक्षणाचा श्रीगणेशा केला. पण
पुढे पुढे त्याचा अभ्यास व्हास्ट होतं जातोय आणि माझ्या ट्युशन्स व इतर अँक्टिव्हिटीज मुळे मलाही शक्य
होतं नाहीये असं माझ्या लक्षात आलं आणि या वेळी संस्कृतनं
मला सोडलं नाही,पण मी मात्र नाईलाजानं संस्कृतला सोडलं.
नंतर ठाण्याहून मी बेंगलोरला आले. इथे आल्यावर मी भगवद्गीता पाठांतर
सुरू केलं. मी पुण्याच्या गीताधर्म मंडळाच्या भगवद्गीतेच्या परीक्षा देत
होते. या दोन्ही अँक्टिव्हिटीजमधे मला संस्कृत येत नाही याची पदोपदी जाणीव होत होती
आणि खंतही वाटत होती. सुदैवाने या दरम्यान आमच्या तुकारामगाथा वाचनाला येणाऱ्या
श्री. कोठारी काकांनी आम्हाला संस्कृत भारती आणि संस्कृत प्रवेश
परीक्षेविषयी माहिती दिली आणि परत एकदा माझ्या संस्कृत प्रेमाने उचल खाल्ली. पण
या वेळेस संस्कृतने हुलकावणी मात्र दिली नाही.
कोठारीकाका आणि मानसी फडके यांचं मार्गदर्शन,तसंच माझ्या बरोबर संस्कृत परीक्षेसाठी बसलेल्या मंजिरी,अपर्णा,दीपा यांसारख्या माझ्या
सख्यांच्या
साथीने अभ्यास करून मी अखेर संस्कृत प्रवेश परीक्षा दिली. याचा मला झालेला आनंद
वर्णनातीत आहे. आता मात्र ही गाडी इथेच थांबवायची नाही. ही तर आता संस्कृत
शिक्षणाची सुरुवात आहे. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. पण आता यापुढे संस्कृत मला
आणि मी संस्कृतला सोडणार नाही असा अढळ विश्वास मनात निर्माण झाला आहे.
सौ. शुभदा अनिल पाठक
हार्दिक अभिनंदन शुभदाताई !
ReplyDeleteआपली संस्कृत भाषेसंबंधीची आवड कळाली. आनंद वाटला. तुमच्यासारखेच
माझ्याही बाबतीत संस्कृत शिकण्याविषयी घडले आहे. यावर कधीतरी बोलूत.
या भाषेबद्दल तुमचा ओढा आणि जिद्द कौतुकास्पद आहे. पुनश्च अभिनंदन...
धनंजय जोग, प्रकृती फौंडेशन. बेंगळूरू
धन्यवाद जोग सर
ReplyDeleteअभिनंदन शुभदाताई,
ReplyDeleteतुम्हाला संस्कृत विषय शिकतांना येत असणारा अनुभव किती छान आणि शब्दात् मांडलात तुम्ही.विषय शिकण्यासाठी असणारी आर्तता आणि आनंद जाणवतो तुमच्या लेखनात. सुदैवाने कोठारी महोदयांसारखे मार्गदर्शक लाभलेत तुम्हाला. तुमची आवड, इच्छा आणि संस्कृत बद्दल चे प्रेम असेच जोपासां हिचं सदिच्छा आणि पुनश्च अभिनंदन!!!
धन्यवाद रश्मी
ReplyDelete