सरस्वतीबाई रिसबूड
माणसाने जन्मापासून मरणापर्यन्तचा "मुक्काम" उत्तम व्यवहारे केला, सार्थकी लावला, की जनलोक म्हणतात - "जीवन ह्याला कळले हो!" कालपरवापर्यन्त अशी एक व्यक्ती आपल्यातच वावरत होती!
पहिल्यापासून सांगते.....
नोकरीतील बदलीमुळे आम्ही बेंगळुरात आलो नि आपोआप महाराष्ट्र मंडळात जाऊ लागलो. तिथेच भरणाऱ्या स्त्री-सखी मंडळात मी प्रवेश केला आणि साहित्य अकादमीचे बक्षीस मिळवणाऱ्या लेखिका म्हणून सरस्वतीबाई रिसबूड ह्या नावाचा दबदबा ऐकला. इरावतीबाई कर्व्यांच्या "युगान्त"चा कन्नड अनुवाद त्यांनी केला होता. गोदावरीबाई परुळेकरांच्या "जेव्हा माणूस जागा होतो"चा "मानव एच्चेताग" हा कन्नड अनुवादही त्यांनीच केला होता. दुर्गाबाई भागवतांच्या"पैस"; तर श्रीपाद जोशी ह्यांच्या "भारतीय मुसलमान काल,आज आणि उद्या"; श्री.रा.भिडे ह्यांच्या"वाल्मिकी रामायण-शाप आणि वर"; छाया दातारांच्या"स्त्री-पुरुष"चा; ग.प्र. प्रधानांच्या "स्वातंत्र्य संग्रामाचे महाभारत" ह्या पुस्तकांचे त्यांनी केलेले अनुवाद गाजत होते. केन्द्र साहित्य अकादमी, कर्नाटक साहित्य अकादमी, कर्नाटक अनुवाद साहित्य अकादमीचे पुरस्कार त्यांनी पटकावले होते. "कन्नड शिका" हे त्यांचे पुस्तक लोकप्रिय झाले होते. मराठी पुस्तकांचे कन्नड अनुवाद तर त्यांनी केलेच, शिवाय कन्नड पुस्तकांचे मराठी अनुवादही केले आहेत. कन्नड रंगभूमी, साहित्य क्षेत्रातील दिग्गजांच्या ओघवत्या, बोलक्या मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत.
इतक्या गाजलेल्या आणि गंभीर पुस्तकांच्या लेखिका म्हणजे बाई "भारी" असतील वाटलं होतं. भेटायच्याआधी थोडी आदरयुक्त भीती वाटत होती. पण त्यांच्याशी ओळख झाली मात्र; साध्या राहाणीच्या, लहानसर चणीच्या, मृदू बोलणाऱ्या सरस्वतीबाई प्रेमळ "मावशी" झाल्या. भीती पळून गेली-आदर मात्र राहिला. वयाने माझ्या आईच्या मोठी बहीण वाटाव्यात अशा दिसणाऱ्या. जेपीनगरात आम्ही 17 ए रस्त्यावर तर त्या 14व्या रस्त्यावर एकाच 2nd फेजमध्ये. मग वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या निमित्तांनी सरस्वतीमावशींची ओळख दृढ झाली. श्री.गजाननराव रिसबूडांशीही चांगला परिचय झाला. बेंगळुरात आम्हाला वडीलधारी माणसं लाभली.
त्या दोघांनाही जशी आवड साहित्याची तशीच माणसं जमवण्याचीही! जेपीनगरामधल्या त्यांच्या परिचयाच्या ८-१० कुटुंबांना मावशींनी एका संक्रांतीला घरी बोलावलं. तिळगुळाच्या वड्यांनी स्वागत केलं नि आमच्या जेपीनगरच्या मासिक-द्वैमासिक सभांचा शुभारंभ झाला. पुढे पुढे जमणाऱ्यांची संख्या खूप वाढली; घरांचे हॉल बसण्यासाठी अपुरे पडायला लागले आणि हळूहळू त्या सभा बारगळल्या.
मावशी गोष्टीवेल्हाळ खऱ्या. आपण उत्सुकतेने काही विचारावं, तर सगळी माहिती इत्थंभूत सांगायच्या. मराठी-कानडी सणवार, रीतीरिवाज, खाद्यपदार्थ, साहित्य, राजकारण सगळ्या विषयांमध्ये त्यांना गती होती. त्यांना लिहितं करणाऱ्या त्यांच्या मोठ्या भावाला त्या गुरुस्थानी मानायच्या. एकूण घरातल्यांविषयी त्यांना वाटत असलेलं प्रेम, कौतुक, अभिमान त्यांच्या बोलण्यातून जाणवायचं.
एकदा मी त्यांच्याकडे गेले असताना त्यांच्या कन्नड साहित्यिक मैत्रिणी आल्या होत्या. माझ्या मोडक्या-तोडक्या कन्नडातून बोलायला मला संकोच वाटला. पण मावशी मला म्हणाल्या, 'अगं,बोलत जावं आपण. कोणी काही हसत नाही. बोलत राहिलीस, तर येईल हळूहळू. टीव्हीवरचे, रेडिओवरचे कन्नड कार्यक्रम बघत-ऐकत जा.'
महाराष्ट्र मंडळाच्या 'सनविवि'चे संपादन मी हातात घेतलं, तेव्हा मावशींनी माझी पाठ थोपटली होती. तेवढ्यावरच त्यांचं प्रोत्साहन थांबलं नाही. ज्या ज्या वेळी 'सनविवि'साठी त्यांचं लिखाण सांगितलं, त्या त्या वेळी आनंदाने देत राहिल्या! "बखर@100" पुस्तकाच्या वेळीही मुलाखतीत भरभरून बोलल्या. त्यांची नेहमीची सांगी होती - संधी मिळाली की तुम्ही मुलींनी ती घेतलीच पाहिजे.
ज्या पिढीने अंगमेहनतीच्या कामांचा आळस वा कंटाळा केला नाही, त्या पिढीतल्या होत्या मावशी. स्त्री-स्वातंत्र्य हा शब्दही न उच्चारता आनंदाने आपली गृहिणीची कर्तव्ये सांभाळली, त्याचवेळी फक्त घरातच गुंतून न राहाता अंगच्या गुणांचं नेमकं भान राखले. ह्या पिढीच्या स्त्रियांनी ते गुण प्रयत्नांनी वाढवले.त्यासाठी पडणाऱ्या कष्टांची पर्वा केली नाही, समाजाच्या मानसिकतेची तमा बाळगली नाही. सरस्वतीमावशींचा घरातला वावर चटपटीत होता. तसा तो हाती घेतलेल्या अनुवादाच्या कामातही होता. मोठमोठ्या नावाजलेल्या गंभीर पुस्तकांच्या अनुवाद-कामात जी शिस्त, चिकाटी, एकतानता आणि दोन्ही भाषांमधील निपुणता लागते, ती सरस्वती मावशींनी कमावली होती. अनुवादासाठी पुस्तकनिवड करण्यामध्ये चोखंदळपणा हवा, तोही त्यांनी अवलंबला. पुस्तक वाचतानाच जाणवलेले वेगळे, महत्त्वाचे मुद्दे टिपून ठेवण्याची त्यांची सवय होती. जबरदस्त पाठान्तर होतं त्यांचं. मराठी-संस्कृत स्तोत्रं आणि अनेक मराठी-कन्नड कविताही त्यांना पाठ होत्या.
सरस्वतीमावशींच्या साहित्याचा आढावा घेण्यासाठी बरेच मातब्बर आहेत. लेखिका म्हणून त्यांचं कर्तृत्व वाखाणण्यासारखंच आहे. ते वगळून मावशी मला अशा दिसल्या-भावल्या! सरळ, साध्या, घरगुती, कर्तव्यतत्पर, हुशार, कामावर निष्ठा असणाऱ्या, संस्कार जपणाऱ्या, आपल्या मानलेल्या माणसांवर माया करणाऱ्या प्रेमळ, निरोप घेताना गेटशी आल्या की मोठ्या हौसेने दरवळणाऱ्या पारिजातकाची ओंजळभर फुलं हातात देणाऱ्या रसिक!
आता त्यांचा निरोप घेताना माझ्याकडे आहेत फक्त ही स्मृतीफुलं!
माणिक पटवर्धन आणि डॉ. अजय पटवर्धन ह्यांनी सरस्वती बाई रिसबूड ह्यांच्या स्मरणार्थ मराठी साहित्य क्षेत्रातील व्यक्तीला एक पुरस्कार देण्याचे ठरवले आहे.
रोख रु.25,000 आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असेल.
अनुराधा चौगुले
भावपूर्ण आदरांजली!
ReplyDelete