शब्दसुरांच्या जगात ... जुस्तजू



"मीरा..."
एक शोध...
अमूर्ताचा...
अज्ञाताचा...
अप्राप्याचा...
अक्षय अविनाशी आनंदाचा अखंड शोध आहे मीरा... नेहमीच धूसर, धुक्याच्या अर्धपारदर्शी, स्वप्नील वस्त्राच्या आडून तिची सावळी श्यामलकांती जाणवते मला... चेहरा स्पष्ट नसतो...पण आवाज? तो मात्र अगदी स्पष्ट ऐकू येतो. 
अतिशय मधुर, भावप्रवाही...आत्ममग्न... कधी अतीव आनंदात तल्लीन... तर कधी पराकोटीच्या दु:खात चूर! ती भावनेच्या कोणत्याही झोक्यावर असो... ती बोलते ते फक्त तिच्या प्रियकराशी... नाहीतर त्याच्याविषयी. भाषाही तिला फक्त त्याचीच येते.
कुठे राहाते ती?... राजस्थानात?... नाही...
वाळवंटात... जिथे उमटलेल्या तिच्या सावळ्याच्या पाउलखुणांचा मागोवा घेत... अदम्य विश्वासाने, त्याच्यावरच्या प्रेमाने तिची वाट ती चालते आहे. सोसाट्याच्या वाऱ्याने त्या खुणा मिटल्या तरीही ती चालते... चालतच राहाते. कारण तिचा विश्वास आहे की तो भेटणार आहे... तो आहे... आत्ता इथेच तर होता... अगदी इथेच... तिच्या अगदी जवळ... अरे!... मग गेला कुठे?

ऐसी लगन लगाई, कहां तू जासी
तुम देख्याबिण कल ना परत है
तलफी तलफी जीव जासी...

असू दे... असाच आहे तो... हुलकावण्या देणारा... हाती लागला असं वाटेपर्यंत निसटून जाणारा... पण एक ना एक दिवस ती भेटेलच त्याला... आणि मग असा घट्ट धरून ठेवेल की तो सुटूच शकणार नाही पुन्हा. मग त्यासाठी कितीही वाळवंट पार करण्याची तिची तयारी आहे...
वाळवंट...
फक्त वाळूचीच नसतात डार्लिंग
फुलांची असतात...
झाडांची असतात...
घरांची असतात...
शहरांची असतात...
आणि अनाथ अंतरिक्ष तर
नव्या सौंदर्यजटील साक्षात्कारी वाळवंटाचा
एक साधा प्रारंभ असतो.
अफाट विश्वपसाऱ्यातल्या या एकाकीपणाच्या जाणीवेत... भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते...असं म्हणणाऱ्या ग्रेसांच्या चेहेऱ्यात मला मीरेचा भास होतो... तिनेही तुडवली आहेत ही सुखसोयींची, ऐश्वर्याची, प्रलोभनांची सुंदर वाळवंटं... आणि अपमानाची, बदनामीची, बळजबरीची विषारी वाळवंटंसुद्धा. केवळ तिच्या स्वप्ननिळ्याच्या ध्यासावर तगली ती... तोच तिचा श्वास, निश्वास आणि विश्वास. वाट पाहिली तिनं त्याची खूप... तो भेटेल तेंव्हा खरं... तोपर्यंत सारं काही सुनं सुनं... एकाकी.

तेरे कारन बन बन डोलू, करू जोगन को भेस
मीरा के प्रभू कब रे मिलोगे, पंडर हो गया केस...
पी बिण सुनो छे जी म्हारो देस...

लग्न झालंय... राज्य, ऐश्वर्य, सगळे सुखोपभोग हात जोडून समोर उभे आहेत... अट फक्त एकच... कृष्णाला विसरून जायचं. राणाजींची पत्नी म्हणून एक सुस्थिर, प्रतिष्ठीत आयुष्य कंठायचं... त्यांना सोडून कृष्णावर प्रेम!!!...हा काय वेडेपणा? असं एका परपुरुषावर प्रेम करणं म्हणजे केव्हढा मोठा गुन्हा!!!... समाजाच्या नीती नियमात बसतं का हे?
बरं... तो आहे कुठे?... माहीत नाही.
वास्तवात भेट तरी होणार आहे का त्याची?... माहीत नाही.
त्याचंही तसंच प्रेम आहे का तिच्यावर... उत्कट, निस्सीम?... माहीत नाही.
स्वीकार करेल का तिचा?... माहीत नाही.
सगळंच अनिश्चित... वाळूसारखं... भुरभुर कधीही हातून निसटू पहाणारं... पण हे सगळे प्रश्नच तुमच्या, आमच्या आणि राणाजींच्या जगातले... समाजाच्या चौकटीबाहेरचा, जगावेगळा ध्यास घेणाऱ्यांसाठी विषाचा प्याला पुढे करणारे. मीरा... तिला यांची चिंताच कधी करावीशी वाटली नाही. या साऱ्या प्रश्नांच्या माहीत नाहीया उत्तराने तिच्या पायाखालची वाळू सरकली नाही. सुखं-दुखं, भेटीची आशा-निराशा, मिलन-विरह ह्या सगळ्या झंजावातांना पुरून उरली ती...तिच्या पराकोटीच्या प्रेमामुळेच... आणि ध्यासामुळे. त्यातूनच शक्ती मिळाली तिला... विषाचाही प्याला पचवण्याची आणि अथक चालत राहाण्याची.

आपल्याला आत्यंतिकपणे हवी असलेली गोष्ट साध्य करण्याचा मार्ग स्त्रियांसाठी कधीच सोपा, सरळ नव्हता. स्त्रियांनी गाणं... तेही भर सभेत!!!... अनेक गुणश्रेष्ठ कलावतींकडेही हिणकस नजरेनं बघितलं जायचं... फार वाईट वागणूक मिळायची. मनात जपलेल्या सुरांच्या निळ्या ध्यासातून मैफली करत फिरतांना, रहाण्या-झोपण्याची कुव्यवस्था, अंगणात बसवून करवंटीतून प्यायला लागणारा चहा... म्हणजे समाजाने पुढे केलेला अपमानास्पद वागणुकीचा विषाचा प्यालाच की तो. पण ते सारं पचवून जी बाई अमृतासारखं संगीत निर्माण करते... संगीतावरची श्रद्धा, सुरांचा ध्यास हेच आयुष्याचं सारसर्वस्व मानते...त्यात स्वत:ला झोकून देते... त्या गानतपस्विनी मोगूबाईंच्या चेहेऱ्याचा भास होतो मला... मीरेच्या धुक्यासारख्या वस्त्राआड.


मुझे दर्द-ए-दिल की है जुस्तजू
मुझे जुश्मेतर की तलाश है...

सुखासक्त मनाला काहीही शोधायचं नसतं. आपल्या सभोवताली जे आहे त्यातच ते अडकून पडतं. भौतिक सुखं, नाती, पैसा, यश हे मिळालं, की मन सुखाच्या एका विचित्र कल्पनेत, आभासात अडकतं आणि त्याच त्या चक्रात फिरत रहातं. मग आत्म्याला काय हवंय ते शोधायचंच राहून जातं. त्याचा खरा आनंद कशात आहे याचा शोध घेण्यातच जीवनाची इतिकर्तव्यता आहे याचाच विसर पडणं हा फार मोठा धोका... म्हणूनच वाटतं की फुलांची वाळवंट जास्त धोकादायक असतात. हृदय सतत त्या आनंदनिधानाच्या शोधात राहू लागलं की त्याला दु:खाचा सामना करावाच लागतो... बेचैनी, निराशा, तळमळ, आस, कासाविशीच मनाला पुढे वाटचाल करायला भाग पाडते. हे अजिबात सोपं नसतं. मंजिल, ध्येय जितकं उंच, अप्राप्य, अमूर्त तितका रस्ता अधिक खडतर आणि हृदयाच्या वेदना असह्य... हे मीरेपेक्षा चांगलं कोणाला समजणार?

ऊंचा नीचा महल पियाका म्हांसूं चढ़्‌यो न जाय।
पिया दूर पंथ म्हारो झीणो, सुरत झकोला खाय॥

वर्षानुवर्ष ज्यांचा तोडी ऐकून आपले कान आणि मन तृप्त होत आले आहेत, ते पं. भीमसेन जोशी जेंव्हा म्हणतात, “माझ्या मनातला तोडीचा अतिकोमल गांधार मला अजून सापडायचा आहे”. तेंव्हा मला वाटतं... तो गंधार होतो कृष्ण आणि हृदयात त्याच्या शोधाची आस घेऊन निघालेल्या भीमसेनजींमध्ये दिसतात मीरेच्याच खुणा...

संगीताच्या साधकांसाठी सूर हीच भाषा...जे काही व्यक्त व्हायचं ते याच भाषेतून... दुसरी भाषाच आपल्याला जणू अवगत नाही असं म्हणणाऱ्या किशोरीताई. कुठल्याही घराण्याच्या बांधिलकीपेक्षा स्वत:ला स्वरसंप्रदायी मानणारी ही स्वरार्थरमणी. प्रथम सुर साधे...’... हा सूर साधण्यासाठीच तर सारा जन्म... सारा रियाझ... सारा प्रवास... तोच जिवलग... तोच सहेला आणि त्याचीच सारी भाषा. अशी ज्या कलाकाराची आस आहे... त्याचं गाणं ऐन भरात असतांना, आवाज काम देईनासा झाल्याने थांबतं... तेंव्हा त्याची मानसिक अवस्था काय होत असेल याची कल्पनाही करता येणार नाही. ताई सांगतात या सबंध काळात मी मनात गात होते...”.
अमूर्ताच्या शोधाचा हा प्रवास व्यक्त होण्याच्या, बाहेरच्या वाटा बंद झाल्यावर, आतल्या वाटांकडे वळवणं... ही तर मीराच की...! शेवटी अशाच कलाकाराच्या माध्यमातून तो अमूर्त सूर आसमंतात दरवळत रहातो आणि विलक्षण अनुभूती देत रहातो. ही सुरांची अखंड तपश्चर्या अशा तऱ्हेने फळाला येते तेंव्हा त्यात मीरा अलगद दिसतेच.

गर्भारपणातल्या ढासळत्या देहशिल्पाच्या बेडौलपणामुळे विचलित होऊन समुद्राच्या महानर्तनात विसावा शोधण्यासाठी निघालेली मनस्विनी नर्तकी इसाडोरा...तिच्या तरल भावस्थितीचं वर्णन ग्रेसांच्याच शब्दात करणं योग्य होईल. ते म्हणतात तिच्या स्वैर आयुष्यावर अनेकांनी केलेली अनेक तथाकथित सभ्य भाष्ये मला चांगली ठाऊक आहेत. पण मला मात्र कधीही इसाडोरा ही स्वैर स्त्री वाटलीच नाही. आयुष्यातील सर्व अनुभव चिंतनक्षम आणि सृजनशील मनाने टिपणारी ही बाई, ग्रीक शिल्पांमधील आदिम मानवतेला सजीवपणे तरल रूप देणारी ही नर्तकी, कलावंत मनाची जितीजागती निशाणी आहे. कुठलाही अनुभव तिने टाळला नाही, की आंधळेपणाने स्वीकारला नाही. प्रत्येक ठिकाणी इतकी डोळस आणि सजग असते ती... की गात्रागात्रात तिने सृजनाची मरणभोगी लय मुरवून घेतली आहे, असे वाटू लागते. आयुष्यात आलेली कुठलीही व्यक्ती किंवा कानावर पडलेली कुठलीही हाक इसाडोराने कधीही तुच्छ वा टाकाऊ मानली नाही. प्रत्येक ठिकाणी जागृत प्रतिसाद दिला. आणि संबंधांच्या अटळ अंतातील दारुण ताटातुटीचे सत्य स्विकारून प्रत्येक सादप्रतिसाद कलेत सरूप केला.”.....

पग घूँघरू बाँध मीरा नाची रे।......

जगाच्या पाठीवर अशी अनेक वेडी माणसं आहेत की जी अमूर्ताच्या, अज्ञाताच्या शोधात वणवण भटकली आहेत. काही मुक्कामावर पोहोचली तर काहींची पावलं वाटेतच थकली. स्वत:च्या स्वप्नावर विश्वास ठेवण्याची प्रचंड हिम्मत असणारी ही माणसं... द अल्केमिस्टमधल्या सांतियागो सारखी... आपापल्या खजिन्याच्या शोधात बाहेरची वाळवंट तुडवणारी तर काही स्वत:च्या आतली वाळवंट पार करणारी... पण शेवटी खजिना स्वत:पाशीच असल्याचा साक्षात्कार घडवणारी. मला अनेकदा भास होतो आणि वाटतं की या साऱ्यांचे चेहरे एकाकार होऊन मीरेचं रूप घेताहेत...

आपल्या ध्येयाची खडतर वाट चालतांना ज्यांना एका क्षणी त्या सर्वोच्च अशा प्रतिभेचा स्पर्श झाला... ते मुक्कामावर पोहोचले. समाज अशा व्यक्तींना क्षितीजापलीकडे पहातो आणि त्यामुळे एक माणूस म्हणून त्यांनी केलेली धडपड पहाणं थांबतं. मीरेचा विचार करतांना तिचं कृष्णावरचं प्रेम एवढंच मी मनासमोर ठेवलं... इतकं प्रेम.....कि तिचं स्वतंत्र अस्तित्वच न उरणं!!! ..... किंवा त्या हरीचंच अस्तित्व तिच्यात विलीन होणं... ही प्रेमाची उत्कटता...या खडतर वाटेवर कृष्ण म्हणजे अप्राप्य, अमूर्त अशी मौल्यवान गोष्ट आणि मीरा, ही ते प्राप्त करण्यासाठी पावलं रक्तबंबाळ होईपर्यंत चालत राहण्याची शक्ती असणारं आपल्यातलं कोणीही... या आनंदनिधानाच्या शोधात आपापल्या वाट्याला येणारी वाळवंट ही तुडवायाचीच असतात...

कलाकार म्हणून मीही एक प्रवासी... ही सारी मनस्वी माणसं मला माझ्या क्षितीजावर दिसतात. आणि हेही जाणवतं की त्यांना त्यांचं क्षितिज त्यापेक्षा आणखीही पुढे आफाट पसरलेलं दिसतच असणार. म्हणूनच कदाचित ग्रेस म्हणतात क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी...अमर्याद... पुढे पुढे जाणारी. 
एकूण काय शोध सुरूच... अखंड जुस्तजू.

प्रवरा संदीप

1 comment: