‘ताई, पुन्हा तेच झालंय, हा सातवा आठवडा
आहे. आणि बाळाचे ठोके थांबलेत. आपल्याला काहीच करता येणार नाही.’
काय बोलायचे, काहीच सुचत नव्हते. डोळ्यातून फक्त
पाण्याच्या धारा लागलेल्या.
‘दुसरीकडे कुठून सोनोग्राफी करायची का? तुमच्यावर अविश्वास नाहिये पण ही तिसरी
वेळ. असं का होतय?’
‘तुम्हाला जिथे करायची तिथे करा, मी चिठ्ठी लिहून देतो पण मनाची तयारी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.’
‘माझ बाळ ह्या सहाव्या आठवड्यापुढे जाणारच नाहिये का? असं असेल तर मला पुन्हा चान्स घ्यायचाच
नाही.’
एवढं मन तयार करुन मी हॉस्पिटल बाहेर
पडले. जसजसे घर जवळ येत होते, धीर सुटत होता.घरी आईबाबा, सासू सासरे सगळेच माझी वाट पहात होते. पुन्हा एकदा साऱ्यांच्या पदरी निराशा!
मला कोणी काही बोलणार नव्हतं. पण त्यांच्या डोळ्यातल्या माझ्यासाठीच्या
सहानुभूतीच्या नजरांना मला तोंड देता येणार नव्हतं. राग तर आलेला पण कोणाचा ते
माहीत नव्हतं. त्या अडवून धरलेल्या अश्रुंमागे आता काही फक्त दु:ख नव्हतं.
सगळा विचार सुरु असतांनाच समोर अचानक ४
ते ५ कुत्र्यांनी एका छोट्याशा कुत्र्याच्या पिल्लावर हल्ला केला. त्याला चावून
मारलेच असते जणू! आणि मी नकळत माझ्या नवऱ्याला त्या पिल्लाला वाचव म्हणून सांगितलं.
त्यालाही आश्चर्यच वाटल असावं बहुदा पण काही ना बोलता त्याने त्या पिल्लाला उचलून
घेतले. नंतर मात्र त्या पिल्लाने अगदी घरापर्यंत आमचा पाठलाग केला. आणि ते आमच्या
घरचा सदस्यही झाले.
दोन दिवसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन सगळे
सोपस्कार पूर्ण करुन, मन भयंकर घट्ट करुन घरी येण्यासाठी निघाले. मी घरी आल्यावर
मला पुन्हा हा विषय नकोय अशी जणू तंबीच दिली होती. त्या दोन दिवसात त्या
कुत्र्याच्या पिल्लाकडे मी काही विशेष लक्ष दिले नाही. मुळात हा प्राणी मला कधी
आवडलाच नाही. ते पिल्लू उपाशी राहू नये म्हणून मी त्याला खायला घातलेले. पण
त्याच्याशी जवळीक होऊ नये ह्याची पुरेपूर काळजीही घेतली. त्या दिवशी मात्र मी घरी
आल्यावर खोलीत जाऊन आडवी झाले आणि मला काही कळायच्या आता त्या पिल्लाने माझा
संपूर्ण चेहरा अक्षरशः चाटून काढला. त्याला लांब करण्याचा प्रश्नच येत नव्हता.
कारण आईच्या वात्सल्याहूनही अधिक त्या स्पर्शात काहीतरी होतं. खरंतर
मला रडायचं नव्हतं, मी रड़ले असते तर एकदम कोसळून गेले असते ह्या भीतीने मी माझ्याजवळ
कोणाकोणालाच येऊ देत नव्हते. अशावेळी त्या पिल्लाने मला न घाबरता, माझ्याजवळ हक्काने येऊन मला शांत केले
होते. त्या पिल्लाचा तेव्हाचा स्पर्श, त्याची नजर खूप व्यक्त होणारी होती, आश्वासक होती. तो कदाचित आमच्या दोघीतला पहिला संवाद…..मला तेव्हा न कळलेला.
त्यानंतर माझ्या पुढच्या प्रेग्नसीत
जेव्हा जेव्हा काही विपरीत घडेल अशावेळी तिने ब्राउनीने दिलेल्या मला पूर्वसूचना
(म्हणजे अगदी माझ्या ड्रेसला पकडून मला घराबाहेर खेचणे, डॉक्टरकडे जा असं सांगणारी ही खूण, आल्यावर माझ्या पोटाचा पूर्ण वास घेऊनच
मला घरात प्रवेश देणे). बाळ झाल्यावर त्याच्या रडण्याअगोदर आमचे लक्ष वेधून घेणे.
ह्या प्रत्येकवेळी ती माझ्याशी संवाद साधत होती. पण बहुधा आम्ही कमी पडत होतो
संवाद साधताना…
पण नंतर जाणीवपूर्वक ही संवादाची कला
शिकून घेतली आणि त्यानंतर सुरु झाला एक वेगळाच प्रवास!
त्यांचं विश्व, त्यांच्या भावना आणि माणसातली भावनिक
गुंतवणूक सारे समजून घेताना अंतर्मुख झाले. माणसाच्या स्वार्थी विचारांची लाज
वाटायला लागली. बुद्धी आणि स्मरणशक्ती ही बलस्थाने कशी कोती ठरतात ह्याचा प्रत्यय
येऊ लागला. त्या साऱ्या संवादाच्या कहाण्या, प्रत्येक प्राण्याची स्वत:ची एक गोष्ट
मला समृद्ध करत आहेत.
अनुजा सामंत
व्वाह! सुंदर.
ReplyDeleteहो खर म्हणालात ताई तुम्ही हे सर्व आपल्या शब्दा पलीकडचे आहेत आपण फक्त माणूस म्हणून जन्माला आलोत पण आपण आपलीं माणुसकीचा कर्तव्य जे असत ते विसरलो आहोत ते कधी तरी आपल्याला प्राण्यांकडुन शिकायला मिळत त्याची भाषा आपल्याला कळत नाही पण त्यांच्या डोळ्यांच्या भावना ने ते आपलयाला सांगण्याचा प्रयत्न करत असतात अस मला सांगावस वाटतं
ReplyDeleteMast!
ReplyDelete