"शब्द शब्द जपून ठेवा बकुळीच्या फुलापरि" ह्यातील शब्द कोमल आणि
हृदयस्पर्शी आहेत. काही शब्द हृदयात गुंजन करतात. काही शब्द आर्तपणे परमेश्वराची
आळवणी करतात. काही शब्द अवखळ, अल्लड बालपणातून विहरतात. काही
शब्द चंदनाप्रमाणे शीतल, सुगंधित, दुस-याला
आल्हाद देतात.असे हे शब्दांचे विश्व आज आपण उलगडून बघणार आहोत.
हे शब्द कधी
पुलासारखे असतात. एकमेकांची मने जोडतात. लहान बाळाशी आपण त्याच्या बालभाषेत बोलतो , त्यामुळे तो खूष होतो, हसतो. तो
हसल्यावर घरात नंदनवन फुलते. हाच मुलगा शाळेत जातो. बालवाडीत गेल्यावर तिथे काय
काय झाले हे रंजकपणे सांगतो. ते चिमणे बोल आईच्या मनाला स्वर्गसुखाचा आनंद देतात.
शाळेत खेळ शिकवणारे सर , जिंकल्यावर तर कौतुक करतातच,पण जेव्हा एका गुणाने खेळ हरला जातो तेव्हा , मेणाहून
मऊ होऊन सांत्वन करतात. त्यावेळी ते तुम्ही असे का खेळलात? असे
खेळायला हवे होते, असे मुळीच रागवत नाहीत.Well played!! Never mind!! जखमेवर
मलमपट्टी करणारे, आधार देणारे, त्यांचे
शब्द खेळाडूंना अपयशातून सावरतात.
मुलगी पळून जाऊन
लग्न करते व संध्याकाळी नमस्कार करायला येते. तेव्हा वडील तर बोलतच नाहीत. आईला पण
सुरवातीला काय बोलावे कळत नाही, पण नमस्कार केल्यावर,
त्यांना खांद्याला धरुन "सुखी रहा" एवढे दोन शब्दही
त्यांचे भावविश्व फुलवतात. "थांब हं बाळा तुझी ओटी भरते" असे आईने
म्हटल्यावर, मुलीलाही आपले माहेर काही तुटलेले नाही, असा आत्मविश्वास येतो. त्यानंतर "जावईबापू पहिल्यांदा आलायत!! आमची
फूल नाही फुलाची पाकळी स्विकारा" असे आईने म्हटले तर त्याचाही चेहरा उजळतो.
तुम्ही एखाद्याची
तब्बेत बघायला जाता, तेव्हा सकारात्मक शब्द
खूप उपयोगी पडतात. "तुमचा चेहरा फ्रेश दिसतोय!! वजन पण वाढल्यासारखं वाटतंय"
असे म्हटल्याने आजारी माणसाला मानसिकदृष्ट्या खूप बरे वाटते. लगेच कोणी वजनकाटा
बघत नसतं, पण सकारात्मक जाणीव आजारी माणसाला दिलासा देते.
हे शब्द कधी घात
करतात, नाती तोडतात, एकमेकांमधे भिंती उभ्या
करतात. नवीन पिढी स्पष्टवक्ती आहे, पण अती स्पष्टवक्तेपणा
घातकच असतो. समोर ज्येष्ठ व्यक्ती असेल, तर ताडताड बोलण्याने
नातेसंबंध बिघडतात. मुलगा, सून वेगळे रहातात. भेटायला आले
तरी, एक अदृश्य भिंत त्यांच्या संभाषणात येते. काही नातेवाईक
नेहमी आपल्याला घालून पाडून बोलून आपल्या चुका दाखवत असतात. एकतर त्यांच्यापासून
लांब रहावे किंवा त्यांच्या बोलण्याकडे कानाडोळा करावा, म्हणजे
ही वन वे ट्रँफिक थांबते.शारिरीक जखमा ब-या होतात पण शब्दांनी झालेल्या जखमांचे सल
मनात खुपत रहातात.
प्रेमीजीवांना तर
प्रेम व्यक्त करायला शब्दांचीही गरज पडत नाही. डोळ्यांतील भाव, स्मितहास्य, हावभावांवरुन प्रेमाची
खूण पटली तरी प्रपोज करायला शब्दच लागतात. हे काम झाल्यावर दोघांमधे भावी
जीवनाच्या, प्रेमाच्या इतक्या गप्पा फुलतात की त्यांना
घड्याळ पुढे पळतंय ह्याचेही भान रहात नाही.
शाब्दिक आघात
मैत्रीत कधीकधी तात्पुरता दुरावा आणतात खेळातली भांडणे, समारंभाला बोलवायचे विसरणे ह्या गोष्टी एका सॉरी म्हणण्याने
जोडल्या जातात, पण प्रश्न असा असतो की सॉरी आधी कोणी
म्हणायचे? हा फार अहंगंडाचा प्रश्न असतो. एकाने माघार घेतली,
तर दुसराही वरमतो व नंतर दिलजमाई होते.
तर असे हे ‘शब्द’ रिझवणारे, खेळवणारे, प्रेम-माया देणारे,
आधार देणारे, तर कधी नातेसंबंधांवर आघात
करणारे. ते खूप जपून वापरावे लागतात. शब्द हे शस्त्र आहे. त्याने मने दुखावली
जातात. एखादा मस्करी म्हणून एखादे वाक्य बोलतो,पण दुसरा
त्याचा अर्थ निराळाच काढतो. तेव्हा पहिल्याला पश्चातापाची पाळी येते.
मनिषा आवेकर
शब्दांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
ReplyDeleteमस्त लेख👍👍