कविता...
कविता… काय असते कविता? कशी असते? कशात असते?
आकृतिबंधाच्या नेटकेपणात?
भाषाशैलीत? की भावानुभूतीच्या प्रत्ययात?
मला वाटतं, या सगळ्या गोष्टी एकमेकींमधे गुंतलेल्या असतात, पण कवितेचं सामर्थ्य
असतं तिच्या आशयाच्या प्रत्ययकारीत्वात!!
भाषा, प्रतिमासृष्टी आणि आशयघनता या सर्वच बाबतीत पारंपरिक कवितेहून खूप
वेगळं रूप दाखवणारी कविता आहे, ग्रेसांची...
पारंपरिक शैलीतल्या काव्यानुभवाला सामोरे जायची सवय असलेल्या
रसिकांना, ग्रेसांची कविता दुर्बोध वाटते.
ग्रेसांच्या कवितेवरच्या या आक्षेपाबद्दल जी.ए. कुलकर्णी यांनी
सुंदर विवेचन केलं आहे. ते म्हणतात,
"आपल्याला गणित कळत नाही", किंवा "शास्त्रीय
संगीतातलं ज्ञान नाही " हे सावधपणे कबूल करणारी बरीच माणसं असतात. पण आपण केवळ साक्षर आहोत
या एकाच भांडवलावर सामान्य माणूस, sophocles
पासून Beckett
पर्यंत सर्वांवर बोलू लागतो. वाचकालादेखील थोडी equipment लागते, ही कल्पनाच आपल्याला
उद्धटपणाची वाटते, आणि दोष आपल्यात असण्याची शक्यता आहे हे विसरून कलाकृतीला नावं
ठेवू लागतो! "
कुठल्याही कवितेचा आस्वाद घेताना, तिच्यातील
प्रतिमासृष्टी, कुठल्या प्रकारच्या भाषाशैलीतून आपल्याला कुठल्या आशयापर्यन्त नेऊ
पाहते, आहे याची जाण आणि भान आपल्याला असलं पाहिजे.
एखादा कवी ज्या
पद्धतीने भाषेचा वापर करतो, ते पाहता भाषेविषयी, भाव संक्रमित करण्याच्या तिच्या क्षमतेविषयी, तो पूर्णतया समाधानी
नसतो... वापरून बोथट झालेल्या शब्दांहून वेगळं, अधिक समर्थ असं काही
त्याला खुणावत राहातं. म्हणूनच पु.शि. रेग्यांसारखा एखादा भाषेशीच रोमान्स
करणारा कवी पुष्कळ देणाऱ्या स्त्रीसाठी 'पुष्कळा' हे नवंच संबोधन
निर्माण करतो.
स्तनांवर माझ्या,
जांभळाची झाक,
ओली आणभाक,
आठवते...
ग्रेसांच्या ह्या कवितेतील गर्भार स्त्रीबद्दलचे सूचक संदर्भ
आपल्याला माहीत नसतील तर तो दोष कवीचा नाही... आपला आहे...
संगीतकार म्हणून पु.शि. आणि ग्रेस या दोघांच्याही कविता स्वरबद्ध
करताना एक गोष्ट फार प्रकर्षाने जाणवली की यात भावनेचा, अनुभवाचा सतत
पुढेपुढे जाणारा प्रवाह आहे... त्यामुळे त्या कवितांचं गाणं होताना तेही परत मागे
वळून धृपदाकडे येत नाही... भावानुभव पुरा होईपर्यत पुढेच जातं.
ग्रेसांची संध्यामग्नता,
त्यांचा पाऊस, त्यांचा वारा... सगळंच विलक्षण... अति तरल... त्यांच्या कवितेतील
या साऱ्या प्रतिमांना अर्थाच्या चिमटीत पकडणं अशक्यप्राय वाटतं. कारण मृगजळाच्या
या डोहात हलणारी अनेक अद्भुत बिंब-प्रतिबिंबं आणि ग्रेसांच्या सभोवतीचा, वाऱ्याने हलत्या
रानाप्रमाणे असणारा आभासी परिसर... यातून आपण अर्थापर्यंत वाट काढणार तरी कशी!!!
त्यापर्यंत पोहोचण्याचा माझा हा प्रयत्न...
घनांनी वाकलेला मी, फुलांनी झाकलेला मी
जराशा मंद स्पर्शाने मनाला कंप का सुटतो
कधीचे रूप भिजलेले, तमातील गार वनराई
नदीच्या शुभ्र धारांनी नदीचा ऊर का फुटतो
मनातुन वाहणारी युगांची आंधळी गाणी
जरासे खोल बघताना गळ्यातून शब्द का फुटतो
एखादी कलाकृती जन्माला येण्यापूर्वी कलाकाराचं मन ज्या अवस्थेत
असतं त्याचंच प्रतिबिंब मला या कवितेत जाणवतं... भरून आलेल्या ढगांसारखं, आशयगर्भ अनुभूतीने
वाकलेलं... व्यक्त होण्याची वाट शोधणारं... आणि मग एका दैवी क्षणी कसल्याशा तरल, हलक्या स्पर्शाने
निर्मितीला शब्द सापडतो...
गाण्यासाठी लिंक : घनांनी वाकलेला मी
धन्यवाद...
प्रवरा संदीप
सुंदर लेख
ReplyDelete