उ:शाप



शांत नि:शब्द वाटा गहिऱ्या सागर लाटा
काळीज चिरून जाई असा गूढसा सन्नाटा

कोणते गुपित दडवी जाणे काळ आपल्या उरात
ही कोणती भविष्यवाणी वदे कोकिळा सुरात

नित्य पडती चांदणे सूर्य तळपे नभात
अवघी मानवजात फक्त बंदिस्त आपुल्या घरात

खळाळे अजुनही नदी पक्षांची सुरेल गाणी
पण मनमनात भरून आहे अस्वस्थ एक विराणी

नको स्पर्श मानवाचा सांगतो निसर्ग भासे
अंतरे ठेऊनी पडती आता उन्हाचेही कवडसे

शापित आम्ही जाहलो घडला अक्षम्य हा गुन्हा
रे निसर्गा अशी चूक होणे नाही पुन्हा

मान्य तुझा अधिकार मित्रा शिक्षाही निमुट भोगतो

दे जीवनाचे दान फक्त उ:शाप एवढा मागतो
दे जीवनाचे दान फक्त उ:शाप एवढा मागतो



प्रेरणा चौक 










2 comments: