शिराझ

 इराणमधले दुसरे महत्त्वाचे शहर म्हणजेशिराझ’. देशाच्या दक्षिण भागात वसलेले हे शहर. इराणची भौगोलिक रचना वा नकाशा आपण पाहिला, तर आग्नेय भागात ल्युटचे वाळवंट आपल्याला दिसते. दक्षिणेकडच्या इतर भागात झाग्रोस पर्वतराजी आहे. झाग्रोस पर्वताच्या पायथ्याशी शिराझ वसलेले आहे. नोरुज सणाच्या शेवटच्या ३/४ दिवसांत आम्ही शिराझला गेलो होतो. नोरुज हा सण जवळ-जवळ १३/१४ दिवस चाललेला असतो. मार्कोपोलो या प्रवासी कंपनीतर्फे आम्ही शिराझला गेलो. नोरुज सणाच्या या पंधरवड्यात कुठेही हॉटेल बुकिंग, विमान बुकिंग मिळणे जवळपास अशक्य होते. तेहरानहून शिराझला विमानातून जाताना खाली डोंगराळ, पर्वतमय भाग आणि वाळवंट असेच दिसत होते. शिराझला उतरल्यावर जाणवले, की आमच्या विमानातील जवळजवळ सर्व प्रवासी हे शिराझ टूरमधील आमचे सहप्रवासीच होते. त्यात फक्त आम्ही दोघे आणि एक अमेरिकन मुलगी हे परदेशातील होतो. बाकी सगळे इराणीच होते. 
तेहरानच्या मेहराबाद विमानतळावर एक इराणी तरुण मुलगा आमच्याशी बोलायला आला. तो ही मेकॅनिकल इंजिनियर होता आणि परदेशात जाऊन त्याने पदव्युत्तर शिक्षणही घेतले होते. त्याचे इंग्रजी चांगले असल्याने आम्हाला चांगली कंपनी मिळाली. त्याचे नाव आमिर हुसेन. त्याला भारताबद्दल खूप माहिती होती. इराणी लोकांना मीयोगाशिकवतो, असे ही त्याने सांगितले. तो शिवाचा भक्त होता. आपल्याकडील अनेक मंत्र त्याला माहिती होते.बॅड कर्मापुसून टाकायला कोणता मंत्र आहे हे त्याला जाणून घ्यायचे होते. असा कोणताही मंत्र नाही, हे आम्ही त्याला वारंवार सांगितले. पण त्याचा काही विश्वास बसला नाही. आम्हांला मात्र त्याची छान सोबत मिळाली. 

शिराझला उतरल्याबरोबर आम्ही सगळे एकत्र आलो. आमच्या ग्रुप लीडरने सांगितले की आपण ताबडतोब शिराझ पाहायलाच निघणार आहोत. 'शिराझ' ही इराणमधीलफार्सया प्रांताची राजधानी! खरेतर याचा उच्चारपार्सअसा आहे. अरबांनाउच्चारता येत नसे. त्यामुळेपार्सचे फार्सझाले आणि फार्सीचे पारसी झाले. जवळजवळ २००० वर्षांचा इतिहास असलेले हे प्राचीन शहर! अनेकांनी अनेक वेळा इथे राजधान्या वसवल्या. शिराझ ही झाँद राजवटीच्या काळात,म्हणजे साधारण चौदाव्या शतकात इराणची राजधानी होती.आर्ग-ए-करीम झाँदम्हणजेच करीम झाँदची हवेली पाहायला आम्ही प्रथम गेलो. हवेली छोटीशी आणि सुबक होती. फार्सी न जाणणारे आम्ही तिघेचौघेच होतो. त्यामुळे ताहोरे ही गाईड खास आमच्यासाठीच होती. दुसरा गाईड हा सगळ्यांसाठी फार्सी भाषेतून माहिती सांगत होता.

करीम झाँदची ही हवेली तिन्ही बाजूंनी बंद आहे. तिन्ही बाजूला ओवऱ्या व खोल्या आहेत. प्रत्येक खोलीत भिंतीवर चित्रे आहेत. खिडक्यांना सुंदर डिझाईनच्या रंगीत काचा लावलेल्या आहेत. हवेलीच्या मध्यभागी बाग आहे. बागा आणि कारंजी ही इराणच्या हवेल्यांची किंवा सुंदर इमारतींची एक खासियत आहे. संपूर्ण इराणचा ह्या बागा आणि कारंजी हा अविभाज्य भागच आहे जणू! याचे कारणही त्यांच्या इतिहासातच सापडते. झाँद राजवटीत या हवेलीतून इराणच्या राज्यकारभाराची सूत्रे हलत. करीम झाँद हे स्वतःला वकील म्हणवून घेत असत. लोकांचा सेवक वा प्रधान असल्याची त्यामागची भावना होती. झाँद राजवटीत अनेक सुंदर इमारती शिराझमध्ये बांधल्या गेल्या. पण एकूणच मुस्लीम साम्राज्यात जीत आणि जेते हे नाते फार हिंसक आहे. करीमखानने बांधलेल्या या त्याच्या सुंदर हवेलीतही, नंतरच्या क्वाजॉर राज्यकर्त्यांनी तुरुंग केला होता. त्यामुळे या हवेलीच्या सौंदर्याचे, इथल्या भिंतींवरील चित्रांचे अपरिमित नुकसान झाले. काही ठिकाणी भिंतीवरील चित्रांचा थोडासा भाग सुस्थितीत आहे. त्यावरून त्या काळच्या वैभवाची, सौंदर्याची कल्पना येते. मात्र या वारशाचे निगुतीने जतन केले नाही याचे वाईट वाटले.  


झाँद हवेलीला लागून असलेल्या दोन सुंदर इमारती म्हणजेमस्जिद-ए-वकीलआणिबाजार-ए-वकील’! शिराझमधला हा जुना भाग इतका देखणा आहे, आणि आखीव-रेखीव आहे, की आश्चर्य वाटते. या इमारती काही मोठ्या, भव्य नाहीत. पण त्यांचा रेखीवपणा, प्रमाणबद्धता ही, त्या काळातील इराणी वास्तुकला केवढी प्रगत होती, याचा पुरावाच आहे. आम्हीमस्जिद-ए-वकीलमध्ये जाऊ शकलो नाही, कारण तिथे दुरुस्तीचे काम चालू होते. पण बाज़ारात मात्र गेलो.      
या देशातल्या बाजारांचे एक खास वैशिष्ट्य आहे. मुख्य म्हणजे इराणमधले बाज़ार हे मोकळ्यावर नसून नीट बांधलेले असतात. बाज़ारात जायला प्रवेशद्वार आणि आत गेल्यावर उजवीकडे आणि डावीकडे नीट बांधून काढलेल्या उंच जोत्यावर दुकाने असतात. बाज़ाराचे छत उंच असते व भिंती जाड असतात. त्यामुळे उन्हाळ्यात हे बाज़ार थंड असतात व हिवाळ्यात इथे उबदार वाटते. त्याशिवाय हे बाज़ार आकाराने प्रचंड असतात. एक भूलभुलैय्या असतो. कापडापासून ते सोन्यापर्यंत, रोजचे मसाले, काचेच्या वस्तू, शोभेच्या वस्तूंपासून ते चपला, बूट, सूटकेसपर्यंत इथे सगळे काही मिळते. आम्ही बाज़ारात गेलो तेव्हा संध्याकाळ होत होती. नोरुजच्या सणामुळे व सुट्टीमुळे बाज़ारात तोबा गर्दी होती. आम्ही ताहोरेच्या पाठीमागून जात जात, ‘सराई-ए-मुशीरया बाज़ाराच्या आतल्या भागात गेलो. शिराझची खासियत असणाऱ्या काही वस्तू इथे विकत मिळतात त्या पाहिल्या व घेतल्या.


बाज़ारातून बाहेर आल्यावर, ताहोरे आम्हांला शेजारीच असलेल्याहमाम-ए-वकीलमध्ये घेऊन गेली. काही वर्षांपूर्वी इथे एक उपाहारगृह होते. पण त्यामुळे ही प्राचीन वास्तू खराब होते आहे, असे ध्यानात आल्यावर आता तिथे जुन्या पद्धतीचा हमाम परत उभा करण्यात आला आहे. जुन्या पद्धतीचे कपडे घातलेले माणसांचे पुतळे, त्या काळातील रीती-भाती, हमाम मधले वातावरण हुबेहूब उभे करण्यात आले आहे. या ठिकाणी श्रीमंत लोकांसाठी वेगळ्या खोल्या, वेगळी व्यवस्था असे. थोडक्यात आजचास्पाहा त्या काळीही होता, असे मनात येऊन गेले.
आमच्या गाईडने या ठिकाणी आम्हांलाफलूदेखायला दिले. हा पदार्थ आज जगभरात मिळतो, पण मूळचा तो शिराझचा आहे. आपल्याकडे मिळणाऱ्याफालुद्यापेक्षा हा पदार्थ वेगळा होता. मिट्ट गोड आणि थंडगार!!   
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हीहाफिज़या इराणच्या लाडक्या कवीची समाधी पाहायला गेलो. या कवीवर सर्व इराणी जनता मनापासून प्रेम करते. असं म्हणतात की, एक वेळ एखाद्या इराणी माणसाच्या घरात कुराण नसेल, पणहाफिज़चा दिवाण मात्र असेलच! अतिशय सुंदर बागेतहाफिज़ची कबर आहे. 

या ठिकाणी बरीच गर्दी होती. आमच्या ग्रुपमध्येहीहाफिज़चे चाहते होते. मुख्य म्हणजे चौदाव्या शतकातल्या या कवीच्या काव्याची जादू, आजच्या तरुण पिढीवरही कायम आहे. आम्ही तिथे गेलो असताना, एक प्रौढ बाईहाफिज़च्या समाधीशेजारी बसली होती. दोन्ही हातांनी तिने कबरीला जणू जवळ घेतले होते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिची ही उत्कट अवस्था पाहून, आम्हीही भारावून गेलो. 

आयुष्यातल्या अस्वथ करणाऱ्या क्षणी इराणी माणूसहाफिज़चे पुस्तक उघडतो, आणि त्याला त्याच्या शब्दातून उभारी मिळते, जगण्याचा संदेश मिळतो, किंवा मनात सतावत असलेल्या प्रश्नांची उत्तरेही मिळतात असा अनेक इराणी लोकांचा विश्वास आहे.हाफिज़ला कुराण तोंडपाठ होते, म्हणूनच त्याला कुराणातील त्रुटीही माहिती होत्या. मुल्ला, मौलवींवर, आंधळ्या अनुकरणावर त्याने आपल्या कवितेतून ताशेरे ओढले आहेत. आपले तुकोबाराय किंवा संत कबीर यांच्याशी नाते सांगणारा हा कवी! गूढवादाकडे झुकणारा आणि मानवतेवर प्रेम करणाराहाफिज़’! या कवीसमोर आम्हीही भक्तिभावाने नतमस्तक झालो.
हाफिज़चा समकालीन असलेल्यासादीया कवीची समाधीही शिराझमध्ये आहे. या दोन्ही समाधींना भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने इराणी लोक येत होते. असे म्हणतात की, ज्या समाजात लेखक, कवी, विचारवंत यांची कदर केली जाते, तोच समाज जिवंत असतो, बदलता असतो, काळाप्रमाणे चालणारा असतो. रूढीवादी राज्यकर्ते आणि सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न समाज असे एक विचित्र चित्र मला इराणमध्ये दिसत होते. 


शिराझमध्ये आम्ही इराम गार्डन पाहिले. थेट काश्मीरमधील निशात-शालिमार बागांची आठवण झाली. अर्थात काश्मीरमधील बागा खूप मोठ्या आणि अधिक सुंदर आहेत. या बागेत आणि नारिंजेस्तान या हवेलीत झाडांना संत्री लटकत होती. शिराझची संत्री प्रसिद्ध आहेत. या बागेतील मध्यावर असणारी सुबक इमारत, फुलांनी बहरलेली बाग, कारंजी, खळखळत्या पाण्याचे वाहणारे झरे सर्व मनाला भुरळ पाडणारे! इथे या बागांतूनही कुठेही कचरा दिसत नाही. अगदी फुलांचा कचरा, गळलेली पानेही दिसत नाहीत. तेहरान असो वा शिराझ, सगळ्या बागा अगदी स्वच्छ! अगदी गवतही नीट कापलेले होते सगळीकडे! लहान मुलांनाही पाने, फुले तोडताना मी पाहिले नाही. मुळात इराणसारख्या वाळवंट असलेल्या प्रदेशात मी इतक्या फुलांची कल्पनाही केली नव्हती. मला वाटते, या बागांची खास काळजी घेण्यासाठी इराणमध्ये सरकारात एक खास विभागच असावा. 

शिराझ हे शहरही सुंदर आहे. चौरस्ता मिळतो तिथे गोलाकार बाग! रस्ते दुतर्फा तीन-तीन लेनचे! आणि मधल्या भागातून खळाळत वाहणारे पाणी! याच शहरातील अजून एक महत्त्वाची वास्तू म्हणजेशाही चिराग’! हा एक दर्गाही आहे, आणि इथे मशीदही आहे. आठव्या इमाम रेझाचा भाऊ मीर अहमद, जो नवव्या शतकात मरण पावला, त्याची ही कबर! इराणमधील मुसलमान हे शिया पंथाचे आहेत. सुन्नी पंथाचे मुसलमान फक्त पैगंबराला मानतात, तर शिया पंथाचे मुसलमान महंमदाचे थेट वंशज असलेले बारा इमामही मानतात. त्यामुळे इराणमध्ये या दर्ग्यांनाही धार्मिक दृष्टया महत्त्वाचे स्थान आहे.
शाही चिरागमध्ये जाण्यासाठीचादोरओढूनच जावे लागते. हा दर्गा अत्यंत वैभवशाली आहे.आरसेमहालच म्हणा ना! बारीक बारीक आरश्याच्या तुकड्यांनी मढवलेले छत आणि भिंती! हजारो, लाखो आरसे झुंबराच्या प्रकाशात लखलखत होते. मशिदीचा अत्यंत मनोहारी घुमट आणि निळ्या, मोरपंखी रंगांतील मोझाईक टाईल्सच्या नक्षीने नटलेले मिनार! मशिदीच्या आवारातील भिंतीवरही असेच मोझाईक टाईल्सचे नाजूक काम होते. अक्षरशः डोळ्यांचे पारणे फिटले. 
पण डोक्यावरचा हिजाब आणि अंगावरची चादोर हे सांभाळत ही देखणी मशीद नीटपणे पाहता आली नाही याची खंत वाटली.चादोरम्हणजे चादरीसारखे वा साडीसारखे मोठे तलम कापड! हे कापड फक्त अंगाभोवती वेढून घ्यायचे. पण आत जाताना शूज काढणे, ते घालणे यात चादोर, हिजाब, सांभाळणे मला नीट जमत नव्हते. सगळाच गोंधळ उडत होता. मात्र या गोंधळातही जे नजरेस पडले ते केवळ अप्रतिम होते. तिथले हिरव्या रंगाचे आरसे तेवढे फार भडक वाटले. सर्व भाविकांसोबत मीही भक्तिभावाने हात जोडले आणि इथल्या सौंदर्याला सलाम केला. जसजसे इराण आम्ही पाहत होतो तसे या देशाच्या, इथल्या संपन्न कलेच्या, आणि साध्या माणसांच्या प्रेमात पडत होतो. 


स्नेहा केतकर 

1 comment:

  1. खूप छान प्रवास वर्णन!

    ReplyDelete