शिवरायांचे दुर्गविज्ञान

 

"या भूमंडळाचे ठायी | धर्मरक्षी ऐसा नाही|

महाराष्ट्र धर्म राहिला काही | तुम्हा कारणे|

कित्येक दुष्ट संहारिले | कित्येकासी धाक सुटले|

कित्येकासी आश्रय जाहले | शिवकल्याण राजा||"

- समर्थ रामदास


'राष्ट्र' म्हणवून घेणाऱ्या या 'महाराष्ट्र' राज्याचा इतिहास तसा फार जुना आहे. १२ व्या शतकापासून ते १६ व्या शतकापर्यंत जुलमी राजवटींना टक्कर देणारे राज्य, अशी आपल्या महाराष्ट्राची ख्याती आहे.

खिलजी सुलतान(१३१३-१३२०), तुघलक(१३२०-१३४७), बहामनी(१३४७-१५२६), बिदरची बेरीदशाही(१४९२-१५९२), अहमदनगरचे निजामशाही (१५०८-१६३३), विजापूरची आदिलशाही(१४८९-१६५५), मोगल सुलतान(१५९९-१६५८) - महाराष्ट्राला भरडून काढणारी पाहा ही कालयवनांची केवढी मोठी रांग.

 

महाभारतात अधर्मावर मात करण्यासाठी श्रीकृष्णाचा जन्म झाला, तसेच शेकडो वर्षांच्या जुलमी राजवटींनी जखडलेल्या महाराष्ट्राला स्वातंत्र्याचे किरण दाखवण्यासाठी शिवरायांचा जन्म झाला. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीचे साखळदंड तोडत महाराष्ट्राला स्वतंत्र करणाऱ्या शिवरायांचे कर्तुत्व जोखणे म्हणजे अवकाशातील भास्कराचा सौरताप जोखण्यासारखे आहे. वयाच्या १५ व्या वर्षांपासून अथक परिश्रमाने त्यांनी निर्माण केलेले स्वराज्य हा सर्वांच्या अभिमानाचा विषय आहे.

 

या स्वराज्य निर्मितीत मावळयांसोबत शिवरायांना समर्थ साथ दिली ती सह्याद्रीने. सह्याद्रीतील किल्ले हे स्वराज्याचे जणू प्राणच. महाराष्ट्र भूमी ही जशी साधू-संतांची भूमी तशी ती गडकोटांचीही आहे. 'हे राज्य व्हावे, ही श्रींची इच्छा' असे सार्थ अभिमानाने सांगणाऱ्या छत्रपती शिवरायांची भूमी. गडकोट, दुर्ग ही आहेत संघर्षाची प्रतीके! शस्त्रसज्ज दुर्गेचे तेथे अधिष्ठान असते. ह्या दुर्गम,बेलाग नि बळकट जागा म्हणजे जणू स्वातंत्र्यलक्ष्मीचे यज्ञकुंड! तोफांचे धडधडाट आणि तलवारींचे खणखणाट यांचेच सूर येथे कानी पडतात. या गडांचा इतिहास म्हणजेच महाराष्ट्राचा इतिहास होय.

 

महाराष्ट्राची दुर्गबांधणी परंपरा किमान दोन हजार वर्षांची आहे. महाराष्ट्रात आहेत तसे तितके अन तितक्या प्रकारचे किल्ले जगात अन्यत्र कुठेही नाहीत. सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, यादव, कदंब, बहामनी, मोगल, दक्षिणी पातशाह्या, मराठे, पेशवे, हबशी, पोर्तुगीज, डच, फ्रेंच अशा अनेक परकीय आणि स्वकीय सत्ता इथे नांदल्या. म्हणजेच सातवाहन काळापासून ते पेशवाई काळापर्यंत अशा तब्बल दोन हजार वर्षांच्या काळात विविधवंशीय, विविधदेशीय, विविधधर्मीय सत्तांनी महाराष्ट्रात शेकडो किल्ले बांधले. पण शिवनिर्मित दुर्ग सर्वार्थाने आगळे ठरले. राजगड, रायगड, कुलाबा, पदमदुर्ग, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यासारखे अनेक शिवनिर्मित दुर्ग आजच्या अभियंत्याला अचंबित करतात. खरं तर साऱ्याच शिवनिर्मित किल्ल्यांवर काही न काही अद्भुत वैज्ञानिक विचारांची दुर्गरचना केलेली आढळते. गडावरील पाण्याची व्यवस्था, संरक्षण व्यवस्था, वनस्पती व्यवस्थापन, स्वछता, गडांची बांधणी इत्यादी आजच्या तरुणांसाठी संशोधनाचा विषय आहे.

 

गडांचे प्रकार :

दुर्गरचना - किल्ल्याच्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे त्याचे खालील प्रकार प्रचलित आहेत.

१.गिरिदुर्ग म्हणजे डोंगरी किल्ला - राजगड, रायगड

२.वनदुर्ग म्हणजे दाट जंगलातील किल्ला - प्रतापगड

३.जलदुर्ग म्हणजे पाण्याने वेढलेल्या बेटावरील किल्ला - सिंधुदुर्ग, विजयदुर्ग

४.भुदुर्ग म्हणजे भुईकोट किल्ला - चाकणचा भुईकोट किल्ला

 

या सर्वांमध्ये डोंगरी किल्ला सर्वश्रेष्ठ मनाला जातो. कारण नैसर्गिकरित्या याला संरक्षण लाभलेले असते. जसा कुळंबी शेतास माळा घालतो, शेत राखतो, तसे किल्ले राज्याचे रक्षण करतात.



गडावरील विशेष जागा :

घेरा - किल्ल्याच्या डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या सर्व बाजूंचा समावेश करणारी हद्द म्हणजे किल्ल्याचा घेरा. ही गावे किल्ल्यांच्या अंमलाखाली असत.

चौकी - सर्वसाधारणपणे या गावाकडून किल्ल्याकडे येणाऱ्या व इतर वाटांवर पहाऱ्याच्या चौक्या असत. शत्रूची चाहूल सर्वप्रथम या चौक्यांवर लागत असे.

मेट - किल्ल्याच्या डोंगराच्या सर्वसाधारण अर्ध्या उंचीवर किंवा सोयीच्या जागी तटबंदीच्या बाहेर खालच्या बाजूला असणारी पहाऱ्याची जागा म्हणजे मेट.

महाद्वार - हे किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार. मजबूत बांधणी, दोन्ही बाजूस संरक्षणासाठी बुरुज असलेले द्वार, दरवाजा शक्यतो जाडजूड, मजबूत लाकडी फळ्या व लोखंडी पट्ट्यांनी केलेला असे. तेथे अणकुचीदार मोठे खिळे बसविलेले असत.

जंग्या - तटांमधे व चऱ्यामध्ये उभ्या चिंचोळे आकाराच्या खिडक्या ठेवल्या जात यांना जंग्या म्हणत.

खंदक - भुईकोट किल्ल्यांना, तटाबाहेरील जागा संरक्षणासाठी खोल व रुंद चर काढलेला असे याला खंदक म्हणतात. नळदुर्ग किल्ल्यावरील खंदक पाहण्याजोगा आहे.

बुरुज - तटाच्या भिंती बरोबरच बांधले जाणारे आणि तटापासून बाहेरच्या बाजूला पुढे आलेले अर्धगोलाकृती किंवा इतर आकाराचे भरीव बांधकाम म्हणजे बुरुज. तसेच अंबरखाना(धान्यकोठार), दारुखाना(दारू कोठार), हत्तीशाळा, भांडारगृह, खलबतखाना(गुप्त चर्चा करण्यासाठी) इत्यादी इमारती गडावर असत.

शिवरायांचे पाणीव्यवस्थापन - किल्ला बांधण्यापूर्वी त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे का याची आधी खात्री करून मगच किल्ला बांधला जाई. पाण्याची नैसर्गिक सोय नसेल तर पाण्यासाठी वेगळी व्यवस्था करावी लागे. पण पाण्याची सोय झाल्याशिवाय किल्ल्याचे इतर बांधकाम करीत नसत. पाणी साठवण्यासाठी उतारावर बांध घालणे, मोठे तलाव खोदणे, खडकात छोटी-मोठी पाण्याची टाकी खोदणे इत्यादी अनेक मार्गांनी पाणी साठवण केले जाई. रायगडावरील गंगासागर तलाव, हत्तीतलाव, बाराटाकी प्रसिद्ध आहेत. सिंधुदुर्गावरील दुधव, दहीबाव, साखरबाव या गोड्या पाणाच्या विहिरी आहेत. शिवदुर्ग निर्मितीतील जलव्यवस्थापन आजच्या पिढीलाही आश्चर्यात टाकते. आणीबाणीच्या काळातही आवश्यक तेवढा पाणीसाठा कसा राहील, याची योग्य ती काळजी शिवरायांनी घेतली आहे.



शिवरायांचे वनव्यवस्थापन - वनस्पती आणि माणूस यांचे एकमेकांशी असणारे नाते शिवरायांनी ओळखले होते. शिवरायांच्या संघर्षमय जीवनातदेखील पर्यावरणाचे संतुलन ठेवणारी वनश्री त्यांच्या नजरेआड झाली नाही. प्रत्येक गडावर व गडाच्या परिसरात शिवरायांनी आंबा, वड, नारळ, शिसव, बाभूळ यांची लागवड केली. आज्ञापत्रात शिवराय निसर्ग संवर्धनाबाबत किती जागरूक होते याचा प्रत्यय येतो. आजही गडांच्या रहाळ परिसरात अनेक औषधी वनस्पती आढळतात. खाजवेल वनस्पती आजही रायगडाच्या परिसरात दिसते. खाजवेलीचा एकदा का मानवी शरीराला स्पर्श झाली की भयंकर खाज सुटते. शत्रुसैन्य गडावर येताना या खाजवेलीला स्पर्श व्हायचा त्यामुळे निम्मे सैन्य तिथेच बेजार व्हायचे.

 

स्वच्छतेचे अनोखे व्यवस्थापन - छत्रपती शिवरायांनी १७ व्या शतकात आपल्या गडकोटांवर शौचकुपांची व्यवस्था केली होती. आजच्या काळातही आवर्जून पाहावी तशी मलमूत्र विसर्जनाची अनोखी व्यवस्था आपल्याला थक्क करून टाकते. रायगडावरील शिवनिवास, राणीवसा संकुलातील शौचकूप आजही चांगल्या स्थितीत पहावयास मिळतात. किल्ल्यांच्या तटावर दिवसा-रात्री-बेरात्री पहारे देणाऱ्या गस्तकारांनादेखील निसर्ग विधीसाठी तटातच शौचकूप निर्माण करणारा हा दूरदर्शी राजा होता. रायगडावरील शिवनिवास व परिसर हा संकुल मध्यवर्ती भागात आहे. तेथील मूलमूत्र विसर्जनासाठी केलेली व्यवस्था आवर्जून अभ्यासण्याजोगी आहे. यामधील विज्ञान, स्थापत्य प्रकाशात आणणे महत्वाचे आहे. हागणदारीमुक्त गावे निर्माण करण्याची योजना आपले सरकार २१ व्या शतकातही राबवत आहे पण तब्बल ३५० वर्षांपूर्वी याच भूमीत जन्मलेला शिवकल्याण राजा स्वनिर्मित किल्ल्यांवर उत्कृष्ठ अशी शौचकूपांची तजवीज करतो हे फार लक्षणीय आहे.

 

गोमुखी बांधणीची प्रवेशद्वारे - गडाच्या महाद्वाराशी येताना दर्शनी दरवाजा शिवनिर्मित दुर्गावर नाही. शिवनिर्मित दुर्गावर गोमुखी बांधणीची प्रवेशद्वारे दिसतात. या तटबंदीची रचना जपमाळ किंवा ज्या इंग्लिश D अक्षरासारखी पिशवी किंवा गोमुखी धरली जाते, तशा रचनेशी साधर्म्य दर्शविते. याचा गाईच्या मुखाशी काहीही संबंध नाही. या गोमुखी रचनेच्या प्रवेशद्वारासमोर दोन बुरुजांमधील अंतर खूप कमी, तुलनेने अधिक चढाच्या अरुंद पायऱ्या आणि ऐन दरवाजासमोर सरळ रेषेत कमीत कमी अंतर अशी वैशिष्ट्ये आढळतात. गडाचे अभेद्य दरवाजे खूप जाड लाकडी फळ्यांचे असत, ते फोडण्यासाठी हत्तीसारख्या बलदंड प्राण्याने तेथे जोरदार मुसंडी मारून धडक दिली तर काही धडकानंतर हा दरवाजा फुटतो. त्यातून शत्रुसैन्य आत घुसू शकते. ही शक्यताच नाहीशी करण्यासाठी अरुंद जागा, चढावरील अरुंद पायऱ्या आणि धडक देण्यासाठी आवश्यक असणारी दरवाजापुढे सरळ रेषेतील मोकळी जागा नसणे, ह्या गोष्टी तेथे अवलंबिल्या आहेत. अशा तऱ्हेच्या बांधकामामागे काही कार्यकारण भाव आहे. 'विशेष विचार करून वापरलेले ज्ञान' या अर्थांने हे विज्ञानच आहे.

 

कुलाबा किल्ल्याची आगळी-वेगळी बांधणी - कुल म्हणजे सर्व आणि आप म्हणजे पाणी म्हणूनच ज्याच्या सर्व बाजूंनी पाणी आहे तो किल्ला कुलाबा. इतर किल्ल्यांपेक्षा या किल्ल्याची बांधणी अगदी आगळीवेगळी! लहान टेबलाएवढ्या आकारापर्यंतचे घडीव चिरे वापरून तट-बुरुज बांधले आहेत, पण दोन दगडी चिऱ्यांदरम्यान सर्वत्र वापरतात तसा चुन्याचा थरच येथे नाही. त्याचे नेमके कारण काय असावे हे काही उलगडत नव्हते.

बारा महिने चोवीस तास या किल्ल्याच्या तट-बुरुजांवर लाटांच्या धडका सतत आपटतच असत. या लाटांचा तडाखा फार जबरदस्त असतो. सतत आपटणाऱ्या लाटांमुळे मानवनिर्मित बांधकामे हळूहळू खिळखिळी होतात आणि कालांतराने पडून जातात. लाटांची ताकद, त्या लाटांमध्ये असणाऱ्या पाण्यात असते. जितके पाणी जास्त तितका तिचा तडाखा उणावेल. पण समुद्रात बांधकाम करताना लाटेतील पाणी कमी कसं करणार ?

शिवकाळातील स्थापत्यकारांनी त्यासाठी एक युक्ती वापरून पाहायचं ठरवलं. जर बुरुजांच्या बांधकामात दगडी चिऱ्यांमधील भागात चुन्याचा वापरच केला नाही, तर तेथे पोकळी निर्माण होईल व लाटेचे पाणी त्या फटींमध्ये शिरेल आणि लाटांचा तडाखा कमी होईल. या युक्तीने किल्ल्यांच्या बांधकामाचे आयुष्य वाढू शकेल. ही कल्पना अतिशय नामी होती. अशा तऱ्हेने मजबूत बांधणी अन्यत्र कुठेही आढळत नाही. शिवदुर्ग निर्मितीमधील हा एक साधा पण वैज्ञानिक तत्त्वावर आधारलेला प्रयोग जाऊन पाहता येतो.

 

विज्ञान म्हणजे अभ्यास,निरीक्षण आणि प्रयोगातून मिळालेली इत्यंभूत माहिती. किल्ला म्हणजे तट-बुरुज नव्हे. त्याच्या गाभाऱ्यामध्ये खूप काही लपलेलं आहे. किल्ल्यांची सर्वसाधारण रचना, त्यावरील इमारती, किल्ल्याचे प्रशासन, संरक्षण व्यवस्था आणि काही विशेष गोष्टींची माहिती मिळवून किल्ले पाहणे विलक्षण आनंददायक आहे. गडांना भेट देणाऱ्या तरुण पिढीने हे 'दुर्गविज्ञान' समजून-उमजून गड पाहावेत असे मला मनापासून वाटते.

 

लेखन व माहिती संकलन

प्रतिक सुतार



 

संदर्भ

१. दुर्ग-सतीश अक्कलकोट

२.दुर्गरचना-प्रवीण भोसले

३.दुर्गजिज्ञास-प्र के घाणेकर

४.दुर्गविज्ञान व्याख्यान- प्र के घाणेकर


1 comment:

  1. अभ्यासपूर्ण वाचनीय लेख आहे. अभिनंदन!

    ReplyDelete