उमेश अनंत पिंगे |
‘शिवाजी महाराज’ हा आपल्या सगळ्यांच्याच अभिमानाचा विषय आहे. शिवचरित्र आपण
पाठ्यपुस्तकातूनही शिकतो. अशा आपल्या जिव्हाळ्याच्या विषया आजच्या युगात औचित्य
काय हे समजून घेणे महत्वाचे आहे.
१६३० ते १६८० अशी ५० वर्ष महाराजांची कारकीर्द
! यातील १६४५ ते १६८० अशी ३५ वर्ष महत्वाची, प्रामुख्याने
या काळात स्वराज्य संस्थापना झाली. आदिलशाही व मोगल या बलाढ्य शत्रूंशी झुंजून व
इंग्रजांसारख्या धूर्त व्यापाऱ्यांवर वर्चस्व मिळवून शिवरायांनी राज्य तयार केले.
अनेक माणसं मिळवली, घडवली व त्यांना स्वराज्याच्या कामास
जोडले. सामान्य माणसांतून नेते तयार केले. स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख
बहिर्जी नाईक हे असेच एक उदाहरण.
एका सोंगाड्याला हेरून स्वराज्याच्या कामात जोडले
व त्यातून गुप्तहेर खात्याचा प्रमुख तयार केला. बांदल देशमुखांकडे असलेले बाजीप्रभू
हे स्वराज्यात आले व नंतर त्यांनी पावनखिंड लढवली. सैनिक असलेले कुडतोजी गुजर हे
सरनौबत होतात. नंतर याच प्रतापराव गुजरांनी गनिमीकाव्याचा प्रभावी वापर करुन अनेक
लढाया जिंकल्या. अशी अनेक उदाहरणे देता येतील. सामान्य माणसांना स्वराज्याच्या
कामात जोडावे, त्यांना प्रशिक्षित करावे व त्यातून स्वराज्य
समृध्द करावे, विस्तारावे असे महाराजांचे याबाबतीत धोरण
दिसते. याचाच परिणाम म्हणजे शिवरायांचे सैनिकी संघटन व प्रशासन व्यवस्था उभी
राहिली.
छत्रपती शिवाजी महाराज |
स्वराज्य हे अजून एका बाबतीत इतर
राज्यांपेक्षा वेगळे होते. आज्ञापत्रात रामचंद्रपंत आमात्य सांगतात त्याप्रमाणे “रयतेच्या भाजीच्या देठासही हात लावू नये.” अशी शिवरायांनी सैन्याला दिलेली आज्ञा होती. जनतेच्या कल्याणाचा विचार,
सामान्य माणसाच्या हिताच्या विचार हा स्वराज्याचा पाया आहे अशी
शिवरायांची धारणा दिसून येते. मिर्झा राजा जयसिंग स्वराज्याची नासधूस करत असताना
माघार घेण्याचा निर्णय याच धारणेपोटी होता.
राज्याभिषेकाचा खर्च वतनदारांवर कर
बसवून करणे, कौल देऊन गाव वसवणे, शेतीसाठी
कर्जाची सोय करणे, सक्तीमुळे परधर्मात गेलेल्यांना स्वधर्मात
परत घेणे, आरमार - गडकोट उभे करणे असा चौरस उद्योग हा लोककल्याणाच्या
आग्रहापोटी होता. सामान्य माणूस हा या सर्व खटाटोपाचा केंद्रबिंदू होता. यामुळेच
या राज्याचं रक्षण करण्याकरिता जनता लढली. शिवरायानी याचा हिशोब आधीच मांडून ठेवला
होता. महाराजांनी म्हटले होते – “खासा औरंगजेब आज ना उद्या
दख्खनेत उतरेल. मी माझा एक एक किल्ला एक एक वर्ष लढवीन, औरंगजेबाला
दख्खन जिंकण्यास साडेतीनशे वर्ष लागतील.” महाराजांना
सुरुवातीपासून कल्पना असावी, खरा संघर्ष आलमगीराविरुध्द आहे.
महाराजांच्या मृत्यूनंतर जवळजवळ पाच लाख सैन्य घेउन औरंगजेब खरोखर दक्षिणेत उतरला.
हा संघर्ष फक्त दोन सत्तामधील संघर्ष म्हणून मर्यादित राहत नाही. याला दोन
व्यवस्थांमधील संघर्षाची किनार आहे.
एकीकडे संपूर्ण हुकूमशाही आहे, तर दुसरीकडे लोककल्याणकारी राज्याचा विचार व कार्यवाहीसाठी
अष्टप्रधानमंडळ. आलमगीराची व्यवस्था ही भ्रष्टाचारानी व लाचारीने पोखरलेली तर
शिवरायांचे राज्य वाचवण्यासाठी सामान्य माणूस आपला जीव पणाला लावत होता. खरं
सांगायचं तर आलमगीराला शिवरायांच्या स्वराज्याचं आकलनच झालं नाही. औरंगजेब
महाराष्ट्रात आला एकामागून एक लढाया तो खेळला. सर्व लढाया भरपूर नुकसान होउनही तोच
जिंकला. त्याने महाराष्ट्रातले महाराजांचे किल्ले जिंकले. सर्व भूमीवर ताबा मिळवला,
पण तरीही वयाची नव्वदी ओलांडल्यावर निराशेमध्ये त्याला मृत्यू आला.
कारण जे राज्य जिंकण्यासाठी त्याने एवढा खटाटोप केला ते राज्य म्हणजे किल्ले,
जमीन, संप्पत्ती नव्हतेच. पण यापलिकडचा विचार
तो करू शकला नाही.
शिवाजी महाराजांचे किल्ले |
शिवरायांनी तयार केलेले स्वराज्य म्हणजे माणसं ! न थकता लढणारी,
न विकली जाणारी, प्रसंगी प्राण द्यायला व
घ्यायलाही तयार असणारी माणसं! औरंगजेब ही माणसं जिंकू शकला नाही. औरंगजेब १६८१
साली दक्षिणेत आला व १७०७ साली त्याचा महाराष्ट्रात मृत्यू झाला. पहिली नऊ वर्ष
संभाजीमहाराजांनी लढा दिला. पुढची दहा वर्ष राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली
सैन्य लढले. तर १७०० ते १७०७ अशी शेवटची आठ वर्ष जनता लढली. राज्याला नेतृत्व नाही,
नियमित वेतन मिळण्याची खात्री नाही, असं
असताना मोगलांना विरोध करत प्रत्येक जण आपापल्या ताकदीनिशी गनिमीकाव्याचा वापर करत
लढत होतं. शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले राज्य सामान्य माणसाचे होते, याचा हा सर्वात मोठा पुरावा. महाराजांच्या पश्चात त्यांनी तयार केलेल्या
प्रेरणेमुळे मोगलांचा पराभव तर केलाच; परंतु त्यानंतर
मराठ्यांचे साम्राज्य उभे राहिले.
शिवरायांनी केलेलं हे काम, याला नक्की काय म्हणणार ? ... विचार,
प्रेरणा, प्रतिमान...? समर्थ रामदासांनी याला ‘साक्षेप’ असं म्हटलं आहे. समर्थ म्हणतात –
‘शिवरायांचे आठवावे रुप
/ शिवरायांचा आठवावा प्रताप /
शिवरायांचा आठवावा साक्षेप / भुमंडळी
//’
शिवरायांच्या
व्यक्तिमत्वाचा नेमका विचार, सार किंवा सारांश आपण घ्यावा व
त्याप्रमाणे आचरण करावे, अस समर्थांना सांगायचं आहे. असे
आचरण महाराजांच्या मृत्यूनंतर जनतेने केले, महाराष्ट्राने
केले व औरंगजेबाने लादलेले परचक्र निवारले. पण नंतर आम्ही हा आदर्श विसरलो.
त्यामुळे इंग्रजांचे गुलाम झालो.
महाराजांनी टोपीकरांबद्दल काय धोरण घ्यावे
याबाद्दलही सांगून ठेवले होते. याचा सविस्तर उल्लेख रामचंद्रपंत आमात्यांनी
आज्ञापत्रात केला आहे. इंग्रजांना जागा कोठे द्यावी, तटबंदी
बांधू द्यावी का? सुरक्षाव्यवस्था काय असावी? व्यापारापलिकडचा त्यांचा हस्तक्षेप कसा थांबवावा.... आम्ही हा संदेश
विसरलो पण साहेब (इंग्रज) विसरले नाहीत.... त्यांना माहित होते आमच्यावर
राज्य करायचे असेल तर आम्हाला शिवचरित्रापासून दूर नेले पाहिजे. यासाठी इंग्रजांनी
त्यांचे शासन स्थापन करताना आमचे किल्ले उध्वस्त केले.
भारतात विविध सत्तांचा इंग्रजांनी
पराभव केला. यापैकी कोणत्याही जुन्या शासकाच्या स्मृती त्यांना महाराष्ट्रातल्या
किल्यांएवढ्या धोकादायक वाटल्या नाहीत. राजधानी असलेला रायगड तर तोफा डागून
उदध्वस्त केला. भग्न झालेल्या किल्ल्यांकडे कोणीही फिरकू नये हाच या मागचा हेतू
होता.
पण हेच सूत्र लोकमान्यांसारख्या नेत्याने मात्र ओळखले. लोकांची स्वातंत्र्य
प्रेरणा जागृत करायची असेल तर त्याचा मंत्र शिवचरित्र आहे. मग शिवजयंतीला सुरुवात
झाली. लोकमान्यांनी लोकांना गडकोटांकडे वळवले. रायगडावर शिवजयंती साजरी होऊ लागली.
या गोष्टीचा महाराष्ट्रातल्या स्वातंत्र्य आंदोलकांवर प्रभाव पडला. वासुदेव बळवंत
फडके, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर
सावरकर, न्यायमुर्ती रानडे, महात्मा
जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या केवळ
महाराष्ट्रातल्याच नाही तर योगी अरविंद, रविंद्रनाथ टागोर,
भगिनी निवेदीता याशिवाय अन्य अनेक नेत्यांनी आपल्या कर्मप्रेरणेचा
धागा शिवचरित्राशी जोडला आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळातही
महाराष्ट्रातील शिवचरित्राच्या प्रेरणेचं आकलन झालं नाही तर समाजाचं आपलं आकलन
अर्धवट राहतं, असं अनेक नेत्यांच्या लेखनातून चरित्रातून
दिसुन येतं. आजच्या महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय
वर्तमानातही शिवचरित्र महत्वाचं ठरतं. शिवचरित्र हे आता आमच्या स्वभावाचा एक भाग
झालं आहे.
शिवजयंती |
कदाचित आज याचीच जाणिव काही समाज
विघातक लोकांना झाल्याने त्याचा उपयोग समाजात भेद तयार करण्यासाठी केला जात आहे.
विविध मुद्यांवर वाद, कलह निर्माण केले जात
आहेत. महाराजांच्या चरित्राला जातींची, धर्मांची कुंपणं
घातली जात आहेत.
तर दुसऱ्या बाजुला आज विविध उद्योग, संस्था या शिवरायांच्या कौशल्य व प्रेरणेचा अभ्यास करताना
दिसतात. महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्याचा, युध्दशास्त्राचा,
नेतृत्व कौशल्याचा अभ्यास आज जगभरातून केला जातो. तात्पर्य या सर्व
प्रकारच्या पार्श्वभूमीवर शिवचरित्र प्रेरणेचा अनुभव घेत, त्यांनी
मांडलेली मुल्य समजून घेत, आजच्या आपल्या प्रश्नांचा विचार
करणे हेच आमचे कर्तव्य ठरेल.
उत्तम माहिती पर, अभ्यासपूर्ण लेख.
ReplyDelete