'जरा थोड्या वेळाने हं. आज रविवार आहे.
वेळ थोडीशी पुढे मागे होणारच ना. घड्याळाच्या काट्यावर अगदी साडे आठला हजर!!!' माझी बडबड सुरु झाली.
माझा मुलगा 'आई कुणाशी बोलते आहे' म्हणून झोपल्या जागी अंदाज घ्यायला
लागला.
'आई कुणाशी बोलते आहेस?'
'अरे कुणाशी बोलणार? माझ्या नेहमीच्याच मैत्रिणी रे!!! अगदी
हक्क असल्यासारख्या बसून आहेत बघ. जरा हलणार नाहीत.'
माझा मात्र हा रोजचाच नेम आहे. पोळ्या
करायला सुरवात करण्यापूर्वी आदल्या दिवशीची पोळी कुस्करून बाहेर ठेवायची. ताजी
नाही हं! ती त्यांना नाही आवडत. कुस्करली जात नाही ना ती!!! बरोबर थोडासा भात ही
ठेवायचा. पण आज रविवार. त्यामुळे थोडी उशिरा उठले आणि वेळेचं गणित चुकलं. पण ते
चिमण्यांना कसं कळणार? अर्थात
त्यांना कळो वा ना कळो, माझे
स्पष्टीकरण देणे चालूच असते.
संवाद काय फक्त शब्दांतूनच साधता येतो? माझे बोलणे नाही कळले तरी माझे अस्तित्व
त्यांना जाणवतच असणार ना? मध्यंतरी मी
आठ दिवस गावाला गेले होते. आल्यानंतर सकाळी खिडकी उघडली तर एवढ्या जोराने चिवचिवाट
करत होत्या की जणू काही एवढे दिवस कुठे गेली होतीस हेच विचारत होत्या.
इथे येण्यापूर्वी २५ वर्षे मी ब्राह्मण
सोसायटीत रहात होते. माझ्या घराच्या आजूबाजूला आंब्याची, जांभळाची झाडं होती. सतत चिमण्यांचा
किलबिलाट असे. ठराविक झाडांवर दोन पोपट ही दिसायचे. दोन निळे पक्षी जोडीने यायचे.
ह्या झाडावरून त्या झाडावर असे पिकनिकला आल्यासारखे हुंदडायचे. मग तीन-चार तासांनी
विरुद्ध दिशेने उडून जायचे. त्यांच्या संचार स्वातंत्र्याचा, मनस्वी स्वभावाचा मला तर हेवाच वाटायचा.
गॅलरीत मैना-साळुंक्यांची सतत ये-जा चालू असायची. कबुतरे खाली सज्जावर वस्तीला असायची. ग्रीलवरून खारुताई झपाट्याने वर-खाली करायच्या. खिडक्यांच्या दारावरची जागा मात्र कावळ्यांसाठी आरक्षित!!! तिथे कुणीही आलेले त्यांना खपायचे नाही.
ह्या नविन जागी राहायला आल्यावर मनात
थोडी भीतीच होती. नव्या जागी मिळतील ना मला नवे सोबती? पण त्या बाबतीत मी भाग्यवान निघाले.
चिमण्यांची सोबत मला इथेही लाभली. ह्या घराला गॅलरी नाही. म्हणून ह्या सगळ्यांचा
वावर स्वयंपाकघराच्या खिडकीच्या बाहेर. समोरच गुलमोहराचे आणि सोनमोहोराचे झाड.
उन्हाळ्यातही डोळ्याला थंडावा देणारी आणि मनाला मोहवणारी ही झाडे!!!!!
ह्या कबुतरांतही एक पांढरं कबुतर आहे.
त्याचा सर्वांवर वचक आहे. ते आलं की बाकीची सगळी कबुतरं आपणहून बाजूला व्हायची.
मला बघून वाईट वाटलं. म्हणजे इथे ही वर्णभेद? पाखरांतही? मन विषण्ण झालं. माणसांतील वाईट गोष्टी
कशाला उचलाव्यात पक्ष्यांनी?
पण हा लेख लिहिल्यावर काही दिवसांनी मला वेगळंच चित्र पाहायला मिळालं. मी नेहमीप्रमाणे पोळीचा कुस्करा खिडकीबाहेर ठेवला. चिवचिवत चिमण्या आल्या. चिमण्यांचे खाणे संपल्यावर थोड्या वेळाने एक काळं कबुतर आलं. नंतर नेहमीप्रमाणे ते पांढरं कबुतरही आलं. मला वाटले की आता भिऊन हे काळे कबुतर उडून जाणार. पण ते काही उडाले नाही. उलट शांतपणे पोळीचे तुकडे टिपत राहिले. पांढऱ्या कबुतरालाही थोडे आश्चर्यच वाटल्यासारखे वाटले. त्याने काळ्या कबुतराला उडवून लावण्याचे बरेच प्रयत्न केले. पण काळे कबुतर ढिम्म!! शेवटी पांढऱ्या कबुतराने नाद सोडला आणि ते ही त्याच्या सोबतीने खाऊ लागले....
सौ.मनीषा मुळ्ये
खूप छान लेख . झाडांना सुद्धा ही स्पर्शाची, संवादाची भाषा उमगते.
ReplyDeleteकबुतरांनी मात्र आता अगदी उच्छाद मांडला आहे. प्रत्येक जीवमात्रा मध्ये ही वर्चस्व सिद्ध करण्याची किंवा आपली हद्द राखण्याची वृत्ती असते.