मोहरलेलं आंब्याचं झाड. . हिरव्याकंच
कैऱ्यांनी भरुन गेलं. नजरेत बसेना इतकं चहुअंगाने डवरलं. आंबट
वास वाऱ्याच्या झुळकीसरशी श्वासांत मिसळू लागला. रोज खिडकीतून ते
लेकुरवाळं झाड न्याहळण्याचं तिला वेडच लागलं. कणाकणानं कैऱ्या भरु लागल्या, आकाराने वाढु लागल्या. यंदा आंबा विकत
आणायची गरजच नाही, सगळ्यांना
वाटून आपल्याला भरपुर पुरेल, तिच्या मनानं ग्वाही दिली. चकचकीत
हिरवं फळ हाताला येईल तसं काढुन तिनं डाळपन्ह, लोणचं, साखरंबा. अगदी मनसोक्त केला. आता
मात्र आढी लावायला फळ आलंय, तिच्या मनानं घेतलं. माणुस बोलवून
आंबा उतरवणं आढी
लावणं.....
तिचा सगळा दिवस त्यातच संपला.
आज खिडकीशी गेल्यावर मात्र ते कैरी उतरवलेलं झाड तिला एकदम ओकं
ओकं वाटलं. खरं तर हाताच्या अंतरावर आढीत त्या कैऱ्या बसलेल्या होत्याच
की!.....
पण झाडाकडं बघताना मात्र एक नि:श्वास उमटूनच गेला. पण वळताना खिडकीतूनच दोन पानांच्या मध्ये लपलेली उंचावरची एक कैरी तिला दिसली. ती खुदकन हसली.
आढीतला आंबा दिवसेंदिवस रंग बदलत
होता, ते बघताना न
चुकता तिची नजर, पानात
लपलेल्या त्या कैरीकडे हटकून जायची. अशीच पिकून वाया जाईल बहुतेक. ती मनातल्या मनात निसटून गेलेल्या
त्या कैरीचा विचार नकळत करत राहायचीच. आढीतली पाडाची कैरी ते आंबा हा प्रवास तिनं जितका उत्सुकतेने बघितला
नसेल, तितका त्या पानात लपलेल्या कैरीचा प्रवास
ती रोज उत्कंठेने बघत होती. अन् एक दिवस, ती एकुलती एक कैरी देठात पिवळी दिसू लागली. ती उसासली, कुणाच्या मुखी न लागता, पिकेल, कदाचित कुजेल आणि बिचारी गळुन जाईल. आढीतला
आंबा आता जोमाने
पिकत होता. घरदार आंब्याच्या चवीवासाने घमघमले. सारे घर मनसोक्त आंबा उत्सव साजरं करत होतं. ओला कचरा, साली कोयांनी भरुन वाहायचा. अर्थात तिने स्वच्छता कामगारांनाही आंब्याचा वाटा
दिला होताच.
आज अचानक दुपारच्या वेळी तिच्या
लक्षात आलं..... केशरी रंगाचा ओघळ पानाशी थबकलेला होता. कोणत्या तरी पक्षाने
चोच मारुन तो चाखला असणार. ती मनोमन खूश झाली. दोन चार दिवसांतच त्या कैरीची साल संपत आली. आणि
अचानक दुपारी आभाळ भरुन आलं. वाऱ्याने झाडपानांशी धसमुसळी सलगी सुरु केली.
दिठीत तग धरुन राहीलेली कैरीची बाटी, हळूच बुंध्याशी पडुन गेली. सोसाट्याचा
वारा....
माती मिश्रीत वावटळ... अन् मुसळधार पाउस........ आज झाड पूर्ण रिकामं झालं...... ती नि:श्वासली........आता नजरेला फळ नसलेल्या झाडाची सवय
होईपर्यंत मात्र थोडा वेळ जाणारच.
महिनाभराने बागेत फेरफटका मारताना
तिच्या लक्षात आलं, आंब्याच्या
झाडापाशी किरमिजी कोंब तरारलय.
झाडांशी निजलो आपण झाडातून पुन्हा उगवाया......
हा नवा जन्मोत्सव पाहुन ती नव्याने
हरखली. गोष्टी नित्यानं घडतच असतात...... फक्त मनानं टिपकागद होउन ते टिपायला मात्र हवे.....
सौ विदुला जोगळेकर
निव्वळ सुंदर!
ReplyDelete