पुढे वाजते नौबत, मागे येती पलटणी
आला पाऊस दारात, गेली इशारत रानी
भली कडाडली वीज, उठे रात लकाकून
आता सरली प्रतीक्षा, झाला वरूण प्रसन्न
कधी सोसाट्याचा वारा, कधी नुसत्याच धारा
येती सरीवर सरी, भिजे आसमंत सारा
रोपे शेतात डोलती, जरा सुखावे धरती
याचा पालटला नूर, घाले थैमान सभोती
सुटे झंझावाती वारा, येई पाऊस जोरात
नदी पाण्याने भरली, भरे धडकी उरात
सावे घेऊन धावते, किती झाडे धोंडे माती
कधी गिळून टाकते, सारी माणसांची वस्ती
कधी लाडिकशी सर जरा भिजू भिजू करी
भुरुभुरु पावसांत, अंग गारव्याने भरी
कसे लगबग जाती ढग डोंगरकवेत
जणू विरही साजणी शिरे साजणमिठीत
चहूबाजूंनी भरले नभ काळे करवंदी
तरी कोपऱ्यात एक निळा तुकडा स्वच्छंदी
निळे जांभळे डोंगर जाती क्षितीजाच्या पार
अंगाभोवती घेऊन शुभ्र धुक्याचा पदर
ओढे खळाळ धावती नदी दुथडी भरली
ताजे गावात खाऊन सारी खिल्लारे माजली
बळीराजा सुखावला उडे धांदल शेतात
सृजनाचा हा सोहळा चाले अवघ्या सृष्टीत
संजय बापट
पावसाची सगळी रुपं दाखवणारी छान कविता.
ReplyDeleteखूप छान
ReplyDelete