सुख-दु:खाचा ताळेबंद

आयुष्यातील घटनांकडे, नातेसंबंधांकडे पाहण्याचा माझा एक दृष्टीकोण आहे. तो गणिती प्रकारचा म्हणजे सोप्या भाषेत टक्केवारी प्रकारातला आणि गरजेनुसार ताळेबंद (Balance Sheet) प्रकारातला आहे. कदाचित माझ्या नोकरीतील चाळीसहून अधिक वर्षे आकडेमोडीत गेल्यामुळे असेल, पण मला स्वत:ला ते योग्य वाटते आणि प्रत्येकाने ते स्वीकारले तर समाधानाकडे वाटचाल होण्यास मदत होईल असेही वाटते. शेवटी आयुष्य म्हणजे तरी काय ? काही बेरजा, काही वजाबाक्या, काही गुणाकार अन् फार थोडे भागाकार! बघा,पटतंय का?

 

समजाव्यक्तिचे त्याच्या बायकोशी (किंवा बायकोचेशी) नेहमी भांडण होते.आमच्याकडे भांडणाशिवाय आठवडा जात नाहीअसे त्या जोडप्याकडून समजले तर त्याचा अर्थ आठवड्यातले ५-६ दिवस ठीक जातात असाही होतो हे समजून घ्यायला हवे (optimistic angle). मग टक्केवारी काढा. आधी महिन्याची, मग वर्षाची, मग तुमच्या आतापर्यंतच्या वैवाहिक आयुष्याची. ती साधारण पणे १४-१५ % किंवा त्याहूनही कमी येते. म्हणजे राहिलेले जवळ-जवळ ८५ % आयुष्य ठीक पार पडले ते का विचारात घ्यायचे नाही? तडजोड तर दोघांनाही कमी-अधिक प्रमाणात करावी लागते. ती कुठे नाही करावी लागत? भाजीवाला, दूधवाला, डॉक्टर, रहदारी, सिनेमागृह, हॉटेल, नोकरीचे ठिकाण कुठे-कुठे आपण नाही तडजोड (adjustment) करत? कोणी कितीही मोठी व्यक्ती असली तरीही हे करावेच लागते. नाही का? मग हेच टक्केवारीचे सूत्र आपण व्यवहारात, इतर नातेसंबंधात लावले तर आपल्या भावविश्वात नक्कीच फरक पडेल.

 

बरे, भांडण-वाद म्हणजे तरी नेमकं काय? मतभेद, गैरसमज आणि फार तर मानापमान.मतभेदही अगदी नैसर्गिक बाब आहे. दोन व्यक्तींची एखाद्या विषयावर भिन्न मते असणे साहजिकच आहे. पण हेच बऱ्याच वेळा लक्षात घेतले जात नाही. वादाला सुरुवात इथूनच होते. एकदा हे समजले की तो विषय सोडवायचा, वाढवायचा की सोडून द्यायचा हे आपण ठरवू शकतो. साधारणत: वाद वाढतोय हे जाणवल्यावर समंजसपणा दाखवून कोणीतरी तो विषय सोडून देतो, पण त्याने मुद्दा जागेवरच रहातो. परिणामी तेढ निर्माण होणे, पुढे जाऊन गैरसमज होणे, तो वाढत जाणे या पुढच्या पायऱ्या. 

गैरसमज’! काही माणसांचा स्वाभाव असा असतो, की ते समोरच्याची भूमिका समजून घेण्याची, फार काय त्याचे ऐकून घेण्याचीही तसदी घेत नाहीत. उतावीळपणाने किंवा बऱ्याचदा गैरसमज करून घेऊन, त्याहीपेक्षा पूर्वग्रहदूषित भूमिकेतून स्वत:ची बाजू मांडतात. दोन्ही व्यक्ती नेहमीच्या सहवासातील असतील तर समस्या फारच वाढते. गैरसमज करून घेणारी व्यक्ती हेकेखोर असेल तर आणखीनच भर पडते. यात देहबोली (body language) सुद्धा आपला प्रभाव दाखवते. मात्र इथेसुद्धा टक्केवारी अवलंबिली तर मूळ समस्या सुटणार नाही पण वादाची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. अर्थातत्यावेळी असा विचार मनात येऊनगणितकरणे हा ज्याच्या त्याच्या इच्छाशक्तीचा आणि क्षमतेचा भाग आहे.

 

तिसरे कारणमानापमान’! हे फार गंभीर प्रकरण आहे. वरील दोन प्रकारात अहंभाव (ego) प्रासंगिक दुखावला जातो. कोणीतरी एक जण माघार घेऊ शकतो, पण इथे अंहं! कारण गणित मांडण्याचा विवेकच नाहीसा झालेला असतो. अशावेळी जे काही शारिरीक, मानसिक, आर्थिक नुकसान झालेले असेल ते सहन करून झाल्यानंतर कालांतराने, शांतपणे झाल्या प्रकाराचे अवलोकन करून तटस्थपणे ताळेबंद मांडावा. यामुळे भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टळू शकते.

 शेवटी प्रत्येकाला आनंदी, समाधानी, शांतपणे आयुष्याचा आस्वाद घ्यायचा आहे. मग जरासे वेगळ्या पद्धतीने या अप्रिय विषयाकडे, एक प्रयोग म्हणून पहायला काय हरकत आहे? मुळातच १००%बरोबर आणिचूक असे सहसा नसते.कमियाँ सब में होती है लेकिन नज़र सिर्फ़ दूसरों की आती है।अशांसारखे सुविचार आपण फक्त वाचतो आणि चांगला वाटला म्हणून फॉरवर्ड करतो, पण आपल्यात उतरवत नाही हाच तर मुद्दा आहे. 

माझे श्वशुर एक अतिशय सज्जन, शांत, पापभीरू गृहस्थ होते. माझ्याशी बऱ्याचवेळा प्रसंगपरत्वे बोलताना ते म्हणायचे की, “आपलंही काहीतरी चुकत असेल. नेमकं काय ते कदाचित शोधण्याचा प्रयत्न केला गेला नसेल किंवा शोध लागलाही नसेल. तरीपण कमीत कमी एवढा विचार मनात येणं हे काय कमी आहे?” त्यांच्या या विचारसरणीचा माझ्यावर खूप प्रभाव आहे आणि त्यामुळे कदाचित पुढे जाऊन हा रूक्ष विषय गणिती भाषेत मांडायला मी प्रवृत्त झालो असेन. अर्थात याचा मला काही प्रमाणात नक्कीच उपयोग होतो तसाच तो इतरांना ही व्हावा ही प्रामाणिक इच्छा! 


तसं अलिकडच्या पिढीकडे थोडंसं त्रयस्थाच्या भूमिकेतून पाहिले तर ती नक्कीच प्रॅक्टीकल आहे. फार विचार करून भावनिक त्रास करून घेणं किंवा त्रास देणं यापेक्षा
एक घाव दोन तुकडेकरण्याकडे कल वाढलेला दिसतो. याला कारण जीवनावश्यक सुविधा, साधने, पर्याय मुबलक आहेत.कर लो दुनिया मुट्ठीमेंम्हणत जणू दिग्विजयासाठी निघालेल्या तरूण पिढीमध्ये फार कमी परावलंबित्व पण त्यासोबत अस्थिरताही आहे. सर्वच क्षेत्रात कमी कालावधीत अनपेक्षित बदल तेही झपाट्याने होत आहेत. जिथे रोजच्या आयुष्याचीच अनिश्चितता वाटते तिथे नकोशा गोष्टिंचा ताळेबंद मांडण्यापेक्षा त्यांना वजा करणे जास्त सोपे वाटते. 

 

पण तरीही मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे या मुलभूत तत्वावर आणिमन:षष्ठानि इंद्रियानिया भगवद्गीतेतील वचनाप्रमाणे, जे फक्त माणसालाच आहे त्यामनाचा विचार करतासुख दु:खाचा ताळेबंदमांडण्याचा प्रयत्न अधूनमधून करायला काय हरकत आहे?

सर्वेपि सुखिन: सन्तु ।



 

उदय ठेकेदार



 

 

4 comments:

  1. खूप चांगला विचार करायला लावणारा लेख आहे.

    ReplyDelete
  2. खूप चांगला वैचारिक लेख आहे.

    ReplyDelete
  3. उदय, प्रश्र्न आठवड्यात एक भांडण एवढाच असता तर तुमचं गणित बरोबर. भांडण हे बहुधा हिमनगाच्या पाण्यावर दिसणाऱ्या भागासारखं असतं. पाच मिनिटे चाललेले भांडण पाच दिवस धुमसत राहू शकते.

    पण एकंदरीत लेख आवडला!

    ReplyDelete
  4. खूप छान विचार मांडले आहेत आणि असे विचार मांडण्याकरिता स्वतः कडे एक निरोगी मन लागते ते आपल्याकडे आहे हेच दिसून येते 👌👌

    ReplyDelete