सुखाचा मूलमंत्र !!


 (OUTLIERS या Malcom Gladwell यांनी लिहिलेल्या अतिशय गाजलेल्या, जगविख्यात पुस्तकातील प्रस्तावनेचा स्वैर अनुवाद)

अठराव्या शतकातील ही गोष्ट! रोसेटो - इटलीमधील एक निसर्गसुंदर गाव! युरोपमधील प्राचीन शहराप्रमाणेच हे गावही एका मोठ्या चौकाच्या आसपास बसले होते! चौकाच्या एका बाजूला एक जुना राजवाडा आणि दुसऱ्या बाजूला चर्च होते. एक छोटा रस्ता बाजूच्या टेकडीवर जात होता आणि याच रस्त्याच्या दुतर्फा दोन मजली टुमदार दगडी लाल रंगाचे छप्पर असलेली घरे होती!

अनेक शतकापासून रोसेटो मध्ये राहणारी पेसोनी जमातीचे लोक आजूबाजूच्या पहाडात मार्बल खाणीमध्ये काम करीत किंवा आजूबाजूला शेतीची कामे करीत! त्यासाठी त्यांना रोज सकाळी चार-पाच मैल चालावे लागे आणि येतानाही तेवढीच पायपीट होई. आयुष्य खडतर होते. गावातील बहुतेक लोक अल्पशिक्षित आणि गरीब होते. त्यांचे आयुष्य हलाखीचे होते आणि ते तसेच राहिले असते पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. या गावातील लोकांचा भाग्योदय कुठल्यातरी अकल्पनीय घटनेमुळे व्हायचा होता, असे नियतीनेच ठरविले होते! 

१८८२ च्या जानेवारी महिन्यात रोसेटोमधील अकरा लोकांच्या एका गटाने, यात एक लहान मुलगाही होता, अमेरिकेची वाट धरली! त्यावेळी अमेरिका हा देश म्हणजे सुबत्ता आणि संपत्तीची खाण होता असे चित्र सगळ्या जगासमोर पसरले होते आणि त्यामुळेच उज्वल भविष्याची अपेक्षा करणारे अनेक तरुण अमेरिकेची वाट धरत!

त्याचप्रमाणे रोसेटो मधील हे अल्पशिक्षित तरुण न्यूयॉर्क मध्ये येऊन धडकले. पण आयुष्य एवढे सोपे नव्हते! अमेरिकेतील पहिली रात्र तर त्यांनी एका धर्मशाळेत जमिनीवर झोपून  काढली. मग त्यांनी कामाचा शोध सुरू केला. त्यासाठी त्यांनी पश्चिमेकडे वाटचाल सुरू केली. शेवटी पेनसिल्व्हेनिया मधील बंगोर या गावी ते येऊन पोचले. तेथील एका खाणीमध्ये त्यांना काम मिळाले. एकदा ही मंडळी तिथे थोडी स्थायिक होताच त्यांनी इटलीमधील आपल्या गावकऱ्यांना पण तिथे बोलावायला सुरुवात केली. पुढच्याच वर्षी रोसेटो मधून पंधरा जणांचा एक जत्था अमेरिकेत येऊन पोहोचला आणि मग अमेरिकेतील सुबत्तेची बातमी गावातील लोकांपर्यंत पोहोचली. काही दिवसातच रोसेटोमधील बहुतांश कुटुंबांनी अमेरिकेत स्थलांतर केले. गाव अक्षरशः ओस पडले! 

ही मंडळी कष्टकरी आणि मेहनती होतीच, त्यामुळे त्यांनी हळूहळू अमेरिकेतही जम बसवायला सुरुवात केली! त्यांनी बंगोरच्या आजूबाजूची खडकाळ जमीन विकत घ्यायला सुरुवात केली. तिथेही त्यांनी रोसेटो सारखीच दोन मजली दगडी घरे बांधायला सुरुवात केली. त्यांनी तेथे एक चर्चही बांधले आणि गावातल्या मुख्य रस्त्याला गॅरिबाल्डी या महान इटालियन क्रांतिकारकाचे नाव दिले. त्यांनी त्या गावालाही रोसेटो हेच नाव दिले कारण त्या गावातील बहुतांशी लोक इटलीमधील त्याच गावातून आले होते.

१८९६ साली त्या गावातील चर्चची सूत्रे फादर पास्कल यांनी स्वीकारली. त्यांनी गावातील लोकांना संघटित करून अनेक कार्यक्रम आयोजित करायला सुरुवात केली. त्यांनी गावकऱ्यांना घरामागची जमीन स्वच्छ करून तिथे कांदे, बटाटे, बिट्स आणि फळभाज्या लावायला प्रोत्साहित केले. त्यामुळे गावामध्ये नवीन चैतन्य निर्माण झाले. लोकांनी परंपरागत डुकरे पाळण्याचा व्यवसाय सुरू केला. तसेच मद्य बनवण्यासाठी द्राक्षाची लागवड सुरू केली. हळूहळू शाळा, उद्याने, वाचनालय, सभागृह इत्यादी सार्वजनिक वास्तु उभ्या झाल्या. छोटी छोटी दुकाने, उपाहारगृहे, बेकरी यांनी मुख्य रस्ता गजबजून गेला. हळू हळू काही वस्त्र उद्योग पण सुरू झाले. गावातील लोक फक्त इटालियन भाषाच बोलायचे. त्यांनी आपली इटलीच्या दक्षिण भागातील संस्कृती पूर्णपणे जपली होती!

तर असे हे लहानसे गाव खरंतर जगाला कधीही माहिती झाले नसते, पण स्टेवर्ट वोल्फ नावाच्या एका डॉक्टर मुळे हे गाव संपूर्ण जगाला माहित झाले. डॉक्टर वोल्फ हा पोटाच्या विकारावर उपचार करी आणि तो ओक्लाहोमा विद्यापीठात शिकवायचा. तो उन्हाळ्यात रोसेटो जवळील त्याच्या गावातील शेतावर राहायचा. एकदा तो रोसेटो मधील एका कार्यक्रमात भाग घ्यायला आला होता. त्याचे भाषण झाल्यावर तेथील एका स्थानिक डॉक्टरने त्याला घरी बोलावले. मद्याचा आस्वाद घेता घेता त्यांच्या गप्पा रंगल्या! बोलताबोलता तो स्थानिक डॉक्टर असे एक वाक्य बोलला की ते ऐकून डॉ. वोल्फ थक्कच झाला. तो स्थानिक डॉक्टर म्हणाला की तो सतरा वर्षापासून या गावात प्रॅक्टिस करतो आहे. त्याच्याकडे आजूबाजूच्या गावातूनही अनेक रुग्ण येतात. पण रोसेटो मधून अजूनपर्यंत तरी त्याने ६५ वर्षाच्या खालील एकही हृदय रोगी पाहिलेला नाही.

ते वर्ष १९५० होते. त्यावेळी अमेरिकेत हृदयविकाराने मरणाऱ्यांची संख्या खूप जास्त होती! हृदयविकाराने मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांमध्ये पासष्ट वर्षाखालील अनेक रुग्ण होते! हे ऐकून डॉक्टर वोल्फला आश्चर्यच वाटले. संपूर्ण अमेरिका हृदयरोगाने ग्रस्त असताना हे लहानसे गाव त्यापासून मुक्त कसे काय राहू शकते? काय रहस्य असावे या गावाच्या तंदुरुस्तीचे ? त्याने या प्रकरणाचा छडा लावायचा निश्चय केला. त्याने मग या कामासाठी ओक्लाहोमा मधील त्याचे काही सहकारी आणि विद्यार्थ्यांचा चमू तयार केला. या टीमने मग काही दिवस रोसेटोमध्येच मुक्काम ठोकला. त्यांनी अनेक वर्षापासून मृत पावलेल्या व्यक्तींची  मृत्यु प्रमाणपत्रे तपासलीतिथल्या लोकल डॉक्टरांची कागदपत्रे तपासली. येथील रहिवाशांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा अभ्यास केला. तिथल्या  महापौरांनी पण त्यांना सर्वतोपरी मदत केली. त्यांना बसायला त्याने नगरपालिकेत जागा देऊ केली. एवढेच नव्हे तर महापौरांच्या चार बहिणींनी पण या कामात सहभाग घेतला. ही डॉक्टरांची टीम तिथे जवळ जवळ एक महिना तळ ठोकून होती. त्यांनी गावातील बहुतेक सर्व लोकांची रक्त तपासणी केली तसेच हृदयाच्या इतर चाचण्या पण केल्या. आणि या अथक परिश्रमानंतर त्यांनी काढलेले निष्कर्ष केवळ अभूतपूर्व होते! रोसेटो मधील पासष्ट वर्षावरील सर्व नागरिक अधिक ठणठणीत होते! आणि पासष्ट वर्षाखालील व्यक्तींमध्येही हृदयरोगाचे प्रमाण अमेरिकेच्या तुलनेत खूपच कमी होते. काय कारण असावे याचे? सगळी अमेरिकन जनता हृदय रोगाने ग्रस्त असताना हेच गाव कसे त्यापासून मुक्त राहू शकते? मग त्यांनी या प्रकरणाचा छडा लावण्याचे ठरविले! 

डॉक्टर वोल्फने काही सामाजिक कार्यकर्ते जमविले आणि त्यांना एक कामगिरी सोपविली. त्यांनी या कार्यकर्त्यांना रोसेटो मधील प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक व्यक्तीशी बोलून माहिती गोळा करण्याची कामगिरी दिली. या पाहणीतून समोर आलेले निष्कर्ष अजूनच धक्कादायक होते. रोसेटोमध्ये कुणीही आत्महत्या केली नव्हती, कुणीही दारू किंवा अमली पदार्थाच्या आहारी गेलेले नव्हते! गुन्ह्याचे प्रमाण अगदीच नगण्य होते. लोक मेले तरी फक्त म्हातारपणामुळे मरत!

हे सगळेच अपवादात्मक होते. डॉक्टर वोल्फने असे गाव कधीच पाहिले नव्हते. डॉक्टरला प्रथम असे वाटले की हे लोक कुठल्यातरी आहार विषयक जुन्या नियमाचे पालन करतात त्यामुळे त्यांची तब्येत चांगली आहे. पण त्याच्या असे लक्षात आले की तसे काही नाही. हे लोक स्वयंपाकात ऑलिव्ह ऑइलचा वापर न करता दुसरेच कुठले तरी ऑईल वापरायचे. त्यांच्या पिझ्झ्यात भरपूर मीठ, तिखट, अंडी, मांस  असायचे. काही लोक धूम्रपान ही करायचे. काही लोक तर लठ्ठही होते आणि व्यायामाच्या बाबतीत तर यांची बोंबच होती.

मग डॉक्टरने असा विचार केला की कदाचित या लोकांच्या वंशामध्ये काहीतरी वेगळे असावे. पण तसेही काही नव्हते. रोसेटोमध्ये आलेले इतर गावातील लोक तेवढे निरोगी नव्हते. म्हणजे हा मुद्दा सुद्धा निकालात निघाला.

एकदा डॉक्टर वोल्फ आणि त्यांचे सहकारी गावातून सहज फेरफटका मारत असताना त्यांच्या लक्षात आले की, गावातील माणसे जर रस्त्यात एकमेकांना भेटली, तर आवर्जून थांबतात! थोडावेळ गप्पा मारतात आणि मग आपल्या मार्गाला लागतात! इतकेच नाही तर घराच्या मागच्या अंगणात जेवण बनवून शेजाऱ्यांना सुद्धा जेवायला बोलवतात. त्यांच्या लक्षात आले की हे गाव म्हणजे एक मोठे सामायिक कुटुंबच आहे. कितीतरी घरांमध्ये तीन पिढ्या आनंदाने एकत्र राहत होत्या. वयोवृद्ध लोकांना यथोचित मान देण्यात येत होता. मग ते गावातल्या चर्चमध्ये गेले आणि तेथील निवांतपणा त्यांच्या लक्षात आला. एवढ्याशा गावात अनेक सामाजिक संस्था होत्या. सगळ्या कार्यक्रमांमध्ये धनिक आणि गरीब आनंदाने एकत्र सहभागी होत.

इटलीमधील दक्षिण भागातील ती निवांत जीवन पद्धती या लोकांनी येथे ही अंगीकारली होती. त्यामुळे आधुनिक शहरी जीवनातील ताणतणाव, धावपळ, स्पर्धा यापासून ते मुक्त होते. त्यांनी या गावात एक वेगळेच निरोगी, तणावरहित जग निर्माण केले होते. गावातील कुठल्याही घरी गेलं तरी घरातील सगळेजण आनंदाने, एकत्र हसत खेळत, जेवणाचा आस्वाद घेताना दिसत. कुठेही बघितले तरी लोक रस्त्याच्या बाजूला असलेल्या बाकांवर बसून मनसोक्त गप्पा मारताना दिसत. स्त्रियाही आपली कामे करताना एकमेकींशी गप्पा मारत आणि मनसोक्त हसत. ते सगळंच अफलातून होतं. आजकालच्या जगात असे आयुष्य जगायला मिळणे ही फार मोठी गोष्ट होती. खरंतर रोसेटो मधील रहिवासी शंभर वर्षांआधीचे निवांत आयुष्य जगत होते जे आता दुर्मिळ झाले होते. 

डॉक्टर वोल्फ आणि त्याच्या सहकाऱ्यांनी या सगळ्या गोष्टी इतर डॉक्टरांसमोर मांडल्या तेव्हा कोणीच त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. जेव्हा त्यांनी रोसेटो मधील लोकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य, त्यांची निकोप जीवनपद्धती आहे असे सांगितले तेव्हा सगळ्यांनी त्यांचे बोलणे हसण्यावारी नेले. पण हळूहळू त्यांच्या अभ्यासामागील तथ्य वैद्यकीय संस्थांच्या लक्षात येऊ लागले.

हृदयविकार टाळण्यासाठी आहार, व्यायाम या इतकीच अजून एक महत्त्वाचे गोष्ट आहे ते म्हणजे तुमचे सामाजिक जीवन! तुम्ही निरोगी किंवा रोगट आयुष्य जगाल हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. केवळ तुमच्याबद्दल विचार करून भागणार नाही, तर तुमचे कुटुंब, तुमचे मित्र, शेजारी आणि तुमचे एकंदरीत सामाजिक जीवन कसे आहे, यावर तुमचे आरोग्य अवलंबून असते; ही एक विस्मयकारक गोष्ट या संशोधनाने सिद्ध केली! आणि ही गोष्ट खरोखरच फार महत्त्वाची आहे. सुखी आयुष्य हे तुम्ही किती पैसे कमावले, किती यश मिळवले यावर अवलंबून नसून तुमचे कौटुंबिक आयुष्य किती चांगले आहे, तुम्ही तुमच्या आई वडिलांना किती सन्मान देता, तुम्हाला किती मित्र आहेत आणि तुम्ही इतरांना किती मदत करता यावर अवलंबून असते.

खरंतर असेच आयुष्य आमची मागची पिढी जगली होती आणि म्हणूनच कदाचित ती पिढी आपल्यापेक्षा अधिक निरोगी, अधिक समाधानी आणि दीर्घायुष्यी होती. किंबहुना हेच त्यांच्या दीर्घायुष्याचे आणि सुखी आयुष्याचे रहस्य असावे! भले त्यांच्याजवळ आपल्यासारखी संपत्ती नसेल, वस्तू नसतील, घरे नसतील: पण त्यांच्याजवळ खरे सुख आणि समाधान होते. आज हाच धडा आपण त्यांच्यापासून शिकायला हवा!


संकल्पना: सुनिल दगाजीराव पाटील, बंगलोर

शब्दांकन : अविनाश चिंचवडकर, बंगलोर

 

2 comments:

  1. रोसेटो च्या रहिवाशांची गोष्ट उद्बोधक

    ReplyDelete
  2. सुद्धृढ मानवी संबंध आणि प्रयत्नांती जे मिळेल त्यात समाधान मानायची हीच शिकवण आपली ज्ञानेश्वरीही देतेच आहे.याचीच आठवण ही कथा वाचताना आली.

    ReplyDelete