अवघे धरू सुपंथ





२५ मार्चचा दिवस, गुढीपाडवा. लॉक डाऊन सुरू झाले होते. आदल्या दिवशी रात्री झोपताना, घरात आहे त्या सामुग्रीत पाडवा छान साजरा करायचा असे मनाशी ठरवले होते. त्याप्रमाणे सकाळी घर लखलखीत झाडले, पुसले. दारात रांगोळी काढली आणि मस्त आल्याच्या चहाचा कप घेऊन बाल्कनीतल्या माझ्या आवडत्या खुर्चीवर बसले. चहाचा पहिलाच घोट घेतला आणि अचानक मनाला विचार चाटून गेला की आत्ता मी चहा घेत्येय, खाली दिवस रात्र ड्युटी करणाऱ्या सिक्युरीटीवाल्यांचे काय?  सध्या त्याला चहा मिळतोय का?

चहाचा कप अर्धवट ठेवून इंटरकॉमवर सिक्युरिटीला फोन लावला, तेव्हा कळले की त्यांना आमच्या मेन ऑफीसकडून मिळणारा चहा बंद झाला आहे. ताबडतोप कपभर चहा बनवला. डब्यात ४ बिस्किटं घेउन खाली गेले. तिथे त्याच्याशी बोलल्यावर कळले की चहा तर सोडाच, त्यांचा जेवणाचा पण वांधा झाला होता. बिचाऱ्यांना १ महिना पेमेंटच मिळालं नव्हतं. जिथुन येतात तिथली सगळी रेशनची दुकानं बंद झाली होती....... प्रचंड कालवलं  पोटात. आम्ही पुढच्या १ महिन्याचा शिधा भरण्याच्या अहमहमिकेत होतो आणि जो माणूस आम्ही बिल्डींगमधे आल्यावर आदबीने उभा राहणारा... त्याच्या पोटात अन्न नाही.....

शेजारीच कचरा उचलणारी आक्का उभी होती. ती म्हणाली, मी चालत येते पण स्वतःचा डबा आणते. ती २५ वर्षाची मुलगी. आमचा १८ मजले गुणीले ८ अशा ३ बिल्डींग चा कचरा, सकाळी ८ ते ४ सध्या एकटी गोळा करते. दिवसभरात पोटात छोटया डब्यात आणलेला सांबार भात यावर...मन विषण्ण झाले.....

दिवसभर त्यांना चहा, जेवण दिलं... जितकं दिलं, तितकं खालच्या अजून , ३ लोकांनी मिळून वाटून खाल्लं. मनाशी ठरवलं रोज यांना चहा आणि जेवण दयायचं ... पुढचे २१ दिवस. पण सध्याच्या स्थितीत मला एकटीला जमेल?

सगळे जण घरात, त्यांचे  खाणे, पिणे, कामाच्या आक्का नसल्याने सगळं घरकाम. पण काहीतरी मार्ग काढायला हवाच होता. हातात मोबाईल घेतला आणि बिल्डींगच्या 'व्हाटसअँप' ग्रुपवर सिक्युरिटी गार्डची परिस्थिती समोर आणली, मदत मागितली. वाचून ७ / ८ जणी पुढे आल्या. ५ तारखेपर्यंत जेवण आणि चहा सर्वांनी वाटून घेतला. सुरवात झाल्यावर अजून काही जणी पुढे आल्या. हां हां म्हणता १४ तारखेपर्यंत सर्व कॅलेंडर बुक झाले. एकही दिवस आळस न करता बिल्डींगच्या आम्ही सर्व बायकांनी गार्डनां  दोन्ही वेळचे जेवण २१ दिवस आनंदाने दिले.

आता लॉक डाऊन परत वाढला आहे. परन्तु दरम्यानच्या काळात गार्डनां पेमेंट मिळाले आणि आता आमच्या वस्तीतली वाण सामानाची दुकाने उघडली आहेत त्यामुळे आम्ही यापुढे आम्ही घरून डबा आणू शकू असे दोघांनी घरी येऊन सांगितले.

दरम्यानच्या काळात माझ्या लक्षात आले की ते १५ दिवस तोच मास्क वापरत आहेत. काही डॉक्टरांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितले की घरी बनवलेले कापडी मास्क उत्तम. झाले... घरातली जुनी कॉटनची ओढणी फाडली. त्याच्या कडा शिवल्या. तीन उत्तम मास्क तयार झाले. स्वच्छ धुवून त्यांच्या हातात दिले. त्यांच्या डोळ्यातली कृतज्ञता सगळे  सांगून गेली. आजपर्यंत ते सर्व जण मी दिलेले घरगुती मास्क वापरत आहेत. या सर्व घटनांनी मनाला प्रचंड समाधान वाटते आहे.

आरती उदय जोशी 


1 comment:

  1. Good work aarti. Many hands like these are keeping the situation livable.

    ReplyDelete