माझी एक मामी होती.
माझ्या लहानपणीच्या स्मरणात ती मला सतत स्वयंपाकघरातच दिसते. या मामीची सासू
म्हणजे माझ्या आईची सख्खी मावशी होती आणि ही मामीही आईची सख्खी मामेबहीण होती. मला
त्यांच्या घरी राहायला जायला तेव्हा फार आवडायचं कारण त्यांच्या आणि आमच्या घरात
जमीन अस्मानाचा फरक होता. आमचं घर आधुनिक पद्धतीनं बांधलेलं होतं. आमच्या घरात गॅस होता, आधुनिक पद्धतीचं
बाथरूम-संडास होते, घरी कायम मदतीला माणसं
होती.
यांच्या घरी सगळं
उलट होतं. सारवावं लागणारं घर, आधी चुलीवर आणि मग
काही दिवसांनी पितळेच्या स्टोव्हवरचा स्वयंपाक, सगळ्यात भयानक होता तो
जुन्या पद्धतीचा मैल्याचा संडास. मदतीला कुणीही नाही कारण प्रचंड सोवळं ओवळं. पण
माझी ही प्रेमळ मामी आणि तिची तितकीच प्रेमळ असलेली मुलगी, माझी मामेबहीण यांच्यामुळे मला त्यांच्या घरी जायला
आवडायचं. दुर्दैवानं आता दोघीही नाहीत. ही मामी अतिशय चवदार स्वयंपाक करत
असे पण कधीही तिचं कौतुक केलं गेलेलं मी ऐकलं नाही. ही कथा फक्त माझ्या या मामीची नाहीये.
अशी अनेक घरं आपण बघतो, जिथे बायकांच्या कष्टांना गृहित धरलं जातं.
प्रेमाचा मार्ग पोटातून जातो असं म्हटलं जातं पण खरंच तसं असतं का? भारतीय स्वयंपाकाचं फार उदात्तीकरण केलं गेलं आहे असं मला वाटतं. म्हणजे विशिष्टच पद्धतीचे मसाले हवेत, अमुक पदार्थाचा पोत असाच हवा हे आपण फारच कौतुकानं बोलताना ऐकतो. पाककौशल्याचा अभ्यास करताना हे ठीक आहे. पण रोजच्या जेवणात काही वरखाली झालं, एखादा पदार्थ झटपट कृतीनं केला तर खरंच इतका फरक पडतो का? ब्राह्मण कुटुंब असेल तर अमुकच खाणार, सारस्वत असतील तर पाट्या-वरंवट्यावर केलेलंच वाटण लागतं आम्हाला, असं म्हणणार असे प्रत्येक जाती-जमातीच्या पद्धतीचे कोडकौतुक असते. अर्थात याचा अर्थ ताजा स्वयंपाक करायचा नाही असं नाही. पारंपरिक पद्धतीनं पदार्थ करायचे नाहीत असं नाही. जातीजमातींच्या विशिष्ट खानपान संस्कृती जपायच्या नाहीत असं नाही आणि घरातल्यांना प्रेमानं करून खायला घालायचं नाही असंही नाही. पण या सगळ्यात महत्त्वाचं आहे ते, प्रेमाने जेवण करणाऱ्याबद्दल असलेलं प्रेम, त्याच्याबद्दल असलेली कृतज्ञता, त्याच्या कष्टाची असलेली किंमत आणि त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याबद्दलचा आदर.
काल द ग्रेट इंडियन किचन नावाचा मल्याळम
चित्रपट बघितला. अनेक दिवसांनी विचारात करायला लावणारा चित्रपट बघितला. अतिशय साधा, संथ गतीनं पुढे जाणारा हा चित्रपट अंगावर येतो. ठरवून लग्न झालेलं
एक जोडपं आहे. नव्या लग्नाची नव्हाळी आहे. मुलीला स्वतंत्रपणे
विचार करण्याची सवय आहे. नवरा मुलगा समाजशास्त्राचा प्राध्यापक आहे, पण तो आपलं समाजशास्त्राचं ज्ञान कॉलेजमध्ये ठेवूनच घरी
परत येतो. त्याला त्याचा वापर आपल्या रोजच्या आयुष्यात करायची गरज वाटत नाही. घरात एक सदैव रिकामा
असलेला सासराही आहे.
लग्न झालेल्या
दिवसापासून सासू आणि ही मुलगी फक्त स्वयंपाक करताहेत. रोज ताजा नारळ खोवणं, ताज्या
भाज्या चिरणं, ताजे मसाले वाटणं, जिवंत
फोडण्या घालणं, जेवल्यावर भांडी घासणं इतकंच या दोघी
करताहेत. फिल्ममध्ये हा मोनोटोनस भाग इतका सुंदर घेतला आहे, की जरा वेळानं ते सगळं
अंगावर यायला लागतं. या दोघी बायका स्वयंपाक करताहेत आणि सासरे आरामात ओट्यावर वाचत बसलेत, नवरा आपली योगासनं निवांतपणे करतोय. कुटुंब सुशिक्षित आहे, पैसे प्रचंड आहेत, घरात सोन्याची लयलूट
आहे. पण या बायकांना कुणी मदतीला नाही. जुनाट स्वयंपाकघर आधुनिक करावंसं कुणाला वाटलेलं नाही. सासऱ्यांना चुलीवर केलेला
भातच लागतो, कुकरमधला चालत नाही, पाट्यावर वाटलेलीच चटणी लागते.
सासू मुलीच्या
बाळंतपणासाठी जाते आणि या नवीन नवरीवर सगळा भार पडतो. ती काही पद्धती बदलू बघते. त्या नवरा आणि सासऱ्यांना पसंत पडत नाहीत.
त्यात तिची पाळी येते तेव्हा तिला ती अपवित्र असल्याचं सांगितलं जातं आणि सात दिवस
बाजूला बसवलं जातं. हीन वागणूक दिली जाते. नवरा आणि सासरे सबरीमालाचं व्रत करतात. या काळात
स्त्रीचं दर्शन चालत नाही म्हणणारे हे दांभिक लोक, तिनं केलेलं खातात, नावं ठेवतात पण खातात. मात्र तिचं दर्शन आणि
स्पर्श त्यांना चालत नाही. तिला नोकरीची संधी येते तेव्हा सासरे गोड बोलून तिला
आपल्या घरच्या बायका नोकरी करत नाहीत असं सांगतात, वर
घरात राहणारी स्त्री ही पवित्र असते अशी मखलाशीही करतात. नवराही त्यांच्या हो
मध्ये हो मिसळतो. ह्या संवादात
तिची सासू ही डबल ग्रॅज्युएट असल्याचे तिला कळते. सासू तिला नोकरी कर असे सांगते. तिला हळूहळू सगळं असह्य व्हायला लागतं आणि शेवटी ती 'स्व'च्या शोधात
घराबाहेर पडते.
source Google |
अत्यंत साधी कथा पण त्या कथेची मांडणी फार फार सुरेख रितीनं केलेली. खरं तर फूड फिल्म्स नेत्रसुखद असतात. पण या फिल्ममध्ये स्वयंपाक अंगावर यायला लागतो. सासऱ्यांना चुलीवर केलेलाच भात लागतो, कुकरमध्ये केलेला चालत नाही. नवरा आणि सासरे जेवताना सांबारातल्या शेंगांची सालपटं, कढीपत्ता, मिरच्या हे सगळं डायनिंग टेबलावर काढून फेकतात. ते ताटात नीट एका बाजूला ठेवत नाहीत. आपल्यानंतर दोघींना जेवताना याची घृणा वाटेल हे त्यांच्या गावीही नसतं. ती एकदा नव-याजवळ सहज उल्लेख करते, तर तो आपली सवय तर बदलत नाहीच पण त्यावरून तिला टोमणे मारत राहतो.
स्वयंपाकाघरातलं तुंबणारं सिंक, जुन्या पद्धतीचं स्वयंपाकघर, स्वयंपाकघरातल्या टेबलाला सतत चिकटून असलेली नारळ खोवणी, सतत चिरल्या जाणाऱ्या भाज्या, बसणाऱ्या फोडण्या, शिजणारी डाळ, ढणाढणा पेटलेली चूल या सगळ्यातून बायकांच्या अवहेलनेचा माहोल बनत जातो. तसं बघायला गेलं तर केवळ चार जणांचं कुटुंब, नवीन लग्न झालेलं जोडपं. पण कुठेही एकत्र जेवण नाही, गप्पा नाहीत, चहा-कॉफी नाही, चेष्टामस्करी नाही, रोमान्स नाही.फक्त आणि फक्त स्वयंपाकाभोवती फिरणारं चक्र.
आपल्या रोजच्या
जेवणाभोवती किती आठवणी जोडलेल्या असतात . एखाद्या पदार्थाबद्दल एखादी हळवी आठवण
असते, एखादा पदार्थ मायेनं आणि प्रेमानं रांधलेला असतो. जेवताना
होणाऱ्या गप्पा असतात, त्यातून गहिरे होत जाणारे बंध असतात.
यात हे कुठेही नाही . आणि अशी घरं मी बघितली आहेत. लैंगिक संबंधाच्या
वेळी त्रास होतो तर थोडा फोरप्लेचा विचार करूया असं नायिका नव-याला म्हणते त्यावर
तो मला तुझ्याबद्दल काही वाटतच नाही तर फोरप्ले कसला असं उत्तर देतो. ह्या क्षणी तिचा संयम सुटतो. ती विलक्षण दुखावली
जाते.
या चित्रपटात एकाही
पात्राचं नाव आपल्याला कळत नाही. ते एकमेकांना नावानंही हाक मारत नाहीत. या कथेची
सार्वत्रिकता यातून लक्षात यावी .आपणही त्यात इतके गुंतून जातो की आपल्या ते
लक्षातही येत नाही. प्रेमाचा अभाव असलेलं ते जोडपं आणि ते कुटुंब ही बघणं त्रासदायक होतं.
आजच्या काळात
अजूनही अशी घरं आहेत की जिथे पैसा असला तरी केवळ आम्हाला असं चालत नाही म्हणणारे
पुरूष आणि बायकाही असतात. अनेक घरांमध्ये स्वयंपाकाची आधुनिक उपकरणं वापरली जात
नाहीत. बायका पुरुषांबरोबर एकत्र जेवायला बसत नाहीत. घरातल्या भाजी-किराणाबद्दलचे
निर्णय पुरूष घेतात (घ्यायला हरकत नाही पण मग स्वयंपाकाचीही जबाबदारी घ्यावी). आपल्याकडे मुलांना वाढवतानाच
समानतेबद्दल शिकवलं जात नाही . मुलग्यांची मुलींइतकीच जबाबदारी आहे हे ठसवलं जात
नाही.
Source Google |
बाई गृहिणी असो की बाहेर काम करणारी असो तिच्या कष्टांची जाणीव हवीच. घर आणि कुटुंब ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी घरात आणि कुटुंबात राहणाऱ्या प्रत्येकाची आहे. त्यातल्या कामाची विभागणी करतानाही सर्व घटकांचा विचार व्हायला हवा. पण असं असलं तरी आता आजूबाजूला अनेक तरूण पुरूष घराची, मुलांची जबाबदारी बरोबरीनं उचलायला तयार असतात हे चित्र मला आशादायक वाटतं. हेच चित्र अधिकाधिक रंगतदार होवो हीच अपेक्षा.
या लेखाचा शेवट मी
विवेकानंदांच्या एका कोटनं करणार आहे. हा चित्रपट बघितल्यावर मला निरंजननं तो
पाठवला.
Our religion is in
the kitchen. Our God is the cooking-pot, and our religion is, "Don't touch
me, I am holy". If this goes on for another century, every one of us will
be in a lunatic asylum.
- Swami Vivekanand
सायली राजाध्यक्ष
छान लिखाण, खरंच मन विषण्ण होते हा चित्रपट पहाताना.
ReplyDelete