रोजच्या सकाळच्या वॉकसाठी ती गेटपाशी आली. आत्ता कुठं उजाडायला सुरवात होतीय. कुलुप काढता काढता तिला वाटले की पूर्ण उजाडू दे मगच बाहेर पडावं. भटकी कुत्री फार धुमाकूळ घालतात हल्ली. ती झोपाळ्यावर येउन बसली. पायाशी लगेच मनी आलीच. तिच्या पायाभोवती म्याँव. म्याँव करत भिरभिरु लागली.
'हो ग बाई. द्यायचं तुला दूध. आधी आणते तरी'. तिने गोंजारत तिला थोपटलं. डोळे
किलकिलत ती तिच्या पायाशीच बसून राहीली. रात्रीचं दूध फ्रिजमधून
बाहेर काढुन ठेवायचं, आणि फिरुन दूध, भाजी घेउन आल्यावर ते दूध मनीला द्यायचे, असा तिचा रोजचा दिनक्रम. तासाभरात दूधही नॉर्मलवर येई.
फिरुन आल्यावर स्वयंपाक घरात जायचा अवकाश मनी धावत पायात आलीच. हसून तिच्यापुढे दुधाचे भांडे ठेवताना तिच्या लक्षात आलं. परत पिल्लं घालणार असं दिसतंय. तिनं दूध थोडे जास्त घातले. आतापर्यंत दोन तीनदा तरी मनीनं घरात पिल्लं घातली होती. यावेळी ती थोडी जास्त सुस्तावल्यागत वाटली. शरीरधर्म कुणा प्राणीमात्राला चुकलाय? तिने दुधाबरोबर पोळी भात कालवून द्यायला सुरवात केली. घराच्या आवारात फेरफटका मारुन मनी आपली जिन्याखाली येउन बसायची. ओटीवर आलेल्या पक्षांच्या मागे धावेना, शेजारच्या टॉमीवर फिस्कारेना. 'देवा, आता यातून मनुताईला नीट पार कर.' तिचं लक्ष गेलं की ती मनोमन प्रार्थना करी. तिला रिकामा वेळ मिळाला की ती मनुताईला गोंजारुन घेई, ती पण अंग पायाशी घासून तिला काही सांगू पाही.
कधीतरी रात्रीत मनुताईने तीन
पिल्लांना जन्म दिला. जगात मनीच्या पिल्लांइतकं गोंडस काहीच नसेल. कदाचित गोंडस हा
शब्दसुद्धा पिल्लांसोबतच जन्मला असेल असं तिला प्रकर्षाने वाटलं. आईसोबत आता
पिल्लंही आठ एक दिवसात तिच्या पायात पायात येऊ लागली. लटक्या रागाने ती म्हणे, माझ्याच घरात हल्ली पाऊल मला खाली
बघून उचलावं लागतंय! आठ दहा दिवसांतच मनीनं पिल्लांची
जागा बदलली. घराच्या आवारात एक कोपरा धरुन बसून राहायची. पिल्लांचा वावर आता घर-आवारात मुक्त चालला होता. थोडी मोठी झाली की जातील आपली मिळेल त्या दिशेला. पण मनुताई कधी आली आणि घरची झाली ते समजलंच नाही.
सकाळी फिरायला जाताना, गेटचं कुलुप काढताना
तिच्या लक्षात आलं की दोन पिल्लं जखमी होउन निपचित पडलीयत.
ती खाली बसली.
बारकाईने बघताना,
तिच्या लक्षात आलं की नुसती जखमी नाहीत, तर बरंच ओरबाडलंय त्यांना. अंगाखाली रक्त साकळलंय. हल्ली पिल्लं गेटखालून बाहेर जायचा प्रयत्न करत
होती. एखाद्या भटक्या कुत्र्याने बहुधा हल्ला केला असणार.
तिची नजर मनीला शोधू लागली. उरलेल्या
पिल्लाला पोटाशी घेऊन
मनुताई केविलवाणी बसून होती. तिच्या नजरेतलं कारुण्य पाहून ती गलबलली. देह आहे म्हणजे मन
असणार. राग, लोभ, क्रोध, काम सगळ्या भावना
असणार. पण व्यक्त होण्याचं साधन काय या पशुपक्षांना? थोड्या वेळात पिल्लांनी प्राण सोडलाच.
ती फिरायला गेलीच नाही मग. झोपाळ्यावर
अस्वस्थ बसून राहिली.
आठ दहा दिवसांनंतरची गोष्ट. संध्याकाळी लोकर घेऊन ती झोपाळ्यावर आली. मनी दबा धरुन कंपाऊंडच्या भिंतीवर बसलेली दिसली. किलकिल्या डोळ्यांनी ती रस्त्यावर बघत होती. तिला वाटलं पिलांची वाट बघतेय का काय? पण छे, समोरुन येणाऱ्या भटक्या कुत्र्यावर तिनं इतकी अकस्मात उडी मारली की ती ही क्षणभर गोंधळून गेली. कुत्र्यापुढं तिची ताकद ती काय. पण तिची मातृशक्ती श्रेष्ठ ठरली. तिनं तिच्या पुढच्या दोन्ही पायाने गुरगुरत त्याला जोरात बोचकारलं, माजलेलं कुत्रं शेपूट घालून पळालं. अवघ्या काही क्षणांत हे सगळं घडलं, मनीच्या नजरेतला क्षोभ बघून, ती समाधानाने हसली. याच कुत्र्याने हल्ला करुन तिच्या पिल्लांना मारलं असणार. तिची खात्री पटली. मनी जरी थकली होती तरी तिची मातृशक्ती, मातृभाव इतका प्रबळ होता की, तिच्याहून ताकदवान कुत्रा तिला घाबरुन पळाला.
ताकद आणि शक्ती यातला
फरक झोपाळ्यावरच्या तिला क्षणात उमगला. देहात वाढते ती ताकद, आणि
मनात वाढते ती शक्ती. शक्ती अशी जी देहाला योग्य वेळी
योग्य करण्याचं,
सोसण्याचं आवाहन करते. शक्तीला लवचिकतेचं माप आहे, तर ताकदीला अविचार, अहंकाराचा कणा आहे. तिने मनोमन
मनुताईला , तिच्यातल्या आईला सलाम केला.
सौ विदुला जोगळेकर
छान!
ReplyDelete