तळ्यांचे शहर - भाग २



"...या भागातली लोकं चांगली आहेत, हा भाग चांगला आहे ( किंवा त्याच्या उलट...)" अशी वाक्यं आपण नवीन ठिकाणी राहायला गेलेल्यांकडून हमखास ऐकतो.
या वाक्यांमध्ये त्या ठिकाणच्या लोकांच्या संस्कृतीकडे निर्देश असतो. ती लोकं सामुदायिकरित्या काय करतात - एकमेकांच्या उपयोगी कशी पडतात याचा भाग असतोच त्यात.

काही वर्षांपूर्वीची गोष्ट, मी सकाळी 'जक्कूर' भागात नागरिकांनी आयोजित केलेल्या तळ्याच्या स्वच्छता मोहिमेत काम करून आलो. तिथली सामाजिक कार्य करणारी लोकं त्या भागातील लोकप्रतिसादाबद्दल खूप खूश होती. त्याच दिवशी दुपारी 'केम्ब्रिज लेआऊट' भागात समाजकार्य करणाऱ्या एका दाम्पत्याला भेटायला गेलो होतो. त्यांचं काम चांगलं होतं, पण ते त्या भागातल्या नागरिकांच्या सहभागाबद्दल नाखूष होते. केम्ब्रिज लेआऊटचा मॅप बघता लक्षात आलं की त्या प्रभागात तळी पण नाहीत आणि बागा पण. साहजिकच मनात आलं की ज्या मुद्द्यांवरून नागरीक एकत्र येऊन काम करतात, अशा मोठ्या आणि 'गरजू' सार्वजनिक जागांचा अभाव आहे या लेआऊटमध्ये. आणि अशा तऱ्हेने खराब स्थितीतल्या तळ्यांचं वेगळंच महत्त्व माझ्या लक्षात आलं.

लोकमान्य अथवा लोकप्रिय (आणि दृश्य) सार्वजनिक गोष्टीच्या सुरक्षेकरता किंवा उद्धाराकरिता लोकं एकत्र येतात, संघटित होतात किंवा संकटप्रसंगी समाजातले संवेदनशील आणि संस्कृतीचे अभिमानी लोकं एकत्र येतात. ( ऐतिहासिक वास्तू - वारसा, प्रार्थनास्थळ जतन व जीर्णोद्धारासाठी लोकं नेहमी एकत्र येतात.) तळी, टेकड्या, समुद्रकिनारे, बगीचे, खेळाची मैदानं यांच्या स्वच्छता व विकासासाठी असेच संघ तुम्हाला सर्वत्र आढळतील... पण मुख्यत्वे शहरात! असं का?

कारण मोकळा श्वास घेता यावा - मनाची मरगळ दूर होईल असा मोकळा नैसर्गिक भाग असावा - आणि लोकांना तो मोफत उपलब्ध असावा ही मुख्य गरज शहरात असते. शहरात डायबेटीस व हृदयरोग असणाऱ्यांचे प्रमाण पण मोठं आहे. जिमची फी न परवडणाऱ्या सामान्य जनतेसाठी अशा जागा खूप गरजेच्या आहेतच. जैविक संपदा संवर्धन, भूजल पातळी वाढवणं, हवेतील तापमान कमी करणं हे पण तळ्यांचे महत्त्वाचे उपयोग आहेत. पण शहर वाढताना अशा मोकळ्या सार्वजनिक जागाच विकासाला बळी पडतात. बंगलोरमध्ये बस स्टॅन्ड, स्टेडियम, टेक पार्क, निवासी संकुल उभारण्यासाठीसुद्धा अनेक तळी भराव घालून वापरली गेली.

सुदैवाने बंगलोरमधले नागरिक आता जागरूक झाले आहेत. बहुतांश तळ्यांच्या सुरक्षा व पुनरुज्जीवनासाठी नागरिकांचे संघ तयार झाले आहेत. २०१२ पासून विभूतीपुरा तळ्याच्या विषयी आत्मीयता असणाऱ्या नागरिकांनी स्वयंप्रेरणेने सभा घेतल्या, नगरसेवकाला व सरकारी व्यवस्थेला या तळ्याची सुधारणा करण्याविषयी विनंतीपत्रं लिहिली, वर्तमानपत्रात या तळ्याच्या दुरावस्थेबाबत बातम्या दिल्या. शेवटी आमच्या विभूतीपुरा तळ्याकरिता २०१४ मध्ये २.५ कोटी आणि २०१८-१९ मध्ये ८ कोटी रुपये सरकारनी देऊ केले. एकूण ६ ते ७ वर्षांत जवळ जवळ ११ कोटी रुपयांचा निधी एका तळ्यासाठी सरकार खर्च करत आहे. खरंच ११ कोटी रुपयांचं काम आहे का? किती पैसे खाल्ले जातात? हे प्रश्न पडणं साहजिक आहे.

माणूस हा समूहाने राहणारा प्राणी आहे. सर्व सामायिक गरजांची पूर्ती करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावं लागतं आणि अशा कामात कोणीतरी पुढारी बनतोच किंवा लागतोच. एवढी जनसंख्या असलेल्या व्यवस्थेत 'पुढारी' हा सुद्धा एक पद-पेशा बनून जातो. सांस्कृतिक विधी - स्वास्थ्य - शिक्षण - रस्ते - सार्वजनिक सोयी; साधारण या क्रमाने प्राधान्य देऊन पेशेवर पुढारी कामं करतात. जेव्हा मोठ्या रकमेची कंत्राटं निघतात तेव्हाच राजकारण - व्यवस्थापन 'इंटरेस्ट' घेऊन कामं करतात.

जर आपण एखाद्या सामाजिक कार्यावर सध्या होणारा सरकारी खर्च वाचवणारे उपाय किंवा कल्पना सांगतो तेव्हा त्याला सरकारी व्यवस्थेकडूनच सर्वाधिक विरोध सहन करावा लागतो, हे मी प्रत्यक्ष अनुभवलं आहे.

विभूतीकेरे 

११ कोटींपैकी ४ कोटी निधीमधून छोटा STP (sewage treatement plant) बसवण्याचं काम बाकी आहे, पण बाकी सर्व काम उत्तम पार पडले आहे. मुख्य म्हणजे कोणत्याही राजकीय खेळीशिवाय/ हस्तक्षेपाशिवाय पार पडलं आहे. सुरक्षेकरता व देखभालीकरता पोलिसांची एक चौकी आणि 4 CC TV कॅमेरे पण बसवण्यात आले आहेत. सगळ्यात कौतुकाची गोष्ट म्हणजे अनधिकृत आणि खोटे दस्तऐवज असलेलं अतिक्रमण हटवण्यात आलं आहे. पूर्वी जे सांडपाणी या तळ्यात यायचं ते डायव्हर्ट केलं आहे. पावसाचं पाणी जिथून येतं त्या भागात विशिष्ट वनस्पतींचा बेड तयार करून दगडांनी रचलेल्या double filter ridges पण उभारल्या आहेत.


कॉर्पोरेट कंपन्यांचा समाजोपयोगी कामाचा निधी (CSR Fund) वापरून अनेक सामाजिक संस्थाही तळ्यांची नैसर्गिक संपदा राखली जाईल यासाठी मेहनत घेत आहेत. बंगलोरची पाण्याची समस्या पाहता भविष्यात या शहराला पुन्हा तळ्याचं पाणीच उपयोगात येणार, याची मला खात्री आहे. आणि आता एप्रिल महिन्यात त्या तळ्याचं 'कोरडं ठणठणीत' पात्र बघून मला खूप समाधान वाटतं आहे...


कारण बारमाही असणारं सांडपाणी आणि उत्पादन उद्योगांमधून निघणाऱ्या प्रदूषित पाण्याचा ओघ आता या तळ्यात शिरत नाहीत याचा पूर्ण कोरडेपणा हा उत्तम पुरावा आहे.
तळी पुनरुज्जीवित होतायत...

लोकं बहुजनहिताय एकत्र येतायत...

अनिरुद्ध अभ्यंकर 



4 comments:

  1. लेखातून वेगळी माहिती मिळाली।

    ReplyDelete
  2. खूपच छान आणि माहितीपूर्ण लेख

    ReplyDelete
  3. Neena VaishampayanJuly 3, 2020 at 10:54 PM

    माहितीपूर्ण सुरेख लेख

    ReplyDelete
  4. सुंदर व निसर्गभान वाढवणारा लेख!

    ReplyDelete