थकले रे नंदलाला!

मध्यंतरी एका शब्दाने खूप छळलं....
शब्दप्रभू ग. दि. माडगूळकर यांचे शब्द, सुधीर फडके यांची चाल व आशाताईंच्या मधुर आवाजाने अमर झालेलं एक गीत आपलं सगळ्याचंच लाडकं आहे. ते म्हणजे, 
नाच नाचुनी अति मी दमले,थकले रे नंदलाला ...
चित्रपट –जगाच्या पाठीवर!


त्यातल्या एका कडव्यात ते म्हणतात,
निलाजरेपण कटीस नेसले,निसुगपणाचा शेला....

हा ‘निसुग’ शब्द फार छळत होता. ‘निसुग’ म्हणजे नेमकं काय हे लक्षात येत नव्हतं. खूप गोळाबेरीज अर्थ काढून झाले. शेवटी शब्दकोशाला शरण गेल्यावर त्याचा खरा अर्थ कळला. ‘निसुग’ म्हणजे कोडगेपणा. निसुगपणाचा शेला म्हणजे कोडगेपणाचा शेला. गाण्याची सुरावट गोड असली,स्वर मधुर असला तरी शब्द चाबकाचे फटकारे मारणारे आहेत.

मग लक्षात आलं की खरोखरच आज आपली सर्वांची अवस्था अशीच आहे...निलाजरेपण कटीस नेसले.....वेगवेगळ्या स्तरांवरचं हे निलाजरेपण आहे.....कधी बढतीसाठी,कधी कुटुंबाच्या भल्यासाठी...कधी तात्कालिक सुखासाठी....आपण हे निलाजरेपण कटीस नेसूनच फिरतो आहोत. वर कोडगेपणाचा शेलाही पांघरून घेतला आहे. कधी ‘स्टेटस’ च्या गोड आवरणाखाली तर कधी ‘युद्धात व प्रेमात सारं काही क्षम्य असतं’ या म्हणीचा आपल्या स्वार्थासाठी सोयीस्कर अर्थ लावत आपण हा कोडगेपणाचा शेला राजवस्त्र असल्यासारखा अंगावर मिरवतो आहोत. त्याचाही गर्व बाळगतो आहोत. त्या गर्वाचा टिळा भाळावर लावून फिरतो आहोत.

या कडव्याचा शेवट करताना गदिमा म्हणतात,
‘उपभोगांच्या शत कमलांची कंठी घातली माला,थकले रे नंदलाला ...’

हे शब्द तर आजूबाजूला जराशी नजर टाकली तरी दाहकपणे अंगावर येतात. दारु आणि ड्रग्स चा अतिरेक,मोबाईलमध्ये बुडून गेल्याने स्वतःच्या घराशीच नव्हे तर मानवतेशीही नातं तोडलेले लोक,उपभोग हाच जीवनाचा मंत्र बनवून,उपभोगाचं प्रत्येक साधन आपलंसं करत चाललेले लोक,त्यापायी कसलाही विवेक न राहिलेला समाज,झटपट पैशासाठी कॉल गर्लचा धंदा आनंदाने करणाऱ्या अगदी चांगल्या घरातल्या मुली व चोऱ्या-खून करणारी चांगल्या घरातली मुलं,लैंगिक सुखासाठी अगदी तान्ह्या मुलींनाही आपल्या पाशवी वासनेची शिकार बनवणारे नराधम.... ही यादी खूप मोठी आहे. सुन्न करणारी आहे...पण एवढं करून हाती काय राहातं? ‘थकले रे नंदलाला...’ ही जाणीव?

ती अपरिहार्य आहे,कारण आपण खऱ्या सुखाच्या मागे न लागता सुखाच्या बुडबुडयाच्या मागे धावतो आहोत आणि तो फुटणं अपरिहार्यच आहे.

आपल्या या लाडक्या गाण्यातले गदिमांचे शब्द खरं तर खूप काही सांगून जाणारे आहेत, दिशा देणारे आहेत. मात्र आपण शब्दांकडे लक्ष देणंच आता विसरून गेलो आहोत. त्यांचा अर्थ कळण्याइतकं भाषेचं ज्ञानही आपण दुर्दैवाने मिळवलेलं नाही. पैशासाठी वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या मागे धावताना भाषेची समज व गरज हीही आपण नजरेआड केली आहे. भाषेतून येणारी सुसंस्कृतता,प्रगल्भता आज आपल्याकडे नाही. परिणाम एकच आहे. फक्त आणि फक्त भौतिक सुखामागे धावताना आपणच थकून जातो आहोत. ‘थकले रे नंदलाला’ अशी आपली अवस्था झाली आहे.

ही थकावट दूर करायची असेल तर निसुगपणाचा शेला उतरवून ठेवून सत्कर्मांचा, सद्विचारांचा,रामनामाचा शेलाच अंगावर पांघरावा लागणार आहे. शाश्वत सुखाच्या मागेच लागावे लागणार आहे आणि ते सुख,तो आनंद आपल्या आजुबाजूलाच तर आहे.....तो आनंद आहे देण्याचा आनंद....माणसातला देव शोधण्याचा आनंद ...उपभोगातला नाही तर त्यागातला आनंद....कारण निलाजरेपणाचं वस्त्र कदाचित अंग झाकेल,पण अब्रूवर पांघरूण नाही घालू शकत ...निसुगपणाचा शेला कदाचित छाती झाकेल,पण लज्जारक्षण नाही करू शकत...तो कधी तरी सरकणारच आहे आणि उपभोगांची माला शृंगार करू शकेल,तात्कालिक आनंद देऊ शकेल पण सुगंधाने चित्त प्रसन्न नाही करू शकणार ....

आता आपण ठरवायचं आहे की तरीही तेच लेऊन ‘थकले रे नंदलाला’ अशी आपली अवस्था करून घ्यायचीय की ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अशा आनंद सागरात डुंबायचंय....

                                              जयश्री देसाई


2 comments: