ट्रेंड


तीन महिन्यांच्या अथक कष्टांनी गेल्या महिन्यात आमचं घर शेवटी तयार झालं. आज काल घर घेण्यापेक्षा त्याचं इंटिरियर करणं हा मोठा प्रोजेक्ट असतो. आम्ही दोघांनी प्रत्येक कोपरा अन कोपरा कसा वापरला गेला पाहिजे ह्यात जातीने लक्ष घातलं होतं. इंटिरियर डिझायनर नेमूनही सगळीकडे आमचं मत विचारात घेतलं जात होतं. फर्निचर, दिवे, सगळंकसं नव्या पद्धतीचे आणि देखणे दिसत होते.


ह्या सगळ्या गोंधळात आम्हाला आमचा असा वेळच मिळाला नव्हता. कुठेतरी बाहेर निवांत जेवायला जायचं कधीपासून डोक्यात होतं. शेवटी जेव्हा बाईने "दोन दिवस येणार नाही" असं खडसावून सांगितलं, तेव्हा त्याचा मुहूर्त चालून आला. गावात एक छान कॅफे सुरु झालाय आणि त्याची सजावट खूपच वेगळी आणि छान आहे असे आमच्या मित्रमंडळींकडून ऐकण्यात येत होतं. ठरलं तर मग. 'कॅफे ऑफबीट'ला जायचे. शनिवारी संध्याकाळचे टेबलही रिझर्व करण्यात आलं.

कॅफे नावाप्रमाणेच 'ऑफबीट' होता. जुन्या पद्धतीची लाकडी टेबलं, खुर्च्या आणि बाकडे होते. वायरिंग जुन्या काळातील होते. आतासारखे भिंतीत दडवलेले नव्हते. इलेक्ट्रिकल स्विच बोर्डसुद्धा लिव्हर वर खाली करायच्या टाइपचे होते. खाली काश्मिरी गालिचे टाकले होते. भिंती लाकडी होत्या. छतावर मोठ्या पात्याचे पंखे गरगरत होते आणि भिंतीवर इथून तिथे मान वळवणारे पंखे होते. लायटिंग जेमतेम होतं पण रस्टिक होतं, कुठुन कुठून शोधून आणलेली अजब आकाराची झुंबरं होतीं. एकंदर काय, तर शिस्तबद्ध आणि आखल्यासारखं असं काहीच नव्हतं. जुन्या दुर्मिळ पुस्तकांनी भरलेली बरीच भिंतीतील कपाटं होती. त्या पुस्तकांच्या वासामुळे लायब्ररीत असल्यासारखं वाटत होतं. कोपऱ्यात एक कॅरमचं टेबल होतं. वरून बल्ब सोडला होता. शेजारी टेबलावर बुद्धीबळ, व्यापार असे खेळ रचले होते. काही टेबलं आखूड, बैठकीच्या जेवणासाठी होती. आम्ही त्यातलंच एक टेबल निवडलं.

"किती मस्त ना. अगदी आपल्या जुन्या गावच्या घरी गेल्यासारखे वाटतेय ." ती स्थानापन्न झाल्यावर म्हणाली. जेवण ही सुंदर होतं. पण जेवणापेक्षा आम्ही त्या जागेच्याच प्रेमात पडलो होतो.
तेवढ्यात तिथे मॅनेजर आला. सहज विचारपूस करायला. तिने त्याला बिनधास्त प्रश्न विचारायला सुरुवात केली. कुठून काय काय आणलंय ह्याची चौकशी झाली. बायका ह्या बाबतीत जरा जास्त डेरिंगबाज असतात. तिने चक्क "आपको ऐसा सब पुराना सेटअप रखनेका आयडिया कैसे आया?" असं विचारलं. अशा वेळी "ये मॅडम मेरे साथ नहीं है" हा डायलॉग मी मनात तयार ठेवलेला असतो. असो. बहुतेक त्या मॅनेजरला असल्या प्रश्नांची सवय असावी, म्हणूनच तो जरा हसला, आणि म्हणाला - "मॅडम, आज कल के घर ही फाइव्ह स्टार होटल जैसे दिखने लगे हैं. तो हमने सोचा क्यूं ना होटल को घर जैसा बनाए? लोग भी देखिये क्या कमाल करते हैं. लाखो पैसे खर्च करके घर महंगा दिखे ऐसा बनाते है और फिर पुराने, सस्ते लुकवाले होटल में ज्यादा पैसा दे के 'अँबियन्स ' के नाम पे आते हैं."

आम्ही गुपचुप बिल देऊन निघालो. घरी ड्राईव्ह करत येताना दोघंही काहीच बोलत नव्हतो. मॅनेजरचं बोलणं जरा टोचलं होतं खरं.



मानस

1 comment: