उघड-झाक


काही वर्षांपूर्वी परदेशात जाण्याचा योग आला होता. तिथली संस्कृती जवळून पहायला मिळाली. व्हेनिस शहर पहायला बोटीने जावे लागते. अशाच एका बोटीत बसले असता तेथील माणसांचे अवलोकन करत होते.

एक जोडपे माझ्या समोर बसले होते - मित्र मैत्रीण म्हणू या आपण. कारण एकदम जोडपे होणे तिथल्या संस्कृतीमध्ये बसत नाही. त्यातल्या मुलीचे अपुरे कपडे, दोघांची चाललेली लगट कितीही दुर्लक्ष करायचे म्हटले तरी शक्य होत नव्हते. त्यांना बाकीच्या जगाचे भान नव्हते. परंतु बाकी जग (म्हणजे माझ्यासारखे थोडे) भानावर होते. आजूबाजूला अशीच परिस्थिती थोड्या फार फरकाने सर्वत्र होती. ज्या गोष्टी बंद दाराआड आपल्या नवर्या बरोबर करायच्या त्या सर्व लोकांच्या समोर करणे हे पचनी पडायला जड जात होते. तो काळ होता १९९७ चा. २२-२३ वर्षांपूर्वीचा. एकीकडे प्रगती हवी म्हणून केलेला आरडाओरडा तर दुसरी कडे प्रायव्हेट गोष्टी उघड्यावर हा तर चांगलाच विरोधाभास होता.

पाश्चिमात्य संस्कृतीनुसार वयाच्या १३-१४ वर्षापासून मुले आई वडिलांपासून वेगळी राहतात कारण त्यांना स्वातंत्र्य हवे असते. मग ते स्वतःच्या पायावर उभं रहायचा प्रयत्न करतात. त्यांना हवा तसा जोडीदार निवडायचे पण स्वातंत्र्य असते. दिसणे, पैसा, गुण अर्थात दुर्गुण पारखून ते जोडीदार निवडतात. मग एकत्र राहण्यास सुरुवात करतात. दिवस रात्र एकत्र राहतात. त्यांना कोणाचाच अडसर नसतो. मग त्यांना आपल्या प्रेमाचे बाहेर प्रदर्शन करण्याचे कारण तरी काय? हे सर्व मिळाल्यावर तरी देशात घटस्फोटाचे प्रमाण अल्प असायला पाहिजे. पण आकडेवारी तर सांगते ते खूपच आहे. हे कसे काय?

हे पाश्चात्य संस्कृतीचे लोण झपाट्याने पसरत आपल्या उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपले आहे. मुलांना सगळ्याचे स्वातंत्र्य हवे आहे. आई वडिलांची संगत त्यांना सहन होत नाही. मग विभक्त राहण्याचा अट्टाहास. ते ही ठीक आहे. मग तरी ते सुखी होतात का? म्हणजे असे वाटते की नवीन पिढीने ज्या गोष्टी एकांतात करायच्या त्या उघड्यावर करतात आणि ज्या गोष्टी चारचौघात करायच्या त्या एकट्याने करतात.

प्रेमाचे असे प्रदर्शन करण्याची गरज आहे का ? प्रेम हे उघड्यावर साजरे करायचे साधन नाही, ते फक्त दोघांचे असते. त्याची सात्विकता ही दोघांनी साजरी करण्यात आहे. सणवार, आनंद, क्वचित दुःख पण एकमेकांच्या साथीत साजरे करायचे असते. असा हाउघड झाकचा खेळ कोणाला कळेल का? आणि त्याचे स्वरूप चांगले होईल का?



रश्मी जोशी



2 comments:

  1. नीलिमा सोनटक्केSeptember 1, 2020 at 7:57 PM

    स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. आता तर आपल्या कडे पण लग्न केल्यानंतर ची जबाबदारी नको म्हणून तसेच एकत्र रहायला लागले आहेत.

    ReplyDelete
  2. रश्मिताई,तुमच्या ह्या लेखातील मताशी मी शंभर टक्के सहमत आहे

    ReplyDelete