भल्या पहाटे
कोकिळेच्या गाण्याने जाग आली आणि उन्हाळा सुरू झाल्याची चाहूल लागली. शिशिर संपता संपता
निसर्ग कूस वळवतो आणि वसंत ऋतूचे पहिले उबदार पाऊल अंगणात पडते. गोठवणारी थंडी जाऊन
वातावरणात हवाहवासा सुखद उबदारपणा येतो. पहाटेची गुलाबी थंडी अंगभर लपेटून अनुभवण्यात
काही औरच मजा असते.
खरं तर उन्हाळा,
पावसाळा, हिवाळा हे तीन ऋतू. निसर्गनियमानुसार प्रत्येक ऋतू आपल्या ठरलेल्या वेळी येतो.
निसर्ग सहसा कधी आपल्या नियमाला चुकत नाही. आल्यावर साधारणपणे तीनेक महिने तरी मुक्काम
करतोच. आपला हात सृष्टीवर फिरवतो आणि आपली वेळ संपली की हळुवार पावलांनी काढता पाय
घेतो. आणि पुढच्या ऋतूची आपल्याला चाहूल लागते. खरं तर प्रत्येक ऋतूची आपापली वैशिष्ट्ये
आहेत. निसर्गचक्रात प्रत्येक ऋतूचे स्वतःचे एक योगदान असते. पावसाळ्याची चाहूल 'पेरते
व्हा' पक्षी शेतकऱ्यांना देत आकाशात गिरक्या घेत असतो. मग पुढचे तीन महिने सगळ्यांचीच
धांदल उडते. मुसळधार पाऊस सुरू होतो आणि तप्त धरणी तृप्त होते. चहूकडे हिरव्या रंगाची
उधळण होते. शेतकरी सुखावतो. त्याची शेतीच्या कामाची लगबग सुरू होते. लोकांची छत्री,
रेनकोट सांभाळत ऑफिस गाठायची एकच धावपळ असते. घराघरांत सणवार सुरू होतात. असा हा पावसाळा
सगळ्यांनाच नवचैतन्य देतो. चराचर सृष्टीवर हिरवा शेला पांघरून हळूच माघारी वळतो. आणि
चाहूल लागते ती थंडीची. छत्री-रेनकोटची जागा स्वेटर्स आणि शाली घेतात. आणि सुरू होते
ती दसरा, दिवाळीची धामधूम. हळू हळू थंडीचा कडाका वाढत जातो आणि निसर्गाचे रूप पण पालटू
लागते. हिरवाई जाऊन शिशिराची पानगळती सुरू होते.
तुम्हाला
कोणता ऋतू आवडतो असे सहज जरी कुणालाही विचारले तर बहुतेक वेळा 'हिवाळा' हेच उत्तर मिळते.
जवळपास ८०% लोकांना हिवाळा आवडत असतो. १५% लोकांना पावसाळा आवडतो. आणि उरलेले ५% लोक
जे काहीच उत्तर देत नाहीत त्यांना कदाचित उन्हाळा आवडत असावा. तसा उन्हाळा फारसा कुणाला
आवडतच नाही. लोक हाश्श हुश्श करत घाम पुसत सतत बिचाऱ्याला शिव्या देत असतात. त्याच्या
नावाने खडे फोडत असतात. मला मात्र हिवाळा, पावसाळा तर आवडतोच पण अगदी मनापासून उन्हाळासुद्धा
आवडतो.
अहो का बरं
म्हणून काय विचारता? आता तुम्हीच बघा, उन्हाळ्यातच आपण ट्रेंडी गॉगल्स, फॅन्सी कपड्यांची
खरेदी करू शकतो आणि घालून मिरवू शकतो. पण पावसाळ्यात कपडे खराब होऊ नयेत म्हणून आपण
शक्यतोवर जुनेच कपडे घालतो, आणि कोणतेही कपडे घाला, वरून रेनकोट घालावाच लागतो. आणि
हिवाळ्यात स्वेटर्स आपल्या कपड्यांना झाकून टाकतात. कपड्यांचा खरा आनंद आपण उन्हाळ्यातच
घेऊ शकतो. हलके कॉटनचे पांढऱ्या, गुलाबी, निळ्या रंगावर रंगीबेरंगी फुलांच्या डिझाईनचे
कुडते वॊर्डरोबमध्ये अलगद येऊन विसावतात. तर एकीकडे नवीन ट्रेंडी गॉगलची खरेदी होते.
खरं तर टीव्ही
वर थंडा थंडा कूल कूलच्या जाहिराती सुरू झाल्या की उन्हाळ्याची चाहूल लागते. मग सुरू
होते ती माठ खरेदीची लगबग. लाल घ्यायचा की काळा यावर चर्चा झडतात. आजकाल तर अगदी सुबक
रंगीबेरंगी सुंदर डिझाइन्सचे माठ बाजारात आले आहेत. मग मनासारखी खरेदी करून माठ घरी
आणला जातो. हवेशीर जागेत त्याची प्राणप्रतिष्ठा केली जाते. मग माठाच्या पाण्यात कधी
मोगरा तर कधी वाळा. बस्सssssss, रणरणत्या उन्हातून घरात आल्यावर थंडगार वाळ्याचे पाणी
म्हणजे अहाहाssss अगदी अमृतपानच. तुमच्या फ्रिजचे किंवा कूलरचे पाणी झक मारते या पाण्यापुढे.
वातावरणात
आंब्याच्या मोहोराचा हवाहवासा घमघमाट सुटतो. इकडे कोकीळ कूजन सुरू होते. पहाटेची आल्हाददायक
हवा, नव्या कोवळ्या पालवीने सजलेली झाडे , लालपिवळ्या रंगांची उधळण करत आपल्या स्वागतासाठी
रस्त्यावर लालपिवळ्या फुलांच्या पायघड्या घालून गुलमोहोर, बहावा रस्त्याच्या कडेला
अदबीने उभे असतात. मोगरा, मदनबाण, चाफा, रातराणी, मधुमालती अशी अनेक प्रकारची फुले
सुवासाची उधळण करायला सज्ज होतात. वातावरण कसे सुगंधी होऊन जाते. आणि उन्हाची दाहकता
कमी व्हायला मदत होते.
सगळ्यतात
जास्त फळे तर या ऋतूतच येतात. रामफळ, सीताफळपासून सुरवात होते. मग कलिंगड, खरबूज, द्राक्ष,
पपई ही फळे नंबर लावतात. आणि मग मोठ्या दिमाखात बाजारात दमदार एन्ट्री घेतो तो आपणा
सर्वांचा अत्यंत आवडता सर्व फळांचा राजा 'आंबा'. शिवाय उसाचा रस, आईस्क्रीम, बर्फाचा
गोळा, पन्हं, आंबेडाळ आपल्या दिमतीला तत्पर असतातच. (आत्ताच सुटले ना तोंडाला पाणी?)
उन्हाळा सुरू
झाला म्हणजे गृहिणींची पापड, लोणची अशी उन्हाळी कामांची गडबड उडते. मग रोज एकेकीच्या
घरी जमून गप्पा टप्पा करत केव्हाच ही कामे उरकली जातात. (आजकाल बहुतेक ठिकाणी हे सगळे
रेडिमेड आणले जाते) या दिवसात संध्याकाळी हवा फार छान असते. अंधारही लवकर पडत नाही.
त्यामुळे तमाम जेष्ठ नागरिक पाय मोकळे करायला बाहेर पडतात आणि मग बागेत निवांतपणे समवयस्कांबरोबर
गप्पांमध्ये रमतात. उन्हाळा म्हणजे लहान मुलांसाठी तर मोठी पर्वणीच. वार्षिक परीक्षा
संपून मोठी सुट्टी लागते. अभ्यासाचे टेन्शन नसते. खेळ, ट्रिप, आणि धमाल मस्ती! आईबाबांबरोबर
देश परदेशात छानशी ट्रिप. सकाळी स्विमिंग, दुपारभर सापशिडी, बुद्धिबळ, कॅरम, मुलांचा
मस्त फड जमतो. आणि संध्याकाळी मैदानी खेळ. खेळू नकोस अभ्यास कर म्हणून मागे लागायला
कोणी नसते. त्यामुळे समस्त विद्यार्थ्यांचा उन्हाळा हा अतिशय लाडका असतो.
पटलं ना मग
तुम्हाला, उन्हाळासुद्धा मस्त असतो ते!
खरं तर नाण्याला
जशा दोन बाजू असतात, तसेच कोणत्याही गोष्टीकडे बघण्याच्या दोन बाजू असतात. एक सकारात्मक
आणि एक नकारात्मक. एखादी गोष्ट कितीही अवघड असो किंवा त्रासदायक असो त्यातील सकारात्मक
गोष्टी जर आपण शोधल्या आणि त्यांचा विचार केला तर अनेक अवघड गोष्टी सहज सोप्या होऊन
जातात.
काय पटतंय
का!
चला तर मग
या वर्षी उन्हाळा मस्त एन्जॉय करूयात.
वैजयंती डांगे
Chaan lekh Pratyek rutuchi maja vegli
ReplyDelete