मृत्युंजय आश्रम
अमरकंटकपर्यंत पोचलो या खुशीत होतो आम्ही. रात्रीच्या जेवणाची घंटा झाली तसे
हॉलच्या बाहेर उभे असणारे आम्ही सगळे परिक्रमावासी आत जायला लागलो. जेवणाची व्यवस्था पाहणाऱ्या आश्रमाच्या
भंडाऱ्याने माझ्याकडे बोट दाखवत मला परिक्रमावासीयांसाठी असलेल्या पंगतीतून बाहेर
काढले आणि सामान्य भक्तांसाठी असलेल्या पंगतीकडे बोट दाखवले. परिक्रमावासीयांचा
गणवेश असणारी लुंगी मी घातली
नव्हती - पायजम्यात होतो म्हणून मला त्या पंगतीत स्थान नव्हते. अंगी उपजत असलेला
माझा संताप उफाळून येऊ पाहात होता. बहुधा मीनलच्या ते लक्षात आले आणि तिने खुबीने माझे कोपर पकडत मला त्या
दुसऱ्या पंगतीकडे नेले आणि आम्ही बसलो. समोरच्या पंगतीतले सह-परिक्रमावासी, मी त्यांच्याबरोबर का नाही याचा विचार करत
माझ्याकडे पाहत होते.
हॉल हळूहळू भरत होता. मृत्युंजय आश्रम ही एक संस्कृत पाठशाळासुद्धा
आहे. तिथले विद्यार्थी पाळीपाळीने पंगतीत वाढायचे काम करतात. ती सर्व मुलेसुद्धा हातात अन्नाची ताटे घेऊन वाट पाहत उभी होती. कोणीतरी "सीताराम,
सीताराम"चा जप चालू केला. पंगत पूर्ण वाढून होईपर्यंत लोकांना
गुंतवून ठेवायचा आणि त्याचबरोबर नामस्ममरणाचे पुण्य पदरी पाडून घ्यायचा, परिक्रमेतला हा नेहेमीचा उपाय. मला स्वतःला हा नामघोष आवडायचा. त्यात मी नेहेमीच मोठ्याने
सामील व्हायचो.
पण आज
माझे लक्ष त्यात नव्हते. मी, जन्माने, संस्काराने, शिक्षणाने - एक द्विज, एक ब्राह्मण, आणि
आज मला एका अस्पृश्याची वागणूक देण्यात आली होती. कारण काय तर मी लुंगी न
नेसता पायजमा घातला होता. मला पाहताच कुणीही मला परिक्रमावासी समजला असता. समजत होते. पण इथे त्याची कदर नव्हती. मला
वेगळे वागवण्यात आले होते. मी सुद्धा अन्नाच्या दोन
घासांसाठी तो अपमान गिळून तिथे त्या वेगळ्या रांगेत बसलो होतो! माझ्यापुढे दोन पर्याय होते. एक म्हणजे रागाने
उठून जाणे आणि दुसरा - आली परिस्थिती स्वीकारून त्यावर विचार करणे. कळत नकळत मी दुसरा पर्याय स्वीकारला होता.
तसे माझे जेवण जास्त नव्हते. एखादा दिवस उपाशी राहिलो असतो तर आभाळ कोसळणार नव्हते. फार तर बिस्किटे खाऊन घेतली असती. पण बिस्किटांनी पोट भरत नाही आणि चालण्यासाठी भरलेले पोट आवश्यक असते हे अडीच महिने चालल्यावर कळून चुकले होते. उद्या परत मोठी चाल होती. जेवण आवश्यक होते. अमरकंटक मोठे गाव आहे. आश्रमाच्या बाहेर चार दोन हॉटेल्स नक्की सापडली असती. खिशात पैसे होते. सहज जाऊन जेवू शकलो असतो. पण खिशात पैसे आहेत ते असे उधळायला नाहीत याची पूर्ण जाणीव होती. तो स्वतःच केलेला नियम होता. जर अजिबातच कुठे काही खायला मिळाले नाही आणि भूक लागली असेल तर हॉटेलमध्ये जाणे माफ होते. समोर अन्न दिसत असताना मानापमानाच्या कारणावरून पानावरुन उठणे केवळ अक्षम्य होते. अन्नाचा तो अपमान झाला असता!

विचारांच्या अशा आवर्तात असताना, आणखी एक विचार डोकावून गेला.
त्या भंडाऱ्याने केले त्यात नक्की काय चूक होते? त्या आश्रमाचे
काही नियम होते. त्या नियमानुसार तो वागत होता. आश्रमात गर्दी होती. मग अशा गर्दीत
परिक्रमावासी कोण आणि परिक्रमा न करणारा कोण हे त्याने कसे ओळखावे? माणसाकडे नजर टाकली आणि तो
परिक्रमावासीयांच्या गणवेशात असेल तर तो परिक्रमावासी अशी साधी सोपी पद्धत भंडारी
बहुधा पाळत होता. मी लुंगी घातली नव्हती हे सत्य होते. म्हणजे मी गणवेशात नव्हतो. त्या
पाठीमागची माझी कारणे काहीही असली तरी त्या गर्दीच्या
वेळी त्या भंडाऱ्यापर्यंत ती पोहोचणे शक्य नव्हते. ती वेळ
नव्हती. तेव्हा त्या भंडाऱ्याला माझ्याबद्दल काही आकस असण्याचे कारण नव्हते. तो फक्त परिक्रमावासीयांना जरा जास्त
सुविधा देण्यासाठी केलेले आपले नियम पाळत होता. चूक
माझीच होती.
हा विचार
मला तर्कशुद्ध वाटला. डोक्यातला राग निवळला. परत पंगतीत
लक्ष गेले. 'सीताराम'चा घोष बंद होत होता. समोर पाहिले तर माझ्या पानात
व्यवस्थित पदार्थ वाढलेले होते. वेगळ्या रांगेत बसवले यापलीकडे काही भेदभाव
नव्हता. गणवेशाचे महत्त्व मला पटले होते. 3 Idiots चित्रपटातले
वाक्य आठवले - "स्कूल जानेके लिये पैसोंकी नहीं,
युनिफॉर्मकी जरुरत होती है." मी हात जोडले. 'वदनी कवळ घेता...' म्हणत जेवायला
सुरुवात केली. परिक्रमेने शिकवलेली शिकवण मनात साठवून!!
Uttam lihile ahe....
ReplyDelete