Uri: The Surgical Strike - पोवाडा

अतिरेकी काढू ठेचून, संधी साधून
बोचतो भ्याड हल्ला मनात
बंधुबलिदान ठेवा ध्यानात
देशनेतृत्व वदले जोशात ॥
(जी जी जी जी जी जी)

इतिहास काय सांगतो
गोरी कपटनीती दावतो
खंडित देश पेटतो
शत्रू सैन्य सदा घुसवतो ।

रक्षण्या वीर झुंजतो
संगरी रक्त सांडतो
रिपुडाव कुटिल रंगतो
अश्वत्थामा मनी जागतो ।

भीषण काळरातीला, घाला घातला
संधी ना मिळे लढाईला
घडे थेट भेट मृत्युला
थोर आकांत “उरी” मांडला ॥
(जी जी जी जी जी जी)

हे अधम कृत्य अतिहीन
मार्ग एकच निर्दालन
चर्चा-दबाव सारे गौण
व्हावे तांडव शिवनर्तन ।

सत्तेचे लाभे वरदान
उठे सैन्यशक्ती पेटून
तोच ध्यास रात्रंदिन
लक्ष्य अमुचे अरिमर्दन ।

पावून योग्य समयाला, वार हो केला
उडे शत्रूची दाणादाण
जाहले ईप्सित अरिशिरकाण
झुंजले मर्द वीर बेभान ॥
(जी जी जी जी जी जी)

घेतला खरा प्रतिशोध
शत्रूस बैसला धाक
विझवता मनीची आग
स्वत्त्वास आली हो जाग ।

नेतृत्व असे जर “खासे”
उजळेल भाग्य देशाचे
जाणून मर्म हक्काचे
करू पुण्यकर्म दानाचे ।

सरकार यावे निवडून, कौल देऊन
जनांचा असे खरा आधार
संपवू कलंक स्वैराचार
प्रगतीचे स्वप्न करू साकार ॥
(जी जी जी जी जी जी)

ऑडिओ ऐकण्यासाठी इथे क्लिक करा: URI - पोवाडा ऑडिओ

मानसी फडके


2 comments: