उत्खनन -गौरी देशपांडे

 

मराठी भाषेत इतक्या विविध तऱ्हेचं लिखाण झालेलं आहे की कुठल्या तरी एका पुस्तकाची आवडतं पुस्तक अशी ओळख करून देणं सोपं आहे. अर्थात हे पुस्तक सगळ्यांच्याच आवडीचं असेल हे मात्र कठीण आहे. पण कारल्याची भाजी अत्यन्त आवडीने खाणारे लोक असतातच की. मी आज गौरी देशपांडे यांच्या उत्खननया पुस्तकाबद्दल बोलणार आहे. त्यांचा चाहत्यांचा वर्ग मोठा आहे - तेव्हा 'उत्खनन' ही कारल्याची भाजी नक्कीच ठरणार नाही याची खात्रीच आहे. 

उत्खनन वाचण्याआधी गौरी देशपांड्यांचं 'गोफ' पुस्तक वाचलेलं होतं. ते आवडलेलं होतं. त्यांच्या लिखाणात काहीतरी वेगळं आहे हे जाणवत होतं, पण नक्की काय ते चिमटीत सापडत नव्हतं. अर्थात ते सापडायला 'उत्खनन' नंतर अजून दोन पुस्तकं वाचावी लागली - आणि आता सगळ्या पुस्तकांची पारायणं करून झाली. प्रत्येक वेळा काही वेगळाच पैलू दिसतो आणि 'अरेच्या, मला उगीचंच  वाटत होतं की हे पुस्तक समजलंय' असं जाणवून जातं. 

गौरी देशपांडे

अगदी टीपिकल गौरी देशपांडे styleमधली ही गोष्ट. कादंबरीची नायिका दुनिया उच्च मध्यमवर्गीय, सुशिक्षित, पुढारलेल्या स्वतंत्र विचारांची - आणि तिचं कुटुंब सुद्धा त्याला साजेसंच. दुनिया, तिचा न्यूरोसर्जन नवरा दयाळ, बापापेक्षाही त्याच शास्त्रात पारंगत असलेली, अतिशय देखणी, कर्तबगार अशी तिची मुलगी मणी, मणीचा जन्मदाता बाप अनंत, दुनियाची मैत्रीण शेजारीण अभया आणि मुलं - अर्णव उर्फ अणू, सती आणि धाकटा तीर्थंकर. पात्रांचा गोतावळा - म्हटली तर वेगवेगळी छोटी कुटुंब - पण कादंबरी वाचताना एखाद्या एकत्र कुटुंबाची गोष्ट वाचतो आहोत असं वाटणार!

दुनिया विद्यापीठाच्या पुरातत्वशास्त्र विभागाची उपविभागप्रमुख आहे. न कळत्या वयात अनंतामुळे तिला मणी मिळाली आणि मणीची चाहूल लागताच अनंत गायब झाला आहे. अश्या वेळी तिला दयाळ भेटतो, दुनियाच्या कुटुंबाला आपलंसं करतो. तरुणपणात आलेल्या अनुभवामुळे कदाचित असेल, पण भिडस्त दुनिया एकंदरीतच सगळ्यांशी दबूनच वागत असते, आपल्याच हक्कासाठी भांडायला चाचरते तर अभया कुणाची भीडभाड न बाळगता तिच्या हक्काचे सर्व काही मिळवते. याची अर्थातच दुनियाला थोडी असूया, थोडी खंत आहे. मणी जब्बारशी लग्न करते पण करिअरपुढे तिला मूल नको आहे. त्यावरून जब्बार आणि तिच्यात टोकाचे मतभेद आहेत. मुलीच्या संसाराची काळजी असलेली दुनिया कधी नव्हे ते कंबर कसून मणीच्या बाजूने तिच्या सासरच्या लोकांना, जावयाला तोंड देते आहे. अश्या परिस्थितीत अनंत येतो. - तो अतिशय आजारी आहे. त्याला कसं वागवावं हे दुनियाला समजायच्या आधीच त्याचा ताबा दयाळ, मणीने एक पेशन्ट म्हणून घेतलेला आहे, आणि वाचण्याची शक्यता खूप कमी असतानासुद्धा अनंताला शस्त्रक्रियेसाठी तयार केलं आहे. ... ढोबळपणे ही कथा. 

गौरी देशपांड्यांचं कौशल्य हे, की ही वरवर सरधोपट दिसणारी पण अनेक उपकथानकं असणारी कथा त्यांनी सुरेख उलगडली आहे. छोटेच पण अत्यन्त प्रभावी संवाद हे तर देशपांड्यांचं खास वैशिष्ट्य. प्रत्येक पात्राची एक विशिष्ट शैली, स्वभाव त्या या अश्या संवादातून अगदी चपखलपणे उभा करतात. दयाळचं दुनियेवरचं प्रेम पण वस्तुनिष्ठ विचारपद्धत, दुनियाचा भिडस्तपणा, आणि त्यामुळे होणारी कुचंबणा, वरवर साधा वाटणारा पण वेळी परखडपणे बोलणारा कवीमनाचा अणु. किती उदाहरणं द्यावीत. छोट्या छोट्या प्रसंगातून या कुटूंबातल्या व्यक्तींचे परस्परसंबंध सुरेख उलगडले आहेत. आता काय होणार बरं अशी उत्कंठा कायम राहिली आहे. त्यामुळे पुस्तक खाली ठेववत नाही आणि ठेवावं लागलं तर कधी परत सुरुवात करतो असं होतं. आता जेव्हा मी हे पुस्तक परत वाचतो तेव्हा या प्रसंगाचं प्रयोजन समजत जातं. किती सुरेख पद्धतीने ही वीण विणली जात आहे हे लक्षात येतं. 

गौरी देशपांड्यांच्या नायिका ह्या साधारणपणे एका मुशीतल्या असतात. बहुधा मध्यमवर्गीय, सुशिक्षित - किंबहुना उच्चशिक्षित, आपली ठाम मतं असणाऱ्या. त्यांचे पार्टनर बहुधा यांना समजून घेणारे असतात, मोकळीक देणारे असतात. आर्थिक श्रीमंती नाही पण सुबत्ता असते, त्याला साजेशी lifestyle असते. सर्वसाधारण मराठी कुटुंबात सापडतील असे जेवणाखाण्याचे उल्लेख असतात. बहुतेक नायिकांचे इतर पुरुषांबरोबर वैचारिक मोकळेपणाचे संबंध असतात. दुनिया याला अपवाद नाही. 

ही गोष्ट एका मोठ्या परिवारातल्या परस्परसंबंधांचे  उत्खनन आहे. एका ठिकाणी दुनिया म्हणते - उत्खननात सापडलेला प्रत्येक खापराचा तुकडा हा काळजीपूर्वक साफ करून सगळीकडून न्याहाळून बाजूला ठेवावा लागतो. त्यावरून तो तुकडा ज्याचा भाग असावा तो घडा आणि तो हाताळणारे हात यांचा विचार होतो. या पुस्तकातही लहान लहान प्रसंगातून देशपांड्यांनी असाच या नातेनातेसंबंधांचा मागोवा घेत कथानक पुढे नेले आहे.

आयुष्याच्या शेवटी, आपण जिला टाकून पळून गेलो त्या दुनियाकडे परत यावं लागावं यामुळे जरा साशंक, खजील झालेला अनंत आणि आपल्या आयुष्यात आता हा परत का आला, याचं काय करायचं या काळजीत असलेली दुनिया - तिच्या कुटुंबाच्या मदतीने मित्र म्हणून एकत्र येतात आणि त्या भरवशावर अनंत थोड्याशा धोकादायक शस्त्रक्रियेला तयार होतो. हा तर भाग इतक्या हळुवारपणे मांडला आहे की आवाज सुरेख लागलेला असताना एखादा गायक रंगात येऊन स्वतःच्याच मस्तीत खयाल सादर करत असावा आणि श्रोतेही त्याचा आनंद घेत तल्लीन झालेले असावेत असं काहीसं वाटत राहते. 

देशपांड्यांच्या मुख्य व्यक्तिरेखा या ठळक पेन्सिलींनी चितारलेल्या असतात - त्यात फारशी संदिग्धता नसते. पण परत एक दुनिया-अनंत यांची गोष्ट सांगायची तर मग इतर फापटपसारा होऊ शकतील अश्या सर्व गोष्टी देशपांडे यांनी कटाक्षाने टाळल्या आहेत. दुनियाला आणि तिच्या कुटुंबाला आपलेच कुटुंब करणारा दयाळ हा पोरका आहे. त्याला स्वतःचे असे कुटुंब नाही. ते असणं हे मूळ कथेसाठी distraction झालं असतं. ही कथा दुनिया, अनंत यांची आहे. दयाळ, मणी ही वस्तुनिष्ठ विचार करणारी माणसं आहेत. त्यांनी अनंतला सहजी सामावून घेणं जरा अवास्तवच वाटतं. अभया रोखठोक तर तिची मुलगी अगदीच संसारी. अर्णव कवी आणि वेगवेगळ्या समाजकार्यात रमणारा - इतर तरुण मुलांना सामान्यपणे असणारे उदरनिर्वाहाचे प्रश्न याचा उल्लेख नाही. किंवा दुनियाची स्वतःच्या कर्तृत्वाविषयीची साशंकता अधोरेखित करण्यासाठी म्हणून कदाचित मणी एक बापापेक्षा सवाई हुशार मुलगी चित्रित केली आहे!

या सगळ्या पार्श्ववभूमीवर, भिडस्त असलेल्या दुनियाचं एका आश्वस्त, समाधानी स्त्रीमध्ये परिवर्तन होण्याच्या प्रक्रियेची सुरुवात वाचकांना दिसते! पुस्तकात एक सुरेख कविता आहे -


चांदण्यात वाघ, सोन-काळा

बघतो नख्या आपल्या.

पत्ताच नाही त्याला,

की पहाटे भल्या,

खतम केलंय त्यांनी एकाला.

 

दुनियाला स्वतःबद्दल, स्वतःच्या ताकदीची, आयुष्यात कमावलेल्या नातेसंबंधांची जाणीव करून देणाऱ्या ह्या ओळी हा खास गौरी देशपांडे टच! केवळ या अनुभवासाठी एकदा तरी हातात घ्यावं असं हे पुस्तक.

 

अभिजित टोणगांवकर




1 comment: